मुस्लिमांना सत्तेत वाटा हवा असून, तो असदुद्दीन ओवेसी आपल्याला मिळवून देतील, या आशेने त्यांच्या ‘एआयएमआयएम’ या पक्षाला विविध राज्यांमध्ये पाठिंबा वाढत चालला आहे. पुढील काळात हा पक्ष अधिक कट्टर भूमिका घेईल, यात शंका नाही. त्याला रोखणे ही आता कथित सेक्युलर पक्षांची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे २५ महापालिकांमध्ये सत्ता संपादन केली. ही स्वागतार्ह बातमी असली, तरी त्याचबरोबर आणखी एक बातमी होती, जी अधिक चिंताजनक मानली पाहिजे. या २९ महापालिकांमध्ये मिळून ‘ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन’ (एआयएमआयएम) या पक्षाचे तब्बल १२५ उमेदवार निवडून आले आहेत. ‘एआयएमआयएम’ हा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असून, तो देशातील मुस्लीम मतदारांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत चालला आहे. देशातील मुस्लीम मतदारांचा एकमेव पक्ष बनून मुस्लिमांना सत्तेत वाटा देणे, हे या पक्षाचे जाहीर उद्दिष्ट आहे. गतवर्षी पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांमध्येही या पक्षाचे तब्बल सहा आमदार निवडून आले होते. वास्तविक, हा पक्ष प्रामुख्याने तेलंगण आणि काही प्रमाणात महाराष्ट्र या दोनच राज्यांमध्ये सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये त्याचे तितकेसे अस्तित्व नाही. असे असतानाही बिहारमध्ये या पक्षाचे सहा आमदार कसे निवडून येतात? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
गतवर्षी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारने काही खासदारांची शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठविली आणि या संघर्षाचे कारण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची अपरिहार्यता जगाला पटवून दिली. या शिष्टमंडळांमध्ये काही विरोधी पक्षांचे खासदारही होते. त्यापैकी एका शिष्टमंडळात ओवेसी यांचाही समावेश होता. ओवेसी यांनी या शिष्टमंडळामार्फत आणि नंतरही भारतात ‘ऑपरेशन सिंदूर’चे जोरदार समर्थन केले असून, पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. असे असले, तरी इतर काही मुद्द्यांवर ओवेसींची भूमिका ही नेहमीच वादग्रस्त राहिली. ओवेसी आजही अयोध्येतील विवादित ढाँचा पाडण्याच्या घटनेचा उल्लेख ‘बाबरी मशिदीचे बलिदान (शहीद)’ असा करतात.
‘तीन तलाक’ आणि ‘वक्फ बोर्डातील सुधारणा’ या कायद्यांना त्यांनी कडाडून विरोध केला. लोकसभेत तर त्यांनी ‘वक्फ बोर्डा’च्या विधेयकाचा मसुदा फाडून टाकला होता. तसेच खासदारपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी ‘जय फिलिस्तीन’ अशी घोषणाही दिली होती. ओवेसींचा धाकटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हा अधिक वादग्रस्त असून, त्याने काही प्रक्षोभक विधाने केलेली आहेत. "देशातील सर्व पोलीस केवळ १५ मिनिटांसाठी बाजूला करा आणि मग आम्ही २० टक्के मुस्लीम भारतातील ८० टक्के हिंदूंवर कसे भारी पडतो ते दाखवून देऊ,” या त्याच्या उद्गारांनी खळबळ माजविली होती.
भारतातील जास्तीत-जास्त भूमी आणि सत्तापदे मुस्लिमांच्या ताब्यात आणण्याची ओवेसींची ही भूमिका लपून राहिलेली नाही. त्यांच्याच पक्षाची उमेदवार सहर युनूस शेख ही ठाणे महापालिकेत मुंब्रा विभागातून निवडून आली आहे. मुंब्रा हे मुस्लीमबहुल शहर असून, विधानसभेत येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच निवडून येतात. आव्हाड यांची सारी भिस्त या मुस्लीम मतदारांवरच असून, त्यांना खूश करण्यासाठी आव्हाड यांनी आजवर अनेक वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधाने केली आहेत. मात्र, ठाणे महापालिका निवडणुकीत येथून उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा ‘एआयएमआयएम’च्या उमेदवार सहर शेख यांनी जोरदार पराभव केला.
त्यानंतर झालेल्या ‘विजय’ सभेत या सहर शेख यांनी ‘कैसे हराया?’ हा प्रश्न विचारून आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच खिजविले. लहान मुलांबरोबर खेळताना मोठी माणसे मुद्दाम हरतात, तेव्हा लहान मूल आनंदातिशयाने टाळ्या पिटत कसे हसते आणि ‘हरवलं, हरवलं’ असे म्हणते, त्याच सुरात सहर शेख यांनी ‘कैसे हराया?’ असा प्रश्न हसत-हसत विचारला होता. यावरून त्यांची बालिश वृत्ती दिसली, तरी त्यातून दिला जाणारा संदेश मात्र गंभीर आहे. ‘आज तुम्हाला महापालिका निवडणुकीत हरवले आहे, उद्या विधानसभेतही हरवू’ हे त्यांना सांगायचे आहे. त्यानंतर सहर शेख यांचे वडील व या पक्षाचे स्थानिक नेते रशीद युनूस यांनीही या सार्या भागाला (मुंब्रा व लगतचा प्रदेश) हिरव्या चादरीत लपेटून घ्यायचे आहे, असे सांगितले. या मतदारसंघातून हिंदूंना हुसकावून लावायचे आणि केवळ मुस्लिमांचा प्रदेश बनवायचा, हे त्यांचे उद्दिष्ट. इतक्या स्पष्टपणे हे मुस्लीम नेते हिंदूविरोधी वक्तव्ये करीत असतानाही सरकार त्यांच्यावर कारवाई कशी करीत नाही, हा प्रश्नच आहे.
महाराष्ट्रात ओवेसींच्या पक्षाला गेल्या काही निवडणुकांमध्ये यश येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल १२५ नगरसेवक निवडून आणण्याची कामगिरी ‘एआयएमआयएम’ने केली आहे. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये या पक्षाचे आमदार व खासदार निवडून येत आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत येथून या पक्षाचे तब्बल ३३ नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत तो प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी २१ जागांवर या पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईतही या पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी सात हे गोवंडी या मुस्लीमबहुल भागातील आहेत. आजवर तेथून समाजवादी पक्षाचे नगरसेवक जिंकत असत. यावरून मुस्लीम मतदारांमध्ये आता या पक्षाची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता वाढत चालली आहे.
बिहार निवडणुकीत ओवेसी यांनी जाहीर केले होते की, यापुढे मुस्लीम मतदार हे केवळ मतपेढी बनून राहणार नाहीत, तर त्यांना सत्तेत वाटाही द्यावा लागेल. ‘अब अब्दुल सिर्फ दरी नहीं बिछाएगा’ हे त्यांचे वाक्य होते. त्यांच्या या विचाराची परिणती पुढे कशात होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आज ओवेसींच्या पक्षाची ताकद मर्यादित असली, तरी मुस्लीम मतदारांमध्ये हा पक्ष वेगात लोकप्रिय होत आहे. ओवेसींची महत्त्वाकांक्षा त्यांच्या पक्षाला मुस्लीम मतदारांकडून मिळणार्या प्रतिसादामुळे देशव्यापी करीत आहे. आता यंदा होणार्या प. बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ वगैरे राज्यांमध्येही हा पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले असून, त्यामुळे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस वगैरे कथित सेक्युलर पक्षांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळेही वाद माजला होता. "एक दिवस भारताचे पंतप्रधानपद बुरख्यातील एक महिला भूषवेल, अशी मला आशा आहे,” असे ओवेसी म्हणाले होते. त्यांचे हे विधान त्यांच्या खर्या हेतूचे निदर्शक मानले पाहिजे. मुस्लिमांना सत्तेत वाटा हवा असून, तो ओवेसी मिळवून देतील, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत या पक्षाची वाढणारी ताकद, हे अशुभ संकेत आहेत.
- राहुल बोरगांवकर