नवी मुंबईत उभी राहणार ‘इनोव्हेशन सिटी’

Total Views |
Innovation City
 
दावोस : ( Innovation City ) भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेमीकंडक्टर सेवांमध्ये जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी टाटा समूह नवी मुंबईत जागतिक दर्जाची ‘इनोव्हेशन सिटी’ उभारणार आहे. नव्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे ९०,००० कोटी रुपये इतकी मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
 
महाराष्ट्राला जागतिक नवोन्मेषाचे केंद्र बनवणारी राज्याची पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे ही घोषणा केली. या संकल्पनेची मांडणी यापूर्वी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसमोर करण्यात आली होती. शहरासाठीचे ठिकाण निश्चित झाले असून ६ ते ८ महिन्यांत बांधकाम सुरू होणार आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे. यासाठी एक इकोसिस्टम उभी करावी लागते. गेल्यावर्षी दावोसमध्येच याबाबत चर्चा झाली होती. त्यांच्या टीमने जगातील सर्वोत्कृष्ट क्षारांचा अभ्यास करून एक संकल्पना मांडली. तिची जागा आपण नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावरच जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाची घोषणा करताच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार या इनोव्हेशन सिटीमध्ये गुंतवणुकीसाठी रस दाखवत आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारणीचाही समावेश असेल".
 
हेही वाचा : महाराष्ट्रात तब्बल ३० लाख कोटींची गुंतवणूक फिक्स; राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
 
‘इनोव्हेशन सिटी’ नेमकी काय असेल?
 
इनोव्हेशन सिटीमध्ये एआय, हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ह्युमनॉईड रोबोट्स, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, क्रिप्टोग्राफी, सेमीकंडक्टर्स आणि नवीन पिढीच्या हरित ऊर्जा उपायांवर संशोधन होईल. स्टार्टअप्स, उद्योग, संशोधन संस्था आणि शिक्षणविश्व यांचा संगम हे या शहराचे वैशिष्ट्य असेल.
 
संशोधन, उद्योग आणि शिक्षणाचा संगम
 
या प्रकल्पात संशोधन संस्था, स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणून जागतिक स्तरावर उपयोगी ठरणारी समाधानं विकसित केली जातील. एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स यांवर विशेष लक्ष देत, मुंबईला नवोन्मेषाचे आघाडीचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.