UBT: ठाकरे गटात खळबळ! ४ नवनिर्वाचित नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

20 Jan 2026 12:40:19
 
UBT
 
मुंबई : (UBT) कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी ताकद असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मिळवलेल्या अनपेक्षित यशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, चार नवनिर्वाचित नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गटनेता निवडीच्या बैठकीआधीच हे नाट्य घडल्याने संभाव्य बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. (UBT)
 
गटनेता निवडीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देणारे पत्र स्वीकारण्यासाठी हे चारही नगरसेवक उपलब्ध नव्हते. अखेर जिल्हाप्रमुखांच्या स्वाक्षरीचे आदेशपत्र त्यांच्या घरांच्या दरवाज्यावर चिकटवण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख शरद पाटील यांनी दिली. “उद्या कोणी ‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत’ असा दावा करू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे,” असे पाटील म्हणाले. दरम्यान, उर्वरित नगरसेवक व पदाधिकारी ‘मातोश्री’कडे रवाना झाले असून, तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्याच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहेत. (UBT)
 
हेही वाचा : Amit Thackeray: अमित ठाकरे यांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, "प्रभागातील समस्या सोडवण्याऐवजी...."
 
‘नॉट रिचेबल’ असलेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे आणि ॲड. कीर्ती ढोणे यांचा समावेश आहे. हे दोघे मूळचे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते असून, तिकीट न मिळाल्याने त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. विजयानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे आणि त्यानंतरच ते संपर्काबाहेर गेल्याचे माध्यमांवरून समजत आहे. (UBT)
 
तसेच प्रभाग ४ मधील राहुल कोट आणि प्रभाग ६ मधील स्वप्नाली केणे हे मनसेचे कार्यकर्ते असून, ठाकरे गटाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. हे दोघे मनसे नेत्यांच्या भेटीला गेल्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. (UBT)
 
 
Powered By Sangraha 9.0