Iran Crisis : इराणमध्ये महागाईविरोधात जनआक्रोश; आंदोलनांना हिंसक वळण, सात जणांचा मृत्यू

02 Jan 2026 13:44:31

IRAN CRISIS

मुंबई : (Iran Crisis) इराणमध्ये वाढत्या महागाईविरोधात जनतेचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. या आंदोलनांना काही भागांत हिंसक वळण लागले असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
 
मागील एक आठवड्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात आंदोलन सुरू असून आता या आंदोलनांची तीव्रता वाढताना दिसत आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिस्थिती चिघळली आहे. ग्रामीण भागांसह काही प्रमुख शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ४२.५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. तसेच इस्रायलसोबत जूनमध्ये झालेल्या सात दिवसांच्या संघर्षामुळेही देशाच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे.राजधानी तेहरानमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी खामेनी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘अयातुल्ला खामेनी मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लोर्देगान, कुहदरत आणि इस्फहान या शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘असोसिएटेड प्रेस’ने दिली आहे.
महागाईचा भडका उडाल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गही आंदोलनात उतरला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे इराणमधील राजकीय व सामाजिक परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींकडे लक्ष दिले जात आहे.

Powered By Sangraha 9.0