शबरीमलातील सुवर्णचोरी आणि विजयन सरकारची लपवाछपवी

20 Jan 2026 10:57:07
Sabarimala
 
शबरीमाला मंदिर या ना त्या घटनांनी कायमच चर्चेत असते. मध्यंतरी महिलांना प्रवेश मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे चर्चेत असलेले हे मंदिर, सध्या सुवर्णचोरीमुळे चर्चेत आले आहे. देवाचे दागिने आणि मंदिराच्या वस्तू नव्याने घडवताना सोन्याची चोरी तर झालीच, तसेच वापरलेले सोने कमी दर्जाचे असल्याचेही समोर आले आहे.
केरळमधील शबरीमला देवस्थान हे असंख्य हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान. या देवस्थानास भक्तगण आपापल्यापरीने धन, सोने-नाणे आदी अर्पण करीत असतात. या देवस्थानास जे सोने अर्पण करण्यात आले, त्या सोन्याचा वापर करून मंदिर परिसरातील काही मूर्ती, दरवाजे, त्यांच्या चौकटी सोन्याने मढविल्या होत्या. हे सर्व मढविलेले सोने काढून, पुन्हा ते नव्याने मढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील आधीचे सोने काढून तेथील मूर्ती, अन्य वास्तूही नव्याने मढविण्यात आल्या. या सर्व व्यवहारामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे उघड झाले. ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ने तेथील सोन्याची शास्त्रीय तपासणी केली असता, त्या मंदिरातील सोन्याची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास तुकडीने, आजच केरळच्या उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला. दरम्यान, ‘शबरीमला कर्मा समिती’ने या सर्व प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी काल, सोमवारी तिरुवनंतपूरम येथे सचिवालयावर मोर्चा नेण्यात येऊन ‘धरणे’ धरण्यात आले होते.
 
शबरीमला देवस्थानमध्ये मढविण्यात आलेल्या सोन्याच्या शुद्धतेसंदर्भात शोध घेण्यासाठी, ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ची मदत घेण्यात आली. त्या तपासणीमध्ये सोन्याचा दर्जा योग्य नसल्याचे आढळून आले. त्या मंदिराच्या दाराच्या चौकटीस जे सोने मढविण्यात आले, ते योग्य दर्जाचे नसल्याचेही उघड झाले. मंदिरातील द्वारपालांच्या मूर्ती नव्याने सोन्याने मढविण्यात आल्या असून, त्या सोन्याचा दर्जा, कसही चांगला नसल्याचे तपासात दिसून आले. शास्त्रीय तपासणीमध्ये सोन्याची चोरी झाल्याचे सिद्ध झाल्याने, यासंदर्भात न्यायालयाकडून या सर्व प्रकरणाची व्याप्ती वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या मंदिरात आधी जे सोने मढविण्यात आले होते, ते सोने विजय मल्ल्या यांनी स्वित्झर्लंडहून आयात केले होते. पण, आता या मूर्तींवर आणि अन्य ठिकाणी जे सोने मढविलेले आहे, ते हलक्या दर्जाचे असल्याचे दिसून आले. तसेच, सोन्याचे एकंदरीत वजनही कमी भरल्याचे आढळले. या तपासणीमध्ये १५ नमुने तपासण्यात आले. आधीच्या आणि नंतरच्या मढविलेल्या सोन्याची तुलनात्मक तपासणी विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडून करण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणात सोन्याची चोरी झाल्याचेही आढळून आले. उन्नीकृष्णन पोट्टी नावाच्या व्यक्तीने अयप्पा मंदिरातील अमूल्य वस्तू हलविल्या आणि त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली, असा संशय व्यक्त केला जात आहे. ‘शबरीमला कर्मा समिती’ने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली, राजधानी तिरुवनंतपूरम येथे आंदोलन केले. ‘शबरीमला कर्मा समिती’ ही विश्व हिंदू परिषद, क्षेत्र संरक्षण समिती, हिंदू ऐय वेदी आणि शबरीमला अयप्पा सेवा समाजम् या संघटनांची संयुक्त समिती आहे. आता न्यायालय या सर्व प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्व हिंदू समाजाचे लक्ष आहे.
 
मणिकर्णिका घाट - काँग्रेसकडून अपप्रचार
 
उत्तर प्रदेशमधील काशीनगरीत असलेले अनेक घाट प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक मणिकर्णिका घाट आहे. उत्तर प्रदेश सरकारने या घाटाच्या पुनर्विकासाचे कार्य हाती घेतले आहे. काशीमधील हा घाट अंत्यसंस्कारासाठी प्रसिद्ध आहे. काशीमध्ये मृत्यू आल्यास मोक्ष प्राप्त होतो, अशी हिंदू समाजाची श्रद्धा आहे. काशीचे हे महत्त्व लक्षात घेऊन आणि या घाटाचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन, शासनाने घाटाच्या पुनर्विकासाचे कार्य हाती घेतले आहे. उत्तर प्रदेश सरकारने हे काम हाती घेतल्याचे पाहून, त्या कार्यामध्ये मोडता घालण्याचे उद्योग काँग्रेसने चालविले आहेत. ११ वर्षांपूर्वी जेव्हा विश्वनाथ मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले होते, त्यावेळीही या कामाबद्दल समाजामध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आलेच होते. पण, आता विश्वनाथ मार्गिका दिमाखात उभी राहिली आहे, आणि या नगरीस भेट देणारा त्या मार्गिकेचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही.
 
मणिकर्णिका घाटाचा पुनर्विकास करताना तेथील मंदिरे आणि मूर्ती यांना हानी पोहोचविली जात असल्याच्या बनावट चित्रफिती, समाजमाध्यमांवर टाकल्या जात आहेत. या चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केल्या जात आहेत. हा अपप्रचार लक्षात घेऊनच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धार्मिक भावनांना तडा देण्याचे प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. काँग्रेसकडून असा अपप्रचार मुद्दाम केला जात आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. काँग्रेस आणि विकासविरोधी तत्त्वे या घाटाच्या पुनर्विकासाबाबत अपप्रचार करीत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मणिकर्णिका घाट हे स्थान, हिंदू समाजाच्या अत्यंत पवित्र अशा अंत्यसंस्कार स्थानांपैकी एक आहे. चित्रफितीमध्ये जुन्या मूर्ती किंवा मंदिरे दाखवून, काही तत्त्वे या पुनर्विकासाबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
 
अपप्रचार करणार्‍या तत्त्वांनी, वाराणसीमधील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पुनर्विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप केला आहे. मणिकर्णिका घाटाचा परिसर अधिक चांगला व्हावा, प्रशस्त व्हावा या हेतूने हे काम हाती घेण्यात आले असून, ते कार्य करताना तेथील कोणत्याही मूर्ती किंवा मंदिरे यांना धक्का लावण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मणिकर्णिका घाटाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊनच या घाटाचा विकास करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. काशीमध्ये मृत्यू आल्यास जन्म-मृत्यू याच्या फेर्‍यातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो, अशी हिंदू समाजाची श्रद्धा आहे. दिवंगत आत्म्याच्या कानात भगवान शिव ‘तारकमंत्र’ गुणगुणतात, अशीही श्रद्धा आहे. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मणिकर्णिका घाटावर, दररोज १५० ते ४०० पार्थिव देहांवर अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व लक्षात घेऊनच, उत्तर प्रदेश सरकारने या घाटाच्या विकासाचे कार्य हाती घेतले आहे. या पुनर्विकासामुळे या घाटाचे जे चित्र सध्या आपल्यापुढे उभे राहते, ते सर्व चित्र पालटणार आहे. त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला असून, त्यातूनच या पुनर्विकास कार्याची बदनामी केली जात आहे. पण, काशीमधील जनता असल्या अपप्रचारास बळी पडणार नाही.
 
काँग्रेसकडून मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर
 
‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे प्रमुख मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी, आसाममधील काँग्रेस पक्षावर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. "अल्पसंख्याक समाजाच्या हितांचे रक्षण करण्याऐवजी, काँग्रेस पक्षाने केवळ मुस्लीम समाजाच्या मतांचा वापर करून आपली पोळी भाजून घेतली आहे,” असे मौलाना अजमल यांनी म्हटले आहे. दि. १७ जानेवारी रोजी मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी आसाम काँग्रेसवर जोरदार टीका केली. "मुस्लीम समाजाचे कल्याण करण्यामध्ये आसाम काँग्रेस पूर्णपणे असफल ठरली असून, केवळ एक मतपेढी म्हणून या पक्षाने आमचा वापर केला,” असेही त्यांनी म्हटले आहे. "मुस्लीम मेले तरी त्याचे आम्हाला काही सोयरसुतक नाही, आम्हाला फक्त मुस्लीम मतांची आवश्यकता आहे, हेच काँग्रेस पक्षाचे बोधवाक्य होते,” असा आरोप मौलवी अजमल यांनी केला. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी काँग्रेसने कधीच ठाम भूमिका घेतली नाही, असा आरोपही मौलवी अजमल यांनी केला. आसाममध्ये काँग्रेस पक्षाने मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण केल्याने, त्या राज्यात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पण, या मौलवीस तसे वाटत नाही. काँग्रेसने आमच्यासाठी काहीच केले नाही, असे या मौलवीचे म्हणणे आहे. यातील नेमके खरे कोण आणि खोटे कोण, हे आसाममधील जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे.
Powered By Sangraha 9.0