मिशनरींचे डावपेच; नवीन धर्मांतराच्या योजना ओळखा!

02 Jan 2026 12:34:45

देशभरात उघडकीस येणारे मिशनरींचे धर्मांतरणासाठीचे नवनवीन डावपेच आणि धर्मांतराच्या योजनांमुळे या षड्यंत्राची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याची कल्पना यावी. पण, दुर्दैवाने अजूनही मिशनरींच्या ‌‘सॉफ्ट कन्व्हर्जन‌’ला सुशिक्षित तसेच अशिक्षित समाजही बळी पडताना दिसतो. त्यानिमित्ताने मिशनरींच्या या षड्यंत्राचा पर्दाफाश करणारा हा लेख...

एखाद्या व्यक्तीबाबत, समूहाबाबत किंवा एखाद्या विषयाबाबत काळानुसार धारणा-अधारणा बदलणे हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. औषधे, अन्नपदार्थ, तसेच उपभोगासाठीच्या भौतिक वस्तूंचे गुणधर्म व अनुभव जरी तसेच राहिले, तरी त्यांचा वापर करण्याबाबत व्यक्तींची मते बदलत जाणे हीदेखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, खरा मोठा प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीची किंवा समूहाची मूलभूत श्रद्धा बदलू शकते का? मूळ स्वभावातून उगवलेला ‌‘आलू‌’ कोणत्याही कर्मकांडाने ‌‘पोटॅटो‌’ म्हणून संबोधला, तर त्याच्या गुणधर्मात मूलभूत तर सोडाच, किंचितही बदल होऊ शकतो का? यासाठी कुठलेही ग्रंथ वाचण्याची गरज नाही. सरळ उत्तर आहे नाही, ते शक्य नाही.
धर्मांतर अमानवी आहे

जर सैद्धांतिक आणि मूलभूत व्यावहारिक व्याख्या हे सिद्ध करतात की, आध्यात्मिक श्रद्धांचे मूलभूत स्वरूप भौतिक कर्मकांडांद्वारे बदलू शकत नाही, तर मग मोठा प्रश्न असा उद्भवतो की, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म मानणारे, वेगवेगळ्या श्रद्धा व आस्था असलेल्या लोकांच्या धर्मांतराच्या मोहिमेत का गुंतले आहेत? त्यासाठी ते फसवणूक, कपट आणि विविध प्रकारचे डावपेच का रचत आहेत? ‌‘साम-दाम-दंड-भेद‌’ या तत्त्वावर चालत भारतात धर्मांतराची काळी मोहीम का राबवत आहेत? यावर असे म्हटले जाते की, इस्लामचा प्रसार करणाऱ्यांची इच्छा भारतासह संपूर्ण जगाला ‌‘इस्लामिक वर्ल्ड‌’ रूपांतरित करण्याची आहे आणि हेच त्यांचे अंतिम धार्मिक ध्येय मानले जाते. ख्रिश्चन मिशनऱ्यांचेही अंतिम ध्येय असेच आहे की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, संपूर्ण जगाला ‌‘मुस्लीम वर्ल्ड‌’ बनवण्याची ही लालसा कोणत्याही अर्थाने आध्यात्मिक कर्तव्याच्या चौकटीत बसवता येईल का? आणि असे करणे मानवीय ठरू शकते का? या प्रवृत्तीचे कोणतेही स्पष्ट, मानवीय स्पष्टीकरण आहे का? या प्रश्नांची सखोल चिकित्सा करणे आवश्यक आहे.

आणखी एका प्रश्नावर थोडक्यात विचार करणे आवश्यक आहे की, केवळ एखादे कर्मकांड करून एखाद्या शाश्वत सनातनी, मूलभूत हिंदूचा धर्म त्याच्या इच्छेने किंवा अनिच्छेने, बळजबरीने किंवा फसवणुकीने बदलता येऊ शकतो का? सनातन परंपरेत ‌‘धर्म‌’ या शब्दाचा अर्थ इंग्रजीतील ‌‘रिलीजन‌’सारखा नसून, तो कर्तव्यांचा निर्देश करणारा आहे. एखादा हिंदू जाणीवपूर्वक किंवा फसवणुकीने धर्मांतर करेल किंवा एखाद्या कटाचा बळी ठरेल, तरीही तत्त्वतः तो हिंदूच राहतो. पूजापद्धती, वेशभूषा किंवा खानपान बदलल्याने मूळचा हिंदू नागरिक ख्रिश्चन किंवा मुस्लीम होत नाही.

भारतीय चिंतन परंपरेनुसार सैद्धांतिकदृष्ट्या असे घडू शकत नाही. मात्र, कुचेष्टांसमोर शरण गेल्याने समाजात व्यावहारिकदृष्ट्या नकारात्मक संदेश जातो. म्हणूनच अनेक संत, महात्मे आणि शीख गुरू यांनी प्राणांची आहुती दिली; पण धर्मांतर स्वीकारले नाही. त्यांनी हेच सांगितले की, धर्म बदलणे हे सर्वात मोठे पाप आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हेही लक्षात घ्यावे लागते की, संविधानानुसार भारत हा आज पंथनिरपेक्ष देश आहे. कोणताही भारतीय स्वेच्छेने कोणताही धर्म स्वीकारू शकतो. संविधानाने सर्व धर्मांचा आदर सुनिश्चित केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष विचारपूर्वक धर्मांतर करतात, तेव्हा ते हिंदू समाजासाठी तिरस्करणीय किंवा कमी सन्माननीय ठरत नाहीत. तसेच अनेक परदेशी महापुरुषांनी आपला मूळ धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे, तरी ते अधिक सन्माननीय ठरत नाहीत.

धर्मपरिवर्तन किंवा मतांतरण म्हणजेच ‌‘कन्व्हर्जन‌’ हे सर्वात मोठे पाप मानले जाते. तरीही, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे दलाल अमानवी कृत्यांमध्ये गुंतलेले दिसतात. जग ‌‘कोविड-19‌’ महामारीशी झुंज देत असतानादेखील अनेक ख्रिश्चन मिशनरी मानवतेची सेवा करण्याऐवजी धर्मांतराचे डाव रचण्यात गुंतले होते, हे आपल्याला माहीत आहे. यासाठी विविध प्रकारचे उपाय आणि क्लुप्त्या वापरल्या जात होत्या. आता तर धर्मांतराचे कट भारतीयतेच्या रंगात रंगवून सादर केले जात आहेत, जेणेकरून निष्पाप लोकांना सहज भ्रमित करता येईल.

मिशनऱ्यांनी आता ख्रिश्चन धर्माला भारतीय धार्मिक आवरणे, प्रतीके आणि संस्कृती यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. भोळ्याभाबड्या, अशिक्षित लोकांना असे वाटते की, ते जे पाहत आहेत, गात आहेत, ते सनातन वैदिक परंपरेच्या रंगातच रंगलेले आहे. पण, प्रत्यक्षात ते ख्रिश्चन धर्माच्या श्रद्धांशीच निगडित असते. इस्लामच्या उलट, हिंदुत्वाप्रमाणेच ख्रिश्चन धर्मातही मूर्तिपूजा पूर्णतः निषिद्ध नाही आणि भारतात याच गोष्टीचा मिशनरी फायदा घेऊ इच्छितात. लोकांच्या असे गळी उतरवले जाते की, कृष्णभक्ती सोडल्याशिवायही येशूची भक्ती करता येते. कारण, दोघांत खूप साम्य आहे; कृष्ण साऱ्या विश्वाचे पालनकर्ते आहेत, तर येशूही जगताचे परमेश्वर आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‌‘श्रीमद्भागवत‌‘ आणि ‌‘गीते‌’तील उदाहरणे देत, बालिश तर्क मांडून हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात आहे. आमच्या विचारांनीच आमच्यावर प्रहार केले जात आहेत.

ब्रजसह संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे वर्णन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय रुचकर वाटते. याच गोष्टीचा फायदा घेत मिशनऱ्यांनी एक कट रचला असून, येशू ख्रिस्ताला बालकृष्णाच्या रूपात दाखवले जाऊ लागले. माता मेरीची प्रतिमाही आता यशोदा मातेप्रमाणे साकारली जात आहे. इतकेच नव्हे, तर माता मेरीच्या कुशीत बालगणेश किंवा बालकृष्ण बसलेला दाखवणाऱ्या चित्रांचाही आधार घेतला जात आहे, जेणेकरून भोळ्याभाबड्या हिंदूंना असा भ्रम व्हावा की, ते कोणत्याही विधम प्रक्रियेत नाही, तर हिंदुत्वाच्या एखाद्या दुसऱ्या सनातन परंपरेतच सहभागी होत आहेत आणि त्यात काहीही गैर नाही.

सनातन श्रद्धेची मोठी केंद्रे, तसेच आदिवासी भागांत कार्यरत असलेल्या मिशनरी कार्यकर्त्यांच्या वेशभूषेतही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. धर्मांतराचे कट रचणाऱ्यांनी कोट-पॅन्ट सोडून भगवे वस्त्र, कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्ष व तुळशीच्या माळा, हातात कलावा अशी चिन्हे धारण केली आहेत. पारंपरिक भारतीय माळांमध्ये छोटे ‌‘क्रॉस‌’ घालून त्या लोकांना घालायला लावल्या जात आहेत. ख्रिश्चन धर्माविषयीची श्रद्धा ते खडी हिंदीत नव्हे, तर ब्रज भाषा व आदिवासी भाषांमध्ये तितक्याच सुसंस्कृत देशी उच्चारांत मांडतात.

ब्रजमध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी विविध लोकगीते आरतीच्या स्वरूपात ब्रज भाषेतील लोकगीतांवर गायली जातात. याच धतवर मिशनऱ्यांनी येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनाही ब्रज भाषेत रचल्या आहेत, ज्या कृष्णभक्तीच्या गीतांच्या लोकगीतांवरच आधारलेल्या आहेत. कृष्णासारख्या रूपातील येशूची चित्रे, आरत्या, सीडी आणि पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाटली जात आहेत. पाहायला ही सामग्री अगदी भारतीय धार्मिक साहित्याप्रमाणेच वाटते. इतकेच नाही तर येशूसाठी प्रामुख्याने ‌‘परमेश्वर‌’ हा शब्द वापरला जातो. भारतीय आध्यात्मिक परंपरेत ‌‘परमेश्वर‌’ हा ईश्वराच्या सर्वोच्च सत्तेसाठी वापरला जात असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. लोकांना वाटते की, ही काही वेगळी वाट नाही; दोन्ही वाटा एकत्र चालू शकतात. कृष्णभक्ती सोडायची नाही आणि येशूभक्ती स्वीकारायची आहे; त्यासाठी पैसे, धान्य, इतर वस्तू, रोजगार, उपचार, शाळांमध्ये प्रवेश अशा स्वरूपाचे आमिषही मिळत असेल, तर अडचण काय?

ब्रजच्या लोकगीतांवर आधारित येशूच्या गीतांचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. चमत्कारांच्या कथांवर आधारित व्हिडिओंमध्ये येशूचे बालरूप कृष्णासारखे दाखवले जाते. सर्वसाधारणपणे मेंढ्या राखणाऱ्या येशूच्या प्रतिमा दिसतात; पण ब्रज परिसरात गोवंश राखणाऱ्या येशूच्या चित्रांचा प्रचार केला जात आहे. एकूणच, कृष्णभक्तांना आमिष दाखवून धर्मांतराचे जाळे विणले जात आहे. त्यांना समजावले जाते की, येशू आणि कृष्णभक्तीत काहीही फरक नाही. जर त्यांनी येशूची पूजा केली, तर परलोक तर सुधारेलच. शिवाय, या जगातही अनेक भौतिक सुविधा मिळतील. सध्या अनेक युट्यूब चॅनेल्सद्वारे या दुष्प्रचाराला धार दिली जात आहे. काही लोक त्याला बळीही पडत आहेत. मात्र, विश्व हिंदू परिषद आणि इतर अनेक संघटना या दुष्प्रचाराची धार बोथट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत.

शिक्षण व्यवस्थेमार्फत ‌‘सॉफ्ट कन्व्हर्जन‌’

मिशनरी देशभरात अनेक शिक्षण संस्था चालवतात. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणनीतीच्या खोलवर रुजलेल्या प्रभावामुळे देशात कॉन्व्हेंट शिक्षणाकडे विशेष आकर्षण निर्माण झाले. जरी आता नवी शिक्षणनीती लागू झाली असली, तरी शिक्षणाचे पूर्ण भारतीयीकरण होण्यासाठी वेळ लागणार आहे. मिशनरी चालवत असलेल्या शाळांमध्ये दररोजच्या प्रार्थना आणि इतर नियमित परंपरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या, तसेच त्यांच्या पालकांच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी निष्ठेची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला जातो. ख्रिसमस आणि इतर सणांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व पालकांना चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनासभा व कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास भाग पाडले जाते.

मिशनरी शाळांमध्ये भारतीय पोशाखाला बंदी असते. कोट-पॅन्ट-टाय आणि स्कर्ट घालणे बंधनकारक असते. गळ्यात तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ, जानवे, कपाळावर टिळा, हातावर कलावा किंवा डोक्यावर शेंडी अशी हिंदू धार्मिक प्रतीके विद्याथ-विद्यार्थिनी वापरू शकत नाहीत. इंग्रजी नववर्षाच्या निमित्ताने ‌‘सांताक्लॉज‌’च्या माध्यमातून निरागस मुलांच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. ख्रिसमसच्या वेळी अनेक सनातनी कुटुंबे आपल्या लहान मुलांना ‌‘सांता‌’च्या पोशाखात सजवू लागली आहेत. घराघरांत ‌‘ख्रिसमस ट्री‌‘ही सजवले जाऊ लागले आहेत. ‌‘जिंगल बेल‌’सारखी गाणी अनेकांच्या ओठांवर रूढ झाली आहेत. वाढदिवस किंवा इतर शुभप्रसंगी पूजा, कथा, हवन यांच्याऐवजी केक कापण्याची पद्धत सामान्य झाली आहे. विरोध दर्शवण्यासाठी किंवा एखाद्या मागणीच्या समर्थनार्थ मेणबत्त्या पेटवून रॅली काढण्याची परंपराही चर्चकडूनच आलेली. माळांमध्ये सजावटी ‌‘क्रॉस‌’ घालण्याची प्रथा वाढत आहे. अशाप्रकारे प्रत्यक्ष धर्म न बदलताही एकप्रकारचे ‌‘सॉफ्ट कन्व्हर्जन‌’ घडवून आणले जात आहे. अनेक सनातनधम अज्ञानामुळे किंवा मजबुरीमुळे याचे बळी ठरत आहेत.

ग्रामीण आणि जनजातीय भागांमध्ये मिशनरी उपचारांच्या नावाखाली धर्मांतराची मोहीम चालवत आहेत. योग्य वैद्यकीय व्यवस्था नसणे आणि आजूबाजूच्या शहरी भागांमध्ये महागडे उपचार यांमुळे अनुसूचित जमाती व मागास भागांतील लोक मिशनरींच्या जाळ्यात अडकतात. पंजाबमध्ये ‌‘चंगाईसभा‌’ यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार केला जात आहे. प्रतिकूल परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात सेवाकार्यांच्या माध्यमातून सहानुभूती दाखवूनही गरिबांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात आहे.

‌‘कोविड-19‌’ महामारीच्या काळात रोजगार देणे आणि खाण्यापिण्याची सोय करूनही अनेक धर्मांतराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चालविल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या षड्यंत्राचा भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पद्धती ‌‘आयुर्वेदा‌’ला कमी लेखण्याचे प्रयत्न दीर्घकाळापासून योजनाबद्ध रीतीने केले जात आहेत. ‌‘कोरोना‌’ महामारीच्या काळात आयुर्वेदविरोधी दुष्प्रचार अधिक तीव्र झाला. संयुक्त राष्ट्रांनी भारतीय योगपरंपरेला जागतिक मान्यता दिल्यानंतर आयुर्वेदाची पत जगभर वाढली असली, तरीही हे षड्‌‍यंत्र सुरूच आहे. भारताचे संविधान सर्व धर्मांचा आदर करण्याचा संदेश देते. धर्मांतर किंवा मतांतर म्हणजे एकाअर्थाने राष्ट्रांतरच आहे. ‌‘कन्व्हर्जन‌’ हा केवळ श्रद्धा किंवा पूजापद्धती बदलण्याचा प्रश्न नसून, तो याहून अधिक संवेदनशील विषय आहे. ख्रिस्ती मिशनरी जर भगवान कृष्ण आणि इतर सनातन देवी-देवतांपासून इतके प्रभावित असतील, ‌‘श्रीमद्भागवत‌’ व ‌‘गीते‌’मध्ये ख्रिस्ती धर्माचे सार आहे असे त्यांना वाटत असेल, तर मग ते ख्रिस्ती धर्म सोडून हिंदुत्व का स्वीकारत नाहीत?

- रवि पाराशर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक आहेत.)



Powered By Sangraha 9.0