बांगलादेशी घुसखोर, पाकच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर बसवण्याचे 'उबाठा' चे स्वप्न धुळीला मिळाले

20 Jan 2026 18:01:14
Nawanath Ban Targets Sanjay Raut
 
मुंबई : ( Nawanath Ban ) "विकास, सुशासन आणि पारदर्शकतेला मतदारांनी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा-महायुतीला स्पष्ट कौल देऊनही संजय राऊत हे अस्तित्वाच्या भीतीपोटी नाहक नगरसेवक फोडाफोडी, महापौर कुणाचा होणार यावरून संशयकल्लोळ तयार करत आहेत. बांगलादेशी घुसखोरांच्या पाठिंब्यावर, पाकच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर बसवण्याचे उबाठा गट, विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.मुंबईचा महापौर हिंदू, मराठी होणार असे वारंवार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही, संजय राऊत सौदेबाजी करण्याची उबाठा गटाची परंपरा कायम राखून आहेत." असे शरसंधान भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवार दि.२० रोजी साधले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
बन म्हणाले की," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि मुंबईचा विकासाचा गाडा पुढे नेण्याचे काम भाजपा महायुती करत आहे. दिल्लीत भाजपा-महायुतीचे कोणते नेते गेले यावर राऊतांनी बोलण्यापेक्षा ज्या मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असतानाही उबाठा गटाला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणता आले नाहीत यावर आत्मपरिक्षण करावे." "भाजपा महायुतीचे नेते दिल्लीत गेले तर त्यात गैर काय आहे असा सवाल बन यांनी केला. "सत्तेसाठी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांचे लांगुलचालन करणे, सोनियांच्या पायावर पक्ष अर्पण करणे या कृत्यातून उद्धव ठाकरे आणि राऊतांनी राज्याचा अपमान केला आहे."
 
हेही वाचा : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी
 
"वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, वारसा, हिंदुत्वाला तिलांजली देऊन अजान स्पर्धा घेतली, पत्राचाळ घोटाळा केल्याबद्दल बाळासाहेबांनी राऊतांना लाथा घातल्या असत्या. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचाही अधिकार राऊतांना नाही. त्यांच्या विचारांशी प्रतारणा करणा-यांना महाराष्ट्रातील मतदारांनी महापालिका निवडणुकीत जागा दाखवली."असेही त्यांनी स्पष्ट केले.
"दावोसमध्ये महापौरपदाची चर्चा करण्याचे कारण नाही. महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपा महायुतीच्या विकासाच्या धोरणाला स्पष्ट कौल देत विजयी केले आहे. भाजपा विजयाचा उन्माद कधीच करत नाही. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री लागलीच दावोसमध्ये गेले. महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणणे हेच त्यांचे ध्येय आहे. राज्यात जर दावोस भेटीतून थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ येत असेल तर राऊतांना पोटदुखी का व्हावी." असा खोचक सवाल बन यांनी केला.
 
 
Powered By Sangraha 9.0