देवा रे देवा!

22 Jan 2026 11:20:11
uddhav thackeray and aditya thackeray
 
बाबा, बाबा... तुमचा भाऊ ‘राजाला साथ द्या’ म्हणत-म्हणत गेला ना त्यांच्याकडे! कल्याण-डोंबिवलीमध्ये आता ते एकनाथ शिंदे शिवसेना गटासोबत जाणार. बाबा, त्यांच्यासोबत भाजपपण आहे. आता काय करायचे? काय म्हणता, ते ‘राजाला साथ द्या’ नव्हते म्हणत, ते ‘देवाला साथ द्या’ म्हणत होते? बाबा, तुम्ही पण म्हणाला होतात की, देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल. तुम्ही कोणत्या देवाच्या बाबत म्हणाला होतात? कल्याण-डोंबिवलीमध्ये काका ज्यांच्यासोबत गेले, तो तोच ‘देवा’ का?
१४ जानेवारीपर्यंत आपण काय खूश होतो. दोन भाऊ एकत्र आले म्हणत, चॅनेलवर पण काय धम्माल सुरू होती. पण, ‘तुतारी’ वाजली नाही, आपली ‘मशाल’ पेटली; पण ती पण अर्धवटच. बाबा आपल्या काकांचे ‘इंजिन’ धावले असते आणि जास्त जागा जिंकल्या असत्या तर? मग, तर त्यांनी पहिल्यासारखेच म्हटले असते, ‘आपून ने एक ही मारा मगर सॉलीड मारा.’ बाबा, आता तिकडे कल्याण-डोंबिवलीसारखेच ते मुंबईतही करतील का? भाजपवाले तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणत ‘सर्वपक्षीय कार्यकर्ते देवाचेच आहेत’ असे म्हणत, त्यांचे स्वागत करायला तयार असणार. खरं सांगू का, आपण मिंधे-बिंदे म्हणायचो, तसेच बाबा तुम्ही त्या कमळवाल्या मास्टरांबद्दल नेहमीच खालच्या स्तरावर जाऊन बोलता. त्यामुळे आता तरी ‘देवा’ मला पावशील का?
 
महापौरपदाचे फळ देशील का? असे कोणते तोंड घेऊन कमळवाल्यांना बोलू शकतो? वर मालवणचे ते राणे बंधू आहेतच, आपल्या डोक्यावर मिर्‍या वाटायला आणि खदाखदा हसायला. खरेच, काळ मागे जाऊन २०१९ साल परत यावे. बंद दाराआड जी चर्चा कमळवाल्यांसोबत झाली होती, त्या चर्चेनुसार मजेत सत्तेत राहिलो असतो. बाबा, सध्या इतके सगळे मुंबईत घडले; पण आपल्या दिल्लीवाल्या मॅडम आणि राजकुमार गप्प आहेत. निवडणुकीमध्ये पण आपल्यासोबत लढलेच नाहीत. अरे, हे कोण म्हणते की, काँग्रेसने आपल्यापासून दूर जावे म्हणून ‘इंजिन’ला आपल्याकडे पाठवले गेले. बाबा, खरेच काका आपल्याकडे आले होते की, त्यांना पाठवले होते? काय म्हणता, आता पाच वर्षे ‘देवा, देवा’ करत बसण्याशिवाय पर्याय नाही! काय म्हणता? आले देवाजीच्या मना तिथे सत्ता बनवण्यासाठी कुणाचे काही चालेना? बाबा, चला म्हणू या देवा रे देवा! परत कधीतरी देवा मला पावशील का...!
मायमाऊली मुंबई...!
 
मनसेच्या एका नगरसेवकाने म्हटले आहे की, मुंबईत ‘बिहार भवन’ कसे बनते ते मी बघतो. आम्ही ‘बिहार भवन’ बनू देणार नाही.” कदाचित, त्यांच्या मते बिहार म्हणजे देशाबाहेरचे काहीतरी असावे. आता बिहारची नव्याने ओळख सांगायची म्हणजे पूजनीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘ग्राम्यांचा साद्यांत इतिहास अर्हत नोकरशाहीचे बंड’ (गावातील वादांचा इतिहास किंवा नोकरशाहीचा बंड) या पुस्तकाचा संदर्भ अनेकजणांनी यापूर्वीही दिला आहे. त्यामध्ये संदर्भ देणारे लिहितात की, या पुस्तकात प्रबोधनकार लिहितात, "प्राचीन मगध (सध्याच्या बिहारमध्ये)मधून ठाकरे कुटुंब स्थलांतरित झाले. हा समुदाय मगधमधून स्थलांतरित झाला.” प्रबोधनकार हे सत्य तेच लिहिणारे आणि बोलणारे होते. पण, म्हणून ठाकरे कुटुंब कोणे एकेकाळी बिहारहून आले होते, असे कुणीही मराठी माणूस म्हणणार नाही. कारण, संविधानाने भारतीय नागरिकांना संचार-स्वातंत्र्य, निवास-स्वातंत्र्य दिले हे त्यांना माहिती आहे. असो, दिल्लीतील जुने ‘ब्रिहान महाराष्ट्र भवन’ हे १९५०च्या दशकात दिल्लीतील मराठी लोकांनी एकत्र येऊन बांधले होते. मुंबई महानगर परिसरात इतर राज्यांची अधिकृत सदन आहेत.
 
त्यामध्ये ‘आंध्र प्रदेश भवन’, ‘तेलंगण भवन’, ‘राजस्थान भवन’, ‘गुजरात भवन’, ‘कर्नाटक भवन’, ‘केरळ भवन’, ‘उत्तर प्रदेश भवन’ यांचा समावेश आहे. असे सदन आणि भवन बांधण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी मिळणे आवश्यक असणारच. मुंबईमध्ये तीन दशके ठाकरेंची सत्ता होती. प्रांतीय विषमतेची फूट पाडणारे, समाजात विष पेरणारे याबाबत अभ्यास करतील का? दुसरीकडे ही भवन मुंबईत बांधली म्हणून ना महाराष्ट्रात मराठी माणसाचा मान कमी झाला, ना मराठी भाषा लोप पावली. (तसे कधी होणारही नाही). मुंबई सगळ्यांची मायमाऊली आहे. येणार्‍या प्रत्येकाला आसरा देते, कर्तृत्वानुसार मानसन्मान देते हेच सत्य आहे. पण, मुंबईचे हे मायमाऊलीपण प्रांतभेद करणार्‍यांना खटकते. हिंदूंमध्ये फूट पाडण्याची संधी शोधत हा मराठी, तो गुजराती, तो बिहारी, तो मद्रासी, असे रडगाणे ते गातात. मुंबई ही अटकेपार झेंडा फडकवणार्‍या मराठी माणसाची आहे, प्रांतभेद करणार्‍यांची नाही हे यांना कधी कळणार? मायमाऊली मुंबई...!
 
 
Powered By Sangraha 9.0