तणाव व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन...

    20-Jan-2026
Total Views |
Managing Stress
 
मन व शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी करण्यासाठी आतापर्यंत विविध उपाययोजना केल्या गेल्या. वेळेचे नियोजन, संघर्ष निवारण, प्रभावी संवादकौशल्ये, सामाजिक आधार, विनोदबुद्धी, लवचिकता, अध्यात्म, ध्यान, व्यायाम आणि योग यांचा त्यात समावेश आहे. मात्र, या सर्व उपायांकडे स्वतंत्र तंत्र म्हणून न पाहता, परस्परपूरक आणि एकत्रित दृष्टिकोनातून पाहिले असता, त्यांचा खरा व्यापक लाभ जाणवतो. म्हणूनच तणाव व्यवस्थापनाचा सर्वांगीण-समग्र ( होलिस्टिक ) दृष्टिकोन मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर एकाचवेळी नियोजन करून अंतर्गत समतोल आणि दीर्घकालीन मानसिक स्वास्थ्य निर्माण करण्यावर भर देतो.
 
समग्र तणाव व्यवस्थापनात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य यांचे परस्परसंबंध लक्षात घेतले जातात. तणाव वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकट होतो आणि जीवनाच्या अनेक पातळ्यांवर परिणाम करतो, ही जाणीव या पद्धतींच्या केंद्रस्थानी असते. तणावाची मूळ कारणे ओळखून, व्यक्तीच्या अंतर्गत सुसंवाद व संतुलन निर्माण करणे, हा या दृष्टिकोनाचा उद्देश असतो.
 
मन-शरीर यांचा संबंध (माईंड-बॉडी कनेक्शन)
 
समग्र तणाव व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक म्हणजे, मन आणि शरीर यांचा अतूट संबंध. आपली मानसिक अवस्था शारीरिक आरोग्यावर परिणाम करते आणि शरीरातील बदल मनावर प्रभाव टाकतात. हा संबंध बळकट करणार्‍या काही प्रभावी पद्धती पुढीलप्रमाणे -
 
१. माईंडफुलनेस ध्यान (सजग ध्यान)
 
केवळ ऐहिक लाभ, अप्रिय कामे आणि सततची जीवघेणी स्पर्धा एवढेच जीवन आहे, असे वाटू लागले की निराशा व तणाव वाढतो. ध्यान हे तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी एक शक्तिशाली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय वर्तमान क्षणाकडे लक्ष देणे समाविष्ट आहे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले विचार व भावनांचे निरीक्षण केले जाते. निरीक्षक भावनेने पाहिल्यामुळे मन शांत होते आणि तणावाचा प्रभाव कमी होतो.
 
२. योगाभ्यास
 
योग ही एक सर्वांगीण पद्धत आहे, जी शारीरिक मुद्रा, श्वासोच्छ्वास व्यायाम आणि ध्यान यांचा संगम आहे. योगाच्या नियमित सरावाने तणावाचे व्यवस्थापन करण्याची तुमची क्षमता वाढू शकते. भगवद्गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्ण योगाची व्याख्या ‘समत्वं योग उच्यते’ अशी करतात. ‘समत्व’ म्हणजे यश आणि अपयश, लाभ आणि हानी, सुख आणि दुःख या सर्व परिस्थितीमध्ये मनाचा समभाव राखण्यास सक्षम असले पाहिजे. तेच समत्व आहे, समभावाचा, शांततेचा आणि संयमाचा योग.
 
३. संतुलित आहार
 
बहुतेकांना हे लक्षात येत नाही की, तणाव शरीरातील आवश्यक पोषक तत्त्वे झपाट्याने खर्च करतो. स्नायूंना शिथिल ठेवणारे व अस्वस्थ मन शांत करणारे मॅग्नेशियम, ऊर्जा-एकाग्रता-मनःस्थिती संतुलनासाठी आवश्यक बी-जीवनसत्त्व आणि रोगप्रतिकारशक्ती व मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचे झिंक, हे सर्व ताणाच्या काळात शरीराची वाढत्या मागणीची पूर्तता करू शकत नाही. म्हणूनच तणावाशी लढण्यासाठी प्रक्रिया न केलेले, नैसर्गिक अवस्थेतील संपूर्ण अन्न हेच खरे ‘कम्फर्ट फूड’ ठरते.
 
४. नियमित व्यायाम
 
व्यायाम हा नैसर्गिक तणावनाशक आहे. नियमित व्यायाम तणावाच्या नकारात्मक भावनिक परिणामांपासून संरक्षण करतो. शारीरिक हालचालीमुळे मेंदूत ‘एंडोर्फिन’ या आनंददायी रसायनाचे उत्पादन वाढते, जे मेंदूतील नैसर्गिक वेदनाशामक आणि मनःस्थिती उंचावणारे घटक म्हणून कार्य करते. चालणे, पोहणे किंवा नृत्य करणे यांसारख्या तुम्हाला आवडणार्‍या कामांमध्ये व्यस्त राहिल्याने तणाव कमी होण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
 
५. पुरेशी झोप
 
झोप हा आपल्या एकूण आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. झोपेचे फायदे केवळ विश्रांतीपुरते मर्यादित नसून, भावनिक नियमन आणि तणाव व्यवस्थापनासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य आणि गुणवत्तापूर्ण झोप मनःस्थितीची स्थिरता आणि भावनिक लवचिकतेला प्रोत्साहन देते, ज्यामुळे व्यक्ती दैनंदिन तणावांना अधिक सहजतेने सामोरे जाऊ शकतात. याउलट, झोपेच्या समस्यांमुळे भावनिक प्रतिक्रियाशीलता, मनःस्थितीतील बदल आणि चिडचिडेपणा वाढतो, ज्यामुळे तणावाची पातळी आणखी वाढू शकते.
 
६. सामाजिक आधार
 
कुटुंबीय आणि मित्रांचा आधार भावनिक दिलासा देतो. मन मोकळे केल्याने ओझे हलके होते आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. सामाजिक आधार आणि ज्या न्यूरोबायोलॉजिकल मार्गांद्वारे लवचिकता वाढवण्यासाठी आणि मानसिक आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी कार्य करतो, यावर नवीन संशोधन पुढे येत आहे. एकूणच, असे दिसून येते की उच्च दर्जाचा सकारात्मक सामाजिक आधार तणावाचा सामना करण्याची लोकांची क्षमता वाढवू शकतो. गंभीर आघाताशी संबंधित मानसिक विकृती विकसित होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो आणि वैद्यकीय आजारपण व मृत्यूचे प्रमाण कमी करू शकतो.
 
७. भावनांची अभिव्यक्ती
 
डायरी लेखन, कला-चिकित्सा, समुपदेशन यांसारख्या माध्यमांतून भावना प्रभावीपणे व्यक्त करणे, हे मानसिक आरोग्य व सामान्य कल्याणासाठी अत्यावश्यक आहे. भावना मोकळेपणाने व्यक्त झाल्या की, त्या स्वीकारल्या व समजल्या जातात, एकाकीपण कमी होते आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात. त्यातून वाईट अनुभव पचवण्यास, स्वतःच्या गरजा व प्राधान्ये स्पष्ट होण्यास मदत होते. म्हणूनच भावना व्यक्त करणे, हे तणाव नियोजनात स्वतःची काळजी घेण्याचे एक प्रभावी साधन बनते.
 
८. निसर्गाशी नाते
 
निसर्गात वेळ घालवणे केवळ आनंददायी नसून वैज्ञानिकदृष्ट्याही उपयुक्त आहे. संशोधनानुसार नैसर्गिक वातावरण तणाव कमी करते, रोगप्रतिकारशक्ती बळकट करते आणि कोर्टिसोलसारखे तणावसूचक रसायने कमी करते. निसर्गाच्या सान्निध्यात मनाला डिजिटल जीवनाच्या सततच्या ताणतणावांपासून विश्रांती मिळते, ज्यामुळे आत्मचिंतन, भावनिक संतुलन आणि सर्जनशीलता वाढते. निसर्गाशी नाते जोडल्याने शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सुसंवाद साधता येतो, जो आधुनिक जीवनाच्या दबावांना समर्थपणे तोंड देण्यास मदत करतो.
 
समग्र तणाव व्यवस्थापन हे तणावाच्या सर्व पैलूंना एकत्रितपणे हाताळणारे प्रभावी साधन आहे. मन-शरीर संबंध, योग्य पोषण, भावनिक-सामाजिक संतुलन आणि आध्यात्मिक साधना यांवर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात सुसंवाद आणि आरोग्य निर्माण होते. तणाव व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्वतःशी संयम आणि करुणा ठेवत, या पद्धती जीवनात समाविष्ट केल्यास अधिक निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगता येते.
- डॉ. शुभांगी पारकर