दि. ७ ते ९ जानेवारी रोजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐम्फी थिएटर येथे कर्णबधिरांच्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्यांची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. ‘नॅशनल कन्व्हेंशन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डेफ’ (एनसीईडी-इंडिया) आणि ‘अलियावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था’ आणि ‘कॉकलिआ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांगतेच्या दृष्टिकोनातून व संशोधनाच्या आधारे समावेशक शिक्षण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषद आयोजित करण्यात आली होती. नऊ संशोधनात्मक पेपर्स, ११ पोस्टर्स, तसेच दहा तज्ज्ञ व्यक्तींची भाषणे हे या परिषदेचे वैशिष्ट्य! कर्णबधिर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरलेली ही ९१वी परिषद!त्याचा हा धावता आलेख...
महाराष्ट्रात हजारांहून अधिक दिव्यांगांसाठी कार्यरत कर्मशाळा आहेत. मात्र, त्यांचे नाव बदलून ‘कौशल्यशाळा’करणे आवश्यक आहे. मुलांना कौशल्यक्षम करणे, मिळणार्या सवलती दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचतात की, नाही याकडे लक्ष ठेवून त्यांचे सक्षमीकरण नीट होतेय ना, याला महत्त्व देणे गरजेचे आहे. केवळ कागदावर दाखविण्यापुरती मदत न राहता; रोजच्या व्यवहारात त्या मदतीचा उपयोग व्हावा. याकडे हृदयातून लक्ष ठेवत उर्वरित आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित, संशोधनाधारित सर्वसमावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी महत्त्वाची असून, शासन यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मान. तुकाराम मुंढे यांनी केले.
‘नॅशनल कन्व्हेंशन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डेफ’ आणि ‘अलियावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था’ आणि ‘कॉकलिआ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘दिव्यांगतेच्या दृष्टिकोनातून व संशोधनाच्या आधारे समावेशक शिक्षण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरची तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी उद्घाटन करताना सचिव मान. तुकाराम मुंढे यांनी वरील उद्गार काढले. परिषदेत देशभरातून ३५० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी ‘अलियावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्थे’चे संचालक डॉ. सुमनकुमार, ‘एनसीईडी-इंडिया’च्या अध्यक्षा डॉ. मीरा सुरेश, ‘कॉकलिआ’ संस्थेचे विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, ‘एनसीईडी-इंडिया’च्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा शुभदा बुर्डे, उपाध्यक्षा, प्राचार्या डॉ. अस्मिता हुद्दार, शिक्षण विभागप्रमुख डॉ. गायत्री आहुजा, राष्ट्रीय कार्यवाह शिल्पी नारंग, तसेच महाराष्ट्र विभागाच्या कार्यवाह रक्षा देशपांडे आणि त्यांची टीम तसेच ‘एनसीई-इंडिया’च्या उपाध्यक्ष लता नायक, साधना सप्रे आदी मान्यवर पूर्णवेळ उपस्थित होते. संपन्न झालेल्या या परिषदेत सचिव तुकाराम मुंढे यांनी शिक्षकांची भूमिकाही अधोरेखित केली. ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६’ संविधानिक तरतुदी आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वत्रिक सुलभता, समानता व सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व मुंढे यांनी अधोरेखित केले.लहानपणापासून आपला भाऊ दिव्यांग असल्याने त्यातून वाट काढताना आलेल्या अडचणी आणि भावाने अडचणींवर मात करून मिळविलेले यश याचा लेखाजोखा मांडताना, प्रसंगी भावूक होत, निर्धाराने केलेली मात, वाटणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून प्रतित होत होता.
दिव्यांगता व सर्वसमावेशक शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. सुमनकुमार यांनी विशद केली, तर डॉ. वाचासुंदर यांनी समावेशक शिक्षणातील सद्यस्थिती व आव्हाने यावर उपस्थितांना संबोधित केले. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना सातत्याने कोणते तरी प्रशिक्षण चालूच असते. परंतु, विशेष शिक्षकांना अशा प्रशिक्षणासाठी कधीच गणले जात नाही. विशेष शिक्षक ‘भारतीय पुनर्वास परिषद’ म्हणजेच ‘आरसीआय’चे मान्यताप्राप्त शिक्षक असतात. ठरावीक काळाने शिक्षकांना ‘आरसीआय’ प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे अपरिहार्य असते. दोन वा तीन दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ठरावीक गुण प्राप्त करून प्रमाणपत्राचे नूतनीकरण होते. विशेष वा सामान्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना व्याख्यानांसाठी बोलाविले जाते. तो छोटेखानी अभ्यासक्रम वा प्रशिक्षण मूल्यांकनासह पूर्ण झाल्यावरच गुण प्राप्त होतात. म्हणजेच, विशेष शाळांतील शिक्षकांना अशा प्रशिक्षणांचा सातत्याने मागोवा घ्यावा लागतो. अशा कार्यरतांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिषद गेली ९०वर्षे सातत्याने सुरू आहे. ‘एनसीईडी-इंडिया’तर्फे दरवर्षी भारतातल्या वेगवेगळ्या भागात परिषदेचे आयोजन होत असते. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, महाराष्ट्र असे १२ विभाग कार्यरत आहेत.
यावेळच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अमेरिका, स्वीडन, सिंगापूर येथील तज्ज्ञ, तसेच विविध शिक्षण क्षेत्रातील कार्यरत वक्त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यापन व शिक्षणाच्या व्यवस्थापनात ‘सामाजिक आणि भावनिकता’ यावर बोलताना अमेरिकास्थित ३० वर्षांचा विशेष शिक्षणातील अनुभव असणार्या डॉ. शिवानी पंडित यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यातून मुलांचा आत्मविश्वास, मैत्रीचे अधिष्ठान, वर्गातील परस्पर आदर, दयाळूपणा, निर्णयक्षमता अशा गुणांचे पोषण कसे होते, हे विस्ताराने सांगितले. कावेरी सेंटर, पुणे इथे कार्यरत असणार्या देवसेना देसाई ‘तल्लख मूल आणि गिफ्टेड लर्नर’ यांबद्दल बोलल्या.एखाद्या विषयात अगदी उत्तम प्रगती करणारे मूल, दुसर्या विषयात मात्र त्याला झगडावे लागते. अशा मुलाच्या न असणार्या गुणवत्तेपेक्षा ‘जे आहे’ त्याबद्दल बोलणे कसे आवश्यक असते, याबद्दल उत्तम मार्गदर्शन त्यांनी केले. ऐकताना प्रत्येक शिक्षकाच्या डोळ्यासमोर वर्गातील असा विद्यार्थी येत होता. कर्णबधिर मुले, पालक, त्यांचे प्रश्न याबद्दल मुक्त संवाद शिल्पी नारंग या दिल्लीस्थित तज्ज्ञांनी संचलित केला, ज्यातून उपस्थितांना अनेक वास्तवांचे आकलन झाले.
वर्गातील शिकवण्याचा आनंद आधी शिक्षकांनी स्वतः घेतला, तरच तो मुलांपर्यंत पोहोचतो. वयानुरूप भाषा, भाषेचा पाया कसा पक्का असावा? अशा अनेक मुद्द्यांना ‘लिसनिंग टुगेदर’ या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या संचालिका (पालक, व्यावसायिकांसाठी कार्यरत) अमेरिकेच्या डॉ. उमा सोमण यांनी अधोरेखित केले. बहीण कर्णबधिर असलेल्या, मूळच्या पुण्यात रुजलेल्या, फर्ग्युसनमध्ये शिकलेल्या उमाताई बोलताना भावूक झाल्या. ठाण्यातील ‘आत्मन’ संस्थेच्या डॉ. मंजुश्री पाटील यांनी संस्थेतील चालक ते संचालक; ‘मावशी ते मॅनेजर’ असे सगळेच कसे समन्वयाने काम करू शकतात, प्रत्येकाचा सहभाग कसा मोलाचा आहे, हे स्पष्ट करताना अत्यंत उत्साहाने सादरीकरण केले. दिव्यांगांसाठी कार्यरत वकील, ‘त्रिनयनी’ संस्थेच्या माध्यमातून माहितीपट, लघुपट, चित्रपट बनवणार्या रितिका सहानी यांनी छोट्या-छोट्या फिल्म्स दाखवून उपस्थितांना नवी दृष्टी दिली. अशक्य ते शक्य करण्याची ऊर्जा देणारे सादरीकरण स्वीडनच्या संगीता बग्गा-गुप्ता यांनी केले. सिंगापूरच्या शिल्पा मदाने यांनी दूरस्थ पद्धतीने समावेशकतेवर मार्गदर्शन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्णबधिर असूनही राष्ट्रीय पातळीवरचे नेते, संशोधक, तज्ज्ञ, सांकेतिक भाषेत प्रवीण, प्रेरणादायी वक्ते, सुनील सहस्त्रबुद्धे! एखाद्या क्षेत्रातला आदर्श, ज्याकडे बघून कसे वागावे ते कळते, तो आदर्श म्हणजे ह्युमन लायब्ररी! यावर त्यांनी प्रभावी मते मांडली.तसेच, मुख्य आयुक्त दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार श्री. गोविंदराज यांनी दूरस्थ पद्धतीने परिषदेला मार्गदर्शन केले.
तीनही दिवस सांकेतिक भाषेतील दुभाषांनी उत्तम काम केले. नऊ संशोधनपर पेपर, ११ पोस्टर्सचे सादरीकरण झाले. अखेरच्या सत्रात उत्कृष्ट संशोधन पेपर्स आणि पोस्टर्सना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आजवर ‘एनसीईडी-इंडिया’ महाराष्ट्र शाखेने मुंबई, नागपूर, नाशिकला परिषदेचे आयोजन केले होते. दुसर्या दिवशी संध्याकाळी पुणेस्थित शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्य-कलेचे छान सादरीकरण केले. दरवर्षीप्रमाणेच स्मरणिकेचे प्रकाशन झाले; ज्यात सादरीकरणाच्या पेपरचे सारांश, तज्ज्ञ वक्ते, मार्गदर्शक यांची ओळख,नि परिषदेची माहिती असते. परिषदेच्या निमित्ताने श्रवणयंत्रे, आधुनिक तंत्रज्ञान, उपयुक्त पुस्तके यांचे प्रदर्शन आणि विक्री असते. राज्यस्तरावर शिक्षकांसाठी कार्यशाळा, व्याख्याने, प्रशिक्षणे चालू असतात. आजवर दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, इंदौर, बडोदा, नागपूर, केरळ अशा ठिकाणी परिषदांचे आयोजन झाले आहे. स्वयंसेवकांच्या अखंड मेहनतीने परिषद यशस्वी झाली.
"सातत्याने नवीन शिकेन, माझे २०० टक्के मुलांना देईन, माझ्या विद्यार्थ्याचे आध्यात्मिक उन्नयन ही माझी जबाबदारी, मुलांच्या गरजा मला समजतील, प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार मी शिकवण्यात सुधारणा करीन, पालक माझे उत्तम सहकारी असतील,” शेवटच्या सत्रात अध्यक्षा शुभदा बुर्डे यांनी शिक्षकांना शपथेची उपरोक्त सप्तपदी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणखी नवीन काय करू शकतो, या विचारांची शिदोरी गाठीला बांधून आपल्या शाळेत परतणारे शिक्षक नावीन्याचा ध्यास उराशी बाळगतात, एवढे खरे! विशेष शिक्षण क्षेत्रात असे नावीन्यपूर्ण सातत्याने घडत आहे, हीच सकारात्मक बाब आहे. आमचे कर्णबधिर विद्यार्थी बोलून संपर्क साधतातच. शिवाय, ‘एमबीए’, ‘एमसीए’, ‘बीई’, ‘ऑडिओलॉजिस्ट’ असे उच्चशिक्षित मान्यवर आस्थापनात कार्यरत आहेत. एक तर ‘पद्मश्री’ प्राप्त! लहान वयात भाषेचा पाया पक्का झाला की, भाषेची इमारत डळमळीत होत नाही, आयुष्याला स्थैर्य येते, याची ही उदाहरणे आहेत. एकंदरीत अनुभव, कौशल्य, निपुणतेची पुंजी घेऊन शिक्षक घरी परतले, एवढे मात्र खरे!
- शोभा नाखरे