साताऱ्यातील वाल्मिकी पठारावर देवगांडूळाची नवी प्रजात; देवगांडूळ म्हणजे ?

22 Jan 2026 09:56:30
satara walmik pathar



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
साताऱ्यातील वाल्मिकी पठारावरुन देवगांडूळ म्हणजेच सिसिलियन या उभयचर जीवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (satara walmik pathar). 'जिजिनिआॅफीस' या कुळातील या प्रजातीचे नामकरण वाल्मिकी पठाराच्या नावे 'जिजिनिआॅफीस वाल्मिकी', असे करण्यात आले आहे. (satara walmik pathar)
 
गांडूळासारखे दिसणारे देवगांडूळ हे उभयचर जीव आहेत.देवगांडूळ हा गांडुळासारखा दिसतो. मात्र, ते गांडूळ नसून एक उभयचर प्राणी आहे. गांडूळ हे अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले), तर देवगांडूळ हे पृष्ठवंशीय (कणाधारी) असते. अशा देवगांडूळच्या नव्या प्रजातीचा शोध के.पी.दिनेश, साहील शिकलगार (भारतीय प्राणीशास्त्र विभाग,पुणे), प्रांजल आढाव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), बापूराव जाधव आणि निर्मल कुलकर्णी (म्हादई संशोधन केंद्र, गोवा) यांनी लावला आहे. या शोधाचे वृत्त फायलोमेड्युसा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
 
पश्चिम घाटात देवगांडूळाच्या २६ प्रजाती आढळतात. ज्यामधील ११ प्रजाती या जिजिनिआॅफीस या कुळातील आहेत. गेल्या दहा वर्षात या कुळातून नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला नव्हता. या कुळातील देवगांडूळाच्या प्रजाती या जवळपास अंध असतात. त्या स्पर्शकांद्वारे आसपासच्या अंदाज घेतात. नव्याने शोधण्यात आलेली जिजिनिआॅफीस वाल्मिकी ही प्रजात साताऱ्यातील वाल्मिकी पठरावरील मातीमध्ये आढळते. ती केवळ जून-जुलै या पावसाळी महिन्यांमध्येच दिसते. तिची लांबी १९२ मिलीमीटर इतकी आहे.


साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पळशी-पानेरी गावामधील वाल्मिक पठारावर ऐतिहासिक महत्त्व लाभलेले महर्षी वाल्मिक यांचे मंदिर आहे. या परिसरातून आम्हाला ही प्रजात मिळाल्याने तिचे नामकरण या जागेच्या नावे करण्यात आले आहे. देवगांडूळ हे शेतीसाठी फायदेशीर असून त्यांच्या बीळ खोदण्याच्या प्रक्रियेमुळे जमिनीत वायुवीजन होते आणि त्याची रचनाही सुधारते. - निर्मल कुलकर्णी, संशोधक
Powered By Sangraha 9.0