भोजशाला वादावर सुप्रीम कोर्टाचा तोडगा, पूजापाठ व नमाजाचे वेळापत्रक ठरले

22 Jan 2026 15:39:52
Bhojshala
 
मुंबई : ( Bhojshala ) मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशालेत वसंत पंचमी आणि जुम्म्याची नमाज एकाच दिवशी येत असल्याने निर्माण झालेला वाद आता शांत झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केले की उद्या तेथे पूजा आणि नमाज दोन्ही गोष्टी होतील. न्यायालयाच्या आदेशानुसार, दुपारी १ वाजेपर्यंत हिंदू पक्षाला पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत मुस्लिम पक्षाला नमाज अदा करण्यासाठी वेळ देण्यात येईल. दुपारी ३ वाजल्यानंतर हिंदू पक्ष पुन्हा आपली पूजा सुरू करू शकणार आहे. दोन्ही पक्षांसाठी स्वतंत्र जागा आणि विशेष पासची व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.
 
हिंदू पक्षातर्फे वकील विष्णु शंकर जैन यांनी वसंत पंचमीच्या दिवशी पूजा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालते या कारणास्तव संपूर्ण वेळ केवळ पूजेसाठीच परवानगी द्यावी आणि नमाज रोखावी, अशी मागणी केली होती. मुस्लिम पक्षातर्फे सलमान खुर्शीद यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की दोन्ही समुदायांना प्रार्थना करण्याची मुभा दिली जाईल, मात्र प्रशासनाने सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेची योग्य काळजी घ्यावी. मध्य प्रदेश सरकारनेही न्यायालयाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
 
हिंदू पक्ष भोजशालेला देवी सरस्वतीचे (वाग्देवी) मंदिर मानतो, तर मुस्लिम पक्ष याला कमाल मौला मशिद मानतो. २००३ पासूनची व्यवस्था अशी होती की मंगळवारी हिंदू पूजा करायचे आणि शुक्रवारी नमाज होत असे. मात्र यंदा २३ जानेवारी रोजी बसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी आल्याने वाद चिघळला. सध्या पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवालही न्यायालयात प्रलंबित आहे. कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने रस्त्यांवर टायर, मलबा किंवा बांधकाम साहित्य ठेवण्यावरही बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत दोन्ही पक्षांचे धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत, यासाठी स्थानिक नागरिक व भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
हेही वाचा : शबरीमला सोने चोरीप्रकरणात उच्चस्तरीय कट; सीबीआय चौकशी करण्याची विहिंपकडून मागणी
 
धार छावणीत रूपांतरित, ८,००० जवान तैनात
 
या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धार जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ८,००० हून अधिक पोलीस व सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. नाक्यानाक्यावर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली जात आहे. प्रशासनाने भोजशालेच्या ३०० मीटर परिसराला ‘नो-फ्लायिंग झोन’ घोषित केले असून, तेथे ड्रोन किंवा कोणतीही उडणारी वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे.
 
Powered By Sangraha 9.0