मायमराठीच्या साहित्यविश्वातील ‘पंतकाव्यरूपी’ एक सुवर्णपान पुन्हा मराठी सारस्वतांसमोर मांडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या यशोधन एकतारे यांच्याविषयी...
मराठी साहित्यविश्वात संत, पंत आणि तंत यांची काव्ये प्रसिद्ध. यापैकी संतकाव्ये खरंच अभंग आहेत. संतांचे अनेक अभंग आजही मराठी सारस्वताच्या ओठी असतात. तंतकाव्ये म्हणजे थोडक्यात शाहिरीबाजाचे काव्य. राम जोशी, होनाजी बाळा, अनंत फंदी यांच्या लावणी-पोवाड्यांनीही मराठी साहित्यसंपदा समृद्ध केली. मात्र, काळाच्या ओघात थोडेसे दुर्लक्ष झालेले काव्य म्हणजे पंतकाव्य होय! वामन पंडितांचे ‘श्लोक’ असो अथवा मोरोपंत यांच्या ‘आर्या’ पूर्वीच्या काळी शाळेत विद्यार्थी घोकून पाठ करत. त्यानंतर सुलभतेच्या नावाखाली मराठी भाषेतील हा समृद्ध ठेवाही दुर्लक्षित झाला. तरीही, त्याचा अभ्यास करणारी मंडळी आजही समाजामध्ये आहेत. यापैकी एक नाव म्हणजे यशोधन एकतारे!
नागपूरमध्ये यशोधन यांचा जन्म झाला. त्यानंतरचा काहीकाळ नागपुरात गेला असला, तरी सातवीपर्यंत यशोधन यांना पालकांबरोबर इंदोर ते ओमान असा प्रवास करावा लागला. इयत्ता सातवीपासून त्यांचे पुन्हा नागपुरात शिक्षण सुरू झाले. यशोधन यांच्या घरात शिक्षणाची उज्ज्वल परंपरा. त्यांचे आजोबा विधीज्ञ, तर आजीने मराठी विषयात ‘एमफिल’पर्यंतचे शिक्षण घेतलेले. उच्चशिक्षणाची परंपरा यशोधन यांच्या आई-वडिलांनीही सांभाळली. यशोधन यांचे वडील अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून, आईने वनस्पतीशास्त्र विषयामध्ये ‘पीएचडी’ मिळवली आहे. यशोधन यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण ‘बीटेक मेटॅलोलॉजी’ विषयात केले असून, पुढे याच विषयात ‘आयआयटी, हैदराबाद’ येथून पदव्युत्तर शिक्षणही घेतले.
यशोधन यांचे सारेच शिक्षण विज्ञान शाखेत झाले असले, तरी शिक्षणाबरोबरच साहित्य वाचनाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. यशोधन यांच्या आजी-आजोबांना वाचनाची आवड असल्याने त्यांनी सातवीनंतर यशोधन यांनाही जवळ बसवून एक-एक पुस्तके वाचून दाखवली. मराठी साहित्यातील अनेक वृत्तांच्या चालीची ओळख याच काळात यशोधन यांना झाली, त्याचबरोबर वाचनाची आवड लागली ती निराळीच. याचदरम्यान यशोधन यांना पंतकाव्याचीही ओळख झाली. इयत्ता सातवी-आठवीमध्येच यशोधन यांना रघुनाथ पंडितांच्या ‘नल-दमयंती स्वयंवर’मधील किमान ५० ते ६० श्लोक कंठस्थ झाले होते. नंतरच्या काळात कीर्तने आणि प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानात भर पडली.
जात्याच बुद्धीचा तरल भाव असल्याने यशोधन यांनी कीर्तनकार आणि प्रवचनकारांकडून निरनिराळ्या वृत्तांची अधिक माहिती मिळवली. मिळालेल्या या ज्ञानाचा उपयोग घरातील पुस्तके वाचण्यासाठी यशोधन यांनी केला. यशोधन यांच्या घरात पणजोबांपासूनची एकूण दोन हजारांच्या आसपास पुस्तके आहेत. यशोधन यांनी आतापर्यंत जवळपास त्यातील ७०० पुस्तके वाचली आहेत. यातूनच पुढे पंतकाव्यावर त्यांचे प्रेम जडले. यशोधन यांच्या पंतकाव्यातील प्रेमाचा प्रवास रघुनाथ पंडित ते मोरोपंत असा आहे. पण, मोरोपंतांच्या काव्यापेक्षा यशोधन यांना रघुनाथ पंडित किंवा वामन पंडित यांचे काव्यच तुलनात्मकदृष्ट्या सुलभ वाटले. तरीही, मोरोपंत समजून घेण्याची त्यांची तळमळ मोठीच. त्यामुळे मोरोपंताचे साहित्य वाचनाची त्यांनी सुरुवात केली. एकेक ‘आर्या’ घेऊन त्यातील सौंदर्य उलगडत जाण्याचा छंदच पुढे यशोधन यांना जडला.
सध्या पंत-साहित्याचा अधिक सखोल अभ्यास यशोधन करत आहेत. अर्थार्जन जरी तांत्रिक क्षेत्रात असले, तरी दोन्ही बाजू सांभाळण्याचे कसब त्यांनी लीलया अंगीकारले आहे, ही वाखाणण्याजोगीच बाब! सध्या पंतकाव्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी ‘पंतवाड्मय अभ्यासक’ नावाने समूह सुरू असून, यामध्ये जवळपास ५३ जण त्यांच्याशी सक्रियरित्या जोडले गेले आहेत. शिवाय, सज्जनगडावरही दरवर्षी पंत-साहित्याच्या मेळावा साजरा होतो. त्यामध्येही दरवर्षी १०० ते १५० जण राज्यभरातून सहभागी होतात. सध्या पंतकाव्यावर सखोल भाष्य करण्याचे काम यशोधन करत असून, भविष्यात त्यांना मोरोपंतांची अत्यंत कठीण मानली गेलेली साहित्यकृती ‘कृष्णविजय’ यावरही टीकात्मक भाष्य करायचे आहे.
हे कार्य एकट्याने शक्य नसल्याने, ‘बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे’ या समर्थांच्या शिकवणीप्रमाणे करणार असल्याचे यशोधन सांगतात. यशोधन यांच्या या कार्यासाठी त्यांना नागपूरच्या प्रसिद्ध दक्षिणामूर्ती मंदिराकडून ‘धर्मकवी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजी-आजोबा या कुटुंबातील संस्थेचे महत्वही यशोधन यांच्या प्रवासाने या ठायी अधिक ठळक होते. मायमराठीच्या साहित्यविश्वातील एक ‘सुवर्णपान’ पुन्हा मराठी सारस्वतांच्या समोर मांडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या यशोधन एकतारे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा.
- कौस्तुभ वीरकर