खुदा का नेक बंदा म्हणणाऱ्यांना आज हिंदुत्वाची आठवण झाली आहे - नवनाथ बन

शंकराचार्य यांच्याबाबत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे

    22-Jan-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) "आतापर्यंत खुदा का नेक बंदा असे गाणे उद्धव ठाकरेंवर बनवणाऱ्या आणि मागच्या दाराने सातत्याने राजकारणात जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांना आज हिंदुत्वाची आठवण झाली आहे. त्यांना आता साधू संतांबद्दल कळवळा आलेला आहे. संजय राऊत यांना ही उपरती झाली आहे हे चांगलंच आहे.शंकराचार्य यांच्याबाबत जो काही प्रकार झाला त्याची सखोल चौकशी सुरू आहे." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवार दि.२२ रोजी केले.
 
"पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा तुमचं सरकार होते तेव्हा एक चकार शब्द राऊत यांनी काढला नाही. दोषींना शिक्षा झाली नाही.पण हिंदुत्ववादी मराठी मतांनी मुंबई महानगरपालिकेत जेव्हा यांना झिडकारल तेव्हा आता साधू संतांची आठवण येत आहे.याआधी साधू संतांचा सन्मान केला असता तर ही वेळ उबाठा वर आली नसती. हिंदुत्ववादी मतांनी नाकारल्यामुळेच संजय राऊत वाटण्यासारखे तडतड करीत आहेत.यापुढे खुदा का नेक बंदा म्हणताना थोडासा विचार करा."असेही बन यांनी राऊत यांना सुनावले.
 
"कर्मा रिटर्न नावाचा एक सिद्धांत आहे.२०१९ ला महायुती म्हणून शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा राऊत यांना नीतिमत्ता आठवली नाही.आता कल्याण डोंबिवलीत मनसे उबाठासोबत लढली आणि पाठिंबा शिवसेनेला दिला तेव्हा नितीमत्ता आठवते. मनसेने व्यापक हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी हा निर्णय घेतला त्यांचे आम्ही स्वागत करतो." असेही बन यांनी प्रत्युत्तर दिले.
 
हेही वाचा : रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाला गती द्या; मंत्री नितेश राणेंकडून प्रकल्पाचा आढावा
 
"विकास आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. विकास आणि उबाठा यांचा काहीही संबंध नाही.यांना मलिदा,घोटाळा, कमिशन, खंडणी असे शब्द आवडतात त्यामुळे विकास हा शब्द असंसदीय वाटतो. विकास म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा. म्हणूनच मुंबईत आम्ही कोस्टल रोड, मेट्रो,अटल सेतू आणला. उबाठा ने विकासाची एक गोष्ट सांगावी." असा प्रश्न बन यांनी उपस्थित केला.
 
"मुंबई,ठाणे,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली याठिकाणी भाजपा आणि महायुतीचाच महापौर होणार कारण जनतेने महायुती म्हणूनच कौल दिला आहे.मनसेच नुकसान करायचं काम उबाठाने केले आहे. गेल्यावेळी मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते यावेळी उबाठा सोबत जाऊन मनसेचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले आहेत.याचा विचार राज ठाकरेंनी करावा.कारण उबाठाने मनसेचा केसाने गळा कापला आहे.धोका देण्याच राजकारण उबाठाचे आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
"भाजपची परंपरा पैसे वाटून निवडणुका जिंकण्याची नाही हे आमदार नारायण कुचे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही जनतेच्या आशीर्वादावर निवडणुका लढतो आणि जिंकतो.जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याचे काम केले जात आहे पण जनता भाजपसोबत आहे." असे स्पष्टीकरण बन यांनी दिले.