मुंबई : (Imtiaz Jaleel) महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं आकार घेताना दिसत आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ला राज्यभरात चांगलं यश मिळालं असून, तो राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा भाजपने पटकावल्या असल्या, तरी या निकालांमध्ये आणखी एका पक्षाची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे. तो पक्ष म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम). (Imtiaz Jaleel)
एमआयएमने अनेक महापालिकांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जलील यांच्या म्हणण्यानुसार, मालेगाव महापालिकेत एमआयएमचे तब्बल २१ नगरसेवक निवडून आले असून, तिथे महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सहकार्याचा प्रस्ताव आला होता. (Imtiaz Jaleel)
“मालेगावसारख्या ठिकाणी आमचे २१ नगरसेवक निवडून आले आहेत. तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून आमच्या स्थानिक नेत्यांना प्रस्ताव देण्यात आला होता. ‘आपण सोबत येऊ शकता का?’ असा हा प्रस्ताव होता,” असा दावा इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, एमआयएमच्या स्थानिक आमदारांनी हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला असून, आम्ही शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केल्याचं जलील यांनी सांगितलं. या दाव्यांमुळे महापालिकांतील सत्तास्थापनेच्या राजकारणाला आणखी वेग आला असून, आगामी काळात कोणती नवी राजकीय आघाडी आकार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Imtiaz Jaleel)