ज्येष्ठ स्वयंसेवक, लेखक, विचारवंत, विधान परिषदेचे माजी आमदार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोकराव मोडक यांना सोमवार, दि.२ जानेवारी रोजी देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली अर्पित करण्यासाठी आज, बुधवार दि. २१ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभेचे मुंबईतील प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या श्रद्धांजली सभेस रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने प्रा. अशोकराव मोडक यांचा प्रदीर्घ काळ सहवास लाभलेले प्रा. श्याम अत्रे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
काही व्यक्तींच्या बाबतीत ‘सिर्फ नाम ही काफी हैं’ असे म्हणतात. डॉ. अशोकराव मोडक या गटात मोडतात. माझी व त्यांची मैत्री ६० वर्षांहून अधिक जुनी. १९६२ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी मी चाळीसगाव येथील महाविद्यालयात दाखल झालो. १९६३ साली अर्थशास्त्रात ‘एमए’ झालेला अशोक गजानन मोडक या नावाचा एक तरुण प्राध्यापक त्याच महाविद्यालयात रुजू झाला. पुढे दोन वर्षे त्यांनी मला ‘अर्थशास्त्र’ हा विषय शिकविला. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी मला संघ शिकविला. संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. प्राध्यापक म्हणजे समाजातील वलयांकित वर्ग. ती प्रतिमा दूर सारून अर्ध्या चड्डीत दररोज संघस्थानावर येणारे अशोकराव मी पाहिले. हे काहीतरी वेगळेच रसायन आहे, अशी माझी खात्री झाली. त्याकाळी हे महाविद्यालय आ. बं. हायस्कूलच्या आवारात भरत असे. त्याच्याच समोरील रस्त्यावर लक्ष्मणराव गवळी यांचे हॉटेल होते. शाखा सुटल्यावर तिथेच गप्पांचा अड्डा जमायचा. विविध विषयांवर चर्चा होई. त्याला एक वैचारिक शिस्त लावण्याचे काम अशोकराव करीत. तो रस्ता ओलांडला की, नदीकाठी चर्मकारांची वस्ती होती. अशोकरावांनी त्या वस्तीशी संपर्क वाढविला. हळूहळू त्या वस्तीतील तरुण संघशाखेत येऊ लागले. आपल्या मोडक्यातोडक्या घरांत हा प्राध्यापक माणूस मांडी घालून जमिनीवर चहा प्यायला बसतो, याचेच त्या मंडळींना अप्रूप होते. त्याच वस्तीतून संपर्कात आलेला बन्सी अंदोरे हा स्वयंसेवक पुढे भारतीय मजदूर संघाचा मोठा कार्यकर्ता झाला.
केवळ चर्मकार वस्तीतच नव्हे, तर इतरही अलक्षित वस्तीत अशोकरावांची उठबस सुरू झाली. विद्यार्थी, संघ स्वयंसेवक, जनसंघ कार्यकर्ते व समाजधुरीण अशांच्या वर्तुळात त्यांचा वावर सुरू झाला. हा, हा म्हणता वर्षभरात ‘मोडक सर’ हा चाळीसगावात परवलीचा शब्द होऊन गेला. ‘समरसता’ या संकल्पनेचा संघात जन्मही झाला नव्हता, तेव्हा समरसतेचा व्यवहार मोडकांनी जनमानसात रुजविला. कोणताही अभिनिवेश मनात न ठेवता संपर्क, संवाद, साहचर्य व सहकार या चतु:सूत्रीच्या माध्यमातून त्यांनी हे कार्य केले. विचार आणि व्यवहार यांच्या एकरूपतेत किती ताकद असते, हेच अशोकरावांनी अधोरेखित करून ठेवले.
‘अभाविप’च्या प्रा. यशवंतराव केळकरांनी आपल्या तालमीत जे गुणवत्तापूर्ण कार्यकर्ते घडविले, त्यातील एक म्हणजे प्रा. मोडक. रा. स्व. संघाच्या कामाबरोबरच त्यांनी ‘अभाविप’च्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली.
उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत ‘अभाविप’च्या कार्याचा विस्तार करण्याची जबाबदारी प्रा. मोडक यांच्यावर होती. त्यामुळे दर शनिवार-रविवारी ते आपल्या कार्यक्षेत्रात प्रवास करीत. पुन्हा मार्ग तोच; संपर्क, संवाद, साहचर्य आणि सहकार्य. त्या-त्या शहरातील महाविद्यालये, तेथील प्राध्यापक, संघ स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थी यांच्याशी होणार्या भेटीगाठीतून, चर्चेतून, पत्रव्यवहारातून त्यांनी त्या-त्या शहरात ‘अभाविप’चा विचार व प्रत्यक्ष संघटनात्मक कार्य रुजविले. संघाच्या शिस्तीत येथील रचना लावण्याचा प्रयत्न केला. रूढ अर्थाने, ते प्रचारक वा पूर्णकालीन कार्यकर्ते नव्हते; पण त्यांचा व्यवहार मात्र त्याच तोडीचा होता.
याच काळात स्वत: यशवंतराव, बाळ आपटे, सुरेशराव मोडक, सुरेश साठे, हर्षवर्धन जतकर, राजा मोगल, पद्मनाभ आचार्य यांचा संघटनात्मक कामासाठी चाळीसगावी प्रवास होत असे. कार्यक्षम कार्यकर्त्यांची उत्तम टीम केळकरांनी बांधली होती. त्याचा उपयोग अशोकरावांना पुढे मुंबई महानगरात ‘अभाविप’चे जाळे उभे करण्यात झाला. पुढे मुंबईबरोबरच महाराष्ट्र प्रांत प्रमुख अशीही जबाबदारी त्यांच्याकडे आली. यशवंतरावांनी घालून दिलेल्या संघटन सूत्रांच्या आधारे ‘अभाविप’च्या कार्याचा विकास व विस्तार झाला. याची स्वाभाविक परिणती म्हणजे ते ‘अभाविप’चे अखिल भारतीय अध्यक्षही झाले. या संघटनेला सैद्धांतिक व व्यावहारिक रूप देण्याच्या कामातही त्यांचे योगदान मोठे आहे. ते ‘अभाविप’चे अध्यक्ष असताना रा. स्व. संघाचे विद्यमान सरकार्यवाह मा. दत्ताजी होसबाळे हे ‘अभाविप’चे कर्नाटक प्रांताचे संघटनमंत्री होते. ते राष्ट्रीय टीमचे सदस्यही होते. "आपल्या जडणघडणीत अशोकरावांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे,” असे ते म्हणतात. अशोकरावांच्या या सर्व विकासाचा पाया चाळीसगावात घातला गेला, हे महत्त्वाचे.
अशोकराव हे कुशल संघटक तर होतेच; पण ते ज्ञानमार्गी विचारवंतही होते. प्रतिभा, प्रज्ञा आणि ज्ञान यांचा सुरेश संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. चाळीसगावी प्राध्यापकी चालू असतानाच त्यांना दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात ‘एमए’ केले व संशोधनासाठी ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेतला. ‘रशियन एड टू इंडिया’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्याच निमित्ताने त्यांचा रशियात मॉस्को येथे अभ्यास करण्याची संधी मिळाली. तेथील अध्ययन व संशोधन पूर्ण करून त्यांनी आपला प्रबंध सिद्ध केला व ‘पीएचडी’ पदवी मिळविली. त्यानंतर १९७१-७३ या काळात ते पुन्हा चाळीसगावी प्राध्यापकी करू लागले. त्याच काळात माझेही ‘एमए’ (इंग्रजी) पूर्ण झाले होते आणि मी त्याच महाविद्यालयात डॉ. मोडक यांचा सहकारी म्हणून काम करू लागलो, हे माझे भाग्य. पुढे ते मुंबईच्या रुईया महाविद्यालयात व अखेरच्या टप्प्यात मुंबई विद्यापीठातील ‘रशियन स्टडीज’ या विभागात शिक्षण व संशोधनाचे कार्य करू लागले.
या सर्व काळात संघटनात्मक सर्व जबाबदार्या पार पाडत असतानाच, त्यांनी आपले वाचन, चिंतन, अध्ययन, संशोधन व लेखन सुरू ठेवले. परिणामी, ४०हून अधिक ग्रंथांचे लेखन, शेकडो लेख आणि १००हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांसाठी त्यांनी केलेले शोधनिबंध लेखन त्यांच्या ज्ञानमार्गावरील अथक वाटचालीची साथ देतात. कर्करोगाशी झुंज देतानाही यात कधी खंड पडला नाही. पाश्चात्त्य विचार, भारतीय धर्म आणि संस्कृती, हिंदुत्व, राष्ट्रवाद, समरसता, एकात्म मानव दर्शन हे त्यांच्या अखंड चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. अशोकराव मेधावी व अफाट वक्ते होते. तलस्पर्शी चिंतनातून त्यांचे ससंदर्भ होणारे व्याख्यान म्हणजे बौद्धिक मेजवानीच असे. प्रांत व देशपातळीवरील अधिवेशने व अभ्यासवर्ग यातील त्यांची भाषणे आखीव-रेखीव असत. ‘अभाविप’चे कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते व परिचित यांच्याशी त्यांचा प्रचंड पत्रव्यवहार होता. त्यातूनच माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण झाली. हेच त्यांच्या ज्ञानमार्गावरील वाटचालीचे एकूण फलित होते.
राजकारण हा अशोकरावांचा पिंड नव्हता. आपद्धर्म म्हणून ते राजकारणात होते. ते दोनदा महाराष्ट्र विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघातून निर्वाचित झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या मतदारसंघात रचनात्मक व विधायक कार्य केले. आपले कार्यक्षेत्र अक्षरश: पिंजून काढले. म्हणून त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पुरस्कारही मिळाला. मात्र, त्यांच्या प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचा जेवढा सदुपयोग व्हायला हवा होता, तेवढा झाला नाही. त्यांनी मात्र आपले काम संघटन असो, ज्ञानमार्ग असो वा राजकारण आपल्या सचोटीने, निष्ठेने व निरपेक्ष वृत्तीने केले. राजकारणात पडूनही ते कधीच बनचुके राजकारणी झाले नाहीत. १२ वर्षे आमदार राहूनही त्यांच्याजवळ स्वत:चे असे चारचाकी वाहन नव्हते. अशोकराव राजकारणाच्या दलदलित, चिखलात राहूनही ते निष्कलंक कमळ होते.
स्वातंत्र्योत्तर समाजकारण व राजकारण यांचे चित्र रेखाटताना प्राचार्य के. रं. शिरवाडकर ‘आपले विचारविश्व’ या ग्रंथात म्हणतात, "सध्याचे दिवस हे विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. सध्या सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य व नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे आणि हे धोक्याचे आहे (प्रस्तावनेतून).” या पार्श्वभूमीवर अशोकरावांचे राजकारणात असणे दीपस्तंभासारखे आहे. कविवर्य भा. रा. तांबे यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘राजकारणातील तळ्यात असलेल्या बदकांच्या मांदियाळीत प्रा. डॉ. अशोकराव मोडक हे ‘राजहंस’ होते’, हेच खरे. हाच त्यांच्या निरपेक्ष राजकीय जीवनाचा सारांश होता. त्यांच्या पुण्यप्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन!
- प्रा. श्याम अत्रे