Supreme Court : फाशीच्या शिक्षेला मिळणार पर्याय? मृत्युदंडाच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

22 Jan 2026 19:13:10

Supreme Court

मुंबई : (Supreme Court) मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या दोषींना फाशी देण्याची शिक्षा अतिशय वेदनादायक असून, त्याऐवजी मानवतेच्या दृष्टीने कमी वेदनादायक पर्याय देण्यात यावा, या मागणीसंदर्भातील जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आपला निर्णय राखून ठेवला आहे.(Supreme Court)

फाशीची शिक्षा 'गळफास' पद्धतीने देण्याच्या प्रचलित प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्या. संदीप मेहता यांनी फाशीच्या प्रक्रियेचा 'मानसिक परिणाम' फाशी देणाऱ्या व्यक्तींवर होतो, याकडे लक्ष वेधले. "ही प्रक्रिया पाहणाऱ्यांसाठीही अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारी असते," असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील तसेच भारताचे महाधिवक्ता यांनी तीन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरूपात न्यायालयात सादर करावे, असे निर्देश न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिले आहेत.(Supreme Court)

फाशीच्या शिक्षेला पर्याय काय?
 
या जनहित याचिकेत मृत्युदंडाची अंमलबजावणी 'गळफास' पद्धतीने करणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही पद्धत दीर्घकाळ चालणाऱ्या वेदना आणि अमानुष यातना देणारी आहे. गळफासाच्या प्रक्रियेत मृत घोषित होण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो, तर गोळीबारात काही मिनिटांत आणि लेथल इंजेक्शनमध्ये अवघ्या पाच मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे गळफास पद्धतीऐवजी लेथल इंजेक्शन, गोळीबार, विद्युतदंड किंवा गॅस चेंबर अशा पद्धतींचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली असून, या पद्धतींमध्ये काही मिनिटांत मृत्यू होतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.(Supreme Court)


Powered By Sangraha 9.0