आज दिनांक २२ जानेवारी... ठीक दोन वर्षांपूर्वी याच दिवशी अयोध्येतील भव्य अशा राम मंदिरात रामललांच्या तेजस्वी, लोभसवाण्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि ५०० वर्षांहून अधिकच्या रामजन्मभूमी लढ्याचे, त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जीवांचे सार्थक झाले. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने अवघा देश दुमदुमला आणि भारतवर्षात दीपोत्सवाप्रमाणेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पण, अयोध्येतील राम मंदिर हा केवळ भारतीय अभिमानाचा परमोच्च क्षण नाही, तर हे मंदिर जागतिक शांतता आणि समृद्धीचा पाया रचणारेही ठरले आहे.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी जगभरातील लाखो रामभक्तांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाग घेतला. तो नयनरम्य सोहळा म्हणजे, साक्षात भारताच्या आध्यात्मिक पुनरुत्थानाचाच प्रारंभ म्हणावा लागेल. प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेली अयोध्या हे केवळ एक शहर नाही; तर ही नगरी एक कालातीत, आध्यात्मिक स्पंदन आहे. अयोध्यानगरी धर्म, सत्य, त्याग आणि आदर्श जीवनाच्या श्रीरामाच्या मूर्तिमंत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते. अयोध्या भारतीय संस्कृती, सनातन धर्म, शाश्वत भक्ती आणि जगामध्ये शांतता आणण्यासाठी, भारताला विश्वगुरू बनवण्याच्या भविष्यातील मार्गाचा प्रकाशस्तंभ म्हणून उभी आहे, तर नव्याने बांधलेले राम मंदिर हे आध्यात्मिक तेजाने तळपत आहे.
श्रीराम मंदिराद्वारे हिंदू तत्त्वज्ञान आणि संस्कृतीची भव्यता प्रदर्शित होते. त्याची विस्तृत रचना, प्राचीन भारताच्या कलात्मक आणि स्थापत्यशास्त्रीय प्रतिभेचे प्रतिनिधित्व करते, पारंपरिक भारतीय कौशल्य, ज्ञान आणि कारागिरी यांचे दर्शन घडविते. त्याच्या भव्य स्थापत्यकलेपलीकडे हे मंदिर भाषिक आणि भौगोलिक अडथळे ओलांडून, हिंदू आणि जागतिक संस्कृतीमध्ये एक शक्ती म्हणून कार्य करते. असे हे भव्यदिव्य राम मंदिर जगभरातील हिंदू समुदायासाठी त्यांच्या पूर्वजांची आठवण करून देणारे आणि सांस्कृतिक अभिमानाचा गौरवबिंदू आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक जोडल्या जाणार्या जगात, हे मंदिर एकतेला प्रोत्साहन देते आणि हिंदू धर्माच्या कालातीत तत्त्वांचे समर्थन करते. अशा या प्रभू श्रीरामांची प्रतिमा केवळ अयोध्या किंवा भारतापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या तेजाची अनुभूती संपूर्ण जगात घेतली जाते. म्हणूनच ते संपूर्ण मानवतेचे प्रतीक आहेत.
हिंदू धर्माच्या संदर्भात, राम मंदिराचे बांधकाम लाखो लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशातील एक महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवते. हे मंदिर केवळ एक भौतिक इमारत असण्यापलीकडे, भगवान रामाचा सन्मान करणारे, आध्यात्मिक पुनर्जन्म, सांस्कृतिक संवर्धन आणि जगभरातील हिंदू आणि मानवतेवर विश्वास ठेवणार्यांच्या हृदयात खोलवर रुजलेल्या तत्त्वांचे प्रतीक आहे. राम मंदिराची कथा हिंदू धर्माच्या नीतिमत्तेशी खोलवर जोडलेली आहे, जी एका पवित्र स्थानी देवाच्या पुनरागमनाची सामायिक इच्छा दर्शवते. हिंदूंसाठी राम मंदिर त्यांच्या प्राचीन वारशाची भौतिक आठवण आणि संस्कृतीच्या शाश्वत चैतन्याचे प्रतीक म्हणून कार्य करते. परिणामी, हे मंदिर आपल्या समाजाच्या मूलभूत तत्त्वांचे आणि रामाच्या गुणांचे प्रतिनिधित्व करते, जे सर्व लोकांना प्रशंसनीय वाटतात.
‘राम’ हा शब्द केवळ आजतागायत टिकून असलेल्या एका प्राचीन संस्कृतीचेच नव्हे, तर भारतवर्षाचेही प्रतीक आहे. हे नाव एक अशी ओळख आणि मूल्य दर्शवते, जे व्यवहार आणि चैतन्याच्या बाबतीत सर्व ऐतिहासिक कालखंडांच्या पलीकडे जाते. भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागातील, तसेच पश्चिम आणि पूर्वेकडील लोककथा लोकांच्या हृदयात आजही जिवंत आहेत. ‘राम’ हे असे नाव आहे, ज्याचा भारताच्या कानाकोपर्यातील मुलांना लहानपणापासूनच आदर वाटतो. त्यांच्या पौराणिक जीवनकथा भारताच्या सीमा ओलांडून आग्नेय आशियाई राष्ट्रांपर्यंत पसरल्या आहेत, जिथे रामायण आजही नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला आणि शिल्पकलेच्या माध्यमातून सर्जनशीलपणे सादर केले जाते.
संस्कृतमधील ‘वाल्मीकी रामायण’, हिंदीतील तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’, तामिळमधील कंबन यांचे ‘रामावतारम्’ आणि श्रीरामाताया महाकाव्याच्या अशा अनेक प्रादेशिक आवृत्त्या हजारो वर्षांपासून संपूर्ण भारतात गुंजत आहेत. भाषा आणि चालीरीतींच्या पलीकडे जाणारी ही समान कथा, भारताला एकसंध करणारा घटक म्हणून रामाची भूमिका अधोरेखित करते. भारताबाहेर ‘रामायणा’चा प्रभाव संपूर्ण आग्नेय आशियामध्ये दिसून येतो; म्यानमार आणि लाओसची कला, थायलंडचे ‘रामाकियन’, कंबोडियाचे ‘रेमकर’ आणि इंडोनेशियाचे ‘काकाविन रामायण’ हे सर्व दाखवून देतात की, रामाची तत्त्वे जागतिक सांस्कृतिक परंपरांमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत. अंगकोर वाटची भव्य स्मारके आणि जावाच्या छाया बाहुल्यांवरून दिसून येते की, रामाची तत्त्वे सार्वत्रिक मान्यता असलेली आहेत.
प्रभू श्रीरामाच्या या भव्य मंदिराकडे भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व म्हणूनही पाहिले जाते. राम मंदिराचे महत्त्व स्थानिक सीमांच्या पलीकडे जाऊन जागतिक स्तरापर्यंत पोहोचते. जेव्हा राष्ट्रे त्यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांची पुनर्व्याख्या करत आहेत, तेव्हा हे मंदिर प्रेम, विश्वास, आंतरराष्ट्रीय बंधुभाव आणि मानवतेच्या सर्व सकारात्मक पैलूंचे प्रतिबिंब ठरले आहे; जे जगभरातील लोकांना आकर्षित करते. इतिहासातील उलथापालथी सहन करुनही अयोध्येचा आत्मा टिकून राहिला, त्याने राष्ट्रीय सीमा ओलांडल्या आणि जगभर त्याचा प्रतिध्वनी उमटला. भारताबाहेर भगवान रामाची पूजा नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया आणि इतर देशांमध्ये केली जाते, हे त्याचेच द्योतक.
हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती, चालीरीती आणि सामाजिक आदर्श संपूर्ण दक्षिण आशियाई उपखंडात पोहोचले. ही वैशिष्ट्ये, तसेच प्रादेशिक राजकीय गतिशीलता राम मंदिरामुळे पुन्हा परिभाषित केली जाऊ शकतात. भारतीय संस्कृतीचे मूलभूत गुण, सर्वसमावेशकता आणि स्वीकारार्हता यांनी ऐतिहासिकदृष्ट्या जगभरातील विविध राष्ट्रे, धर्म, संस्कृती आणि परंपरांमधील राजकीय दरी कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ५०० वर्षांपूर्वीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिर विध्वंसाचे स्मरण करण्याऐवजी शतकानुशतकांच्या लवचीकतेचा आणि भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच रामललाच्या दर्शनाचा उद्देश आपल्या समाजाची मूलभूत तत्त्वे आणि मूल्ये जपण्याचा, त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि येणार्या पिढ्यांसाठी या तत्त्वांची चिरस्थायी आठवण म्हणून काम करण्याचा आहे. अयोध्या राम मंदिरातील रामलला मूर्तीचा ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर त्यामागे बरेच काही होते. ही सभ्यतेच्या जागतिक जागृतीची आणि वसाहतवादाच्या बंधनातून अखेर मुक्त झालेल्या राष्ट्राच्या उदयाची साक्ष आहे.
एका युट्यूब व्हिडिओमध्ये कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याबद्दल भारताचे कौतुक करत म्हटले की, "हे हिंदू संस्कृतीचे एक अभिमानास्पद पुनरुज्जीवन आहे.” कॉर्पोरेट तज्ज्ञ लार्स आरकेटी नोरेन्ग यांनी ‘एस’वर लिहिले, "राम मंदिर ही एक तेजस्वी आठवण आहे की, भारताने केवळ आक्रमणांना तोंड दिले नाही, तर आता तो भरभराटीला येत आहे.” प्राणप्रतिष्ठेची अचूक व्याख्या म्हणजे, जीवनशक्तीची स्थापना, जी रामललाच्या मूर्तीला जीवन देते आणि तिला एका साध्या आकारापासून आशीर्वाद देणार्या आणि प्रार्थना स्वीकारणार्या देवामध्ये रूपांतरित करते. राम मंदिराच्या उभारणीमुळे भारतात सर्वसमावेशकतेच्या एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. हे स्थान आता सामायिक वारशाचे प्रतीक बनले असून, येथे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र येऊन भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. राम मंदिराचा ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा हा भारताच्या लोकांना एकत्र जोडणार्या समान आदर्शांची एक हृदयस्पर्शी आठवण करून देतो. मंदिराची भव्यता ही श्रीरामावरील दृढ श्रद्धेचे, तसेच भूतकाळातील कटुता विसरून समृद्ध भविष्याला स्वीकारण्याच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक आहे.
श्रीरामांना जर आदर्श मानले जात असेल, तर ते केवळ एक दैवीशक्ती आहेत म्हणून नाही; तर त्यांनी मानवी क्षमतेची आणि चिकाटीची अशी पातळी दाखवून दिली, जी चमत्कार आणि अद्भुत गोष्टी घडवू शकते. जन्माने मानव असूनही लहानपणापासूनच्या ज्ञानमय आणि शांत स्वभावामुळे त्यांना दैवीशक्ती म्हणून पूजले जाते. श्रीराम मंदिराच्या कथेला जरी मजबूत हिंदू ‘मुळे’ असली, तरी त्यात एक वैश्विक संदेश आहे. भगवान रामांचे जीवन हे न्याय, कर्तव्य आणि सलोख्याचे उदाहरण आहे, ही मूल्ये सर्व संस्कृती आणि धर्मांमध्ये आढळतात. परिणामी, हे मंदिर हिंदूंसाठी एक पवित्र स्थान असण्यासोबतच जगभरातील सर्व लोकांना उन्नत करणार्या आदर्शांचे प्रतीक आहे.
प्रत्येक भारतीयाची प्रमुख चिंता म्हणून वसाहतवादाची जागा ‘स्व’ विचारांनी घेतली आहे, ज्यात ‘राष्ट्र आणि भारतीय संस्कृती सर्वप्रथम’ या दृष्टिकोनाचा समावेश आहे. यामुळे आपले राष्ट्र आणि समाजजीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये विकासासाठी सज्ज होईल. श्रीराम हे केवळ एक नाव आणि एक व्यक्ती नाहीत, ते प्रेरणेचा एक कालातीत स्रोत आहेत; ज्याने या पवित्र संस्कृतीचे पोषण केले आहे आणि तिच्यात ते खोलवर रुजले आहेत. गेल्या काही दशकांत आपल्या राष्ट्राला अभूतपूर्व प्रमाणावर आपल्या प्राचीन मुळांना स्वीकारताना पाहणे उत्साहवर्धक आहे. भारत आधुनिकता आणि परंपरेत संतुलन साधत असताना आपण हे घोषित करूया की, जिथे मुळे खोलवर रुजलेली असतात, तिथे विजय निश्चित असतो.
- पंकज जयस्वाल