मुंबई : ( Nitesh Rane ) दक्षिण मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येत असलेल्या जेट्टीच्या कामाला तातडीने गती देऊन ते निविदेत नमूद केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम कोणत्याही कारणास्तव रखडू नये. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून, २५ फेब्रुवारीपर्यंत कामात अपेक्षित गती दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, जेट्टीचे काम निविदेत दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक असून, या कामाचा आठवड्याचा प्रगती अहवाल नियमितपणे सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर काटेकोर देखरेख ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
रेडिओ क्लब जेट्टी पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होणार असून, मुंबई आणि नवी मुंबई यांदरम्यान जलमार्गाद्वारे थेट आणि वेगवान संपर्क प्रस्थापित होईल. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या तसेच तेथून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे नागरिकांना रस्ते वाहतुकीला पर्याय मिळणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.