दुनिया गोल आहे...

    02-Jan-2026   
Total Views |

तो देश, जिथे मुल्लांच्या कट्टरपंथी मानसिकतेनुसार ‌‘हिजाब‌’ घातला नाही, डोक्यावरचा एक केस दिसतो म्हणून अगणित महिलांना क्रूर मृत्युदंड दिला गेला; हा तोच देश, जिथे ईशनिंदेच्या आड गैरमुस्लीम आणि मुस्लिमांतीलही विरोधकांना फासावर चढवले गेले. हे का, तर मुल्लांनी सांगितलेल्या कट्टरतेचे पालन व्हावे म्हणून! पण, त्याच देशात आज ‌‘मुल्लांना देश सोडावा लागेल‌’, ‌‘तानाशाही मुर्दाबाद‌’ असे म्हणत हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत; तो देश आहे इराण.

इराणी चलनाची म्हणजे ‌‘रियाल‌’ची किंमत एक डॉलरच्या तुलनेत 14 लाख रियाल झाली म्हणून इथल्या युवकांनी-दुकानदारांनी आंदोलनाला, विरोधाला सुरुवात केली. दुकाने बंद झाली. लोक सध्याच्या इराणच्या शासनाविरोधात रस्त्यावर उतरले. इराणवर आर्थिक डबघाई लादणाऱ्या इराणी सरकारचे आणि त्याला चालवणाऱ्या मुल्लांचे वर्चस्व त्यांनी नाकारले. विशेष म्हणजे, हे आंदोलक शाह मोहम्मद रजा पहलवीच्या नावाने घोषणा देत होते. हे कोण, तर 1979 सालापूव शाह मोहम्मद रजा पहलवीची सत्ता होती. ती मुस्लीम कट्टरतेवर आधारित नव्हती. 1979 साली इराणमध्ये खोमेनीच्या नेतृत्वाखाली इस्लामच्या राज्यासाठी उठाव झाला आणि शाह मोहम्मद यांना परागंदा व्हावे लागले. शाहंचा मुलगा क्राऊन प्रिन्स रजा पहलवी सध्या अमेरिकेत आहेत. इराणमधल्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “मी तुमच्यासोबत आहे. विजय आपलाच आहे. कारण, आपले उद्दिष्ट योग्य आहे आणि आपली एकजूट आहे.” असो. कट्टरपंथीयांचे वर्चस्व कायम राहावे म्हणून इराणमध्ये अनेक निरपराधांवर अत्याचार झाले. उदाहरणार्थ, 16 वर्षांची आतेपा सालेह आईविना पोर; बापाला अमली पदार्थांचे व्यसन. वयाच्या 13व्या वर्षापासून तिला उदरनिर्वाहासाठी काम करावे लागले. यादरम्यान, तिची मैत्री एका पुरुषाशी झाली. इराणमध्ये नीतीच्या नावावर अमानुषता करणाऱ्या नैतिक पोलिसांनी एकदा तिला त्या मित्रासोबत पकडले. अनैतिकतेच्या गुन्ह्याखाली तिला अटक केली. तिच्यावर अत्याचार केलेच असणार, यात संशय नाही, तर या बालिकेला जमावासमोर खेचत-फरफटत फाशी दिली गेली.

हो, इराणमध्ये कायदा आहे. 18 वर्षांच्या खालील व्यक्तीला फाशी देता येत नाही. पण, या अधिकाऱ्यांना ती मरायला हवी होती, म्हणून तिच्या वयाच्या कागदपत्रांत फेरफार करत तिचे वय 22 वर्षे नमूद केले. त्यांनी असे का केले, तर या निराधार मुलीवर ती 13 वर्षांची असतानापासून अनेकदा असे आरोप करत इराणच्या अधिकाऱ्यांनी अत्याचार केले. त्यांचे काळे कृत्य जगासमोर येऊ नये म्हणून त्यांनी नैतिकतेच्या नावाखाली तिला फाशी दिली. पुढे महिसा अमिन या 18 वर्षांच्या युवतीचा मृत्यू इराणच्या तुरुंगात झाला. का, तर इराणच्या नैतिक पोलिसांना दिसले की, महिसाच्या डोक्यावरचा हिजाब सरकला आहे आणि त्यातून डोक्यावरचे केस बाहेर आले आहेत. त्यामुळे तिला पकडून तुरुंगात डांबले गेले, तिला मारहाण केली गेली, त्यातच तिचा मृत्यू झाला. एक ना अनेक घटना. बिचाऱ्या मुली-महिलांवर क्रूर अत्याचार होत होते. अत्याचार करणारे त्यांच्या अत्याचाराला इस्लामिक न्यायाचा हवाला देत होते. या सगळ्याला इराणच्या धर्मगुरू अयातुल्ला खोमेनीची संमतीच होती, असे दृश्य होते.

त्यानंतरही इराणचे युवा असेच रस्त्यावर उतरले होते. मात्र, या युवांचे दमन करण्यामध्ये इराणी सरकारने कसलीच कसूर केली नाही. पुढे इस्रायल-गाझा युद्धात इराणने गाझाचे समर्थन केले. याच काळात अणुचाचणीही करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे इस्रायलसह अमेरिका आणि इतर राष्ट्रे इराणच्या विरोधात उभी राहिली. 2018 सालापासून इराणमध्ये ‌‘नो हिजाब‌’ आंदोलन सुरू झाले. तो वणवा 2025 सालापर्यंत कायम आहे. आता ‌‘नो हिजाब‌’सह इराणमध्ये मुल्लांनी देश सोडावा, हे तीव्र आंदोलन सुरू झाले. युवकांवर इराण सरकार अत्याचार करते, असे अमेरिकेचे म्हणणे. त्यामुळेच इराणमधल्या आंदोलनात अमेरिकेची भूमिका काय असेल, हे उघड गुपित आहे. मात्र, ट्रम्प जागतिक घडामोडीत आपले घोडे पुढे दामटवत असतानाच, त्यांच्या न्यूयॉर्कमध्ये ममदानी कुराणला साक्षी ठेवत महापौर बनला. धर्मनिरपेक्ष अमेरिकेचे कट्टरतेत रूपांतर होण्याची ही सुरुवात आहे का? दुनिया गोल आहे, हे नक्की!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.