नाट्यसंस्कारांतून घडलेले प्रभाकर पवार स्वत: रंगमंचावर रमतातच, पण त्याचबरोबर नाट्यक्षेत्रात अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या तरुणांना ते प्रशिक्षणही देतात. अशा या नाट्यसंस्कारांच्या साधकाविषयी...
मराठी नाट्यक्षेत्राला जगात ओळख मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील एक प्रयत्नशील तरुण म्हणजे प्रभाकर पवार. तरुणांना नाटक, अभिनय शिकण्यापासून ते थिएटर मिळवून देण्यापर्यंत प्रभाकर यांचे सुरू असलेले प्रयत्न हे आता या क्षेत्रासाठी लाभदायी ठरत आहे.
आधीच पुणे-पिंपरी-चिंचवड ही महानगरे पूर्वापार चालत आलेल्या नाट्यकलेशी एकरूप झालेली आहेत. याआधीच्या कित्येक पिढ्या त्यात रममाण झाल्या. यातूनच या नाट्यप्रेमात पडून नव्या पिढीतील उदयोन्मुख कलावंतदेखील पुढे येताना दिसतात. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन आणि दिशा दाखविण्यासाठी प्रभाकर कार्य करीत आहेत.
प्रभाकर पवार यांचे नाव पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यक्षेत्रात अगदी सुपरिचित. येथेच लहानाचा मोठा झालेला हा तरुण केवळ आणि केवळ नाट्यवेडापायी या क्षेत्रात अतिशय उत्साहाने आणि हिरिरीने कार्य करू लागला. लहानपणापासून प्रभाकर यांना नाट्यकलेची आवड. त्यामुळे शालेय जीवनात असताना नाटकात काम करता करताच नाट्यकलेचे गुण त्यांनी अंगीकारले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन पातळीवरही नाटक सुरू झाले. विविध स्पर्धांमध्ये भाग घेत प्रभाकर यांनी शहरात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू झाले. नाट्यक्षेत्रात सखोल अभ्यास केल्यानंतर नाट्यक्षेत्राची व्याप्ती प्रभाकर यांच्या लक्षात आली. या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात काम आहे, हे लक्षात आल्यावर स्वतःला या क्षेत्रात झोकून देण्याचे प्रभाकर यांनी ठरवले. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांमधील कौशल्य हेरताना ते विकसित करण्यावरदेखील ते भर देत असतात.
नाट्यकला ही अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली कला. मात्र, ही परंपरा टिकवितानाच प्रभाकर यांनी आताच्या काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांचा सांगोपांग विचार करून उत्तम नियोजन केले आहे. यामुळे अभिनेता होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना संधीची दारे त्यांनी उघडून दिल्याचे म्हणता येईल.
अभिनेता होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, त्यासाठी नेमके काय प्रयत्न करावे, कुठून सुरुवात करावी, हेच अनेकांना समजत नाही, तर अनेकांना पैशाची चिंता सतावते. त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळत नाही. अशांसाठी प्रभाकर हे देवदूत बनून येतात आणि अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी अनेकांना मदत करतात. यासाठी त्यांनी संस्थेची स्थापना करुन नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण सुरू केले. ‘थिएटर वर्कशॉप कंपनी’ आणि ‘पैस कल्चरल फाऊंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून प्रभाकर कार्यरत आहेत. त्यानंतर ‘द बॉक्स’सारख्या जागेची निर्मिती करून नाट्यक्षेत्रातील कलाकारांसाठीही त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शहरात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होण्यासाठी हातभार लागला. आतापर्यंत लेखक म्हणून त्यांनी 27 एकांकिका, पाच दीर्घांक आणि आठ दोन अंकी मराठी नाटके लिहिली आहेत. तसेच काही मालिकांसाठीदेखील त्यांनी साहाय्यक लेखक म्हणून काम केले आहे. त्यांना मराठी नाट्य परिषदेचा ‘सर्वोत्कृष्ट गद्य नट’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून ‘रौप्यपदक’ देऊन गौरविण्यात आले आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे ‘उत्कृष्ट नाटक’ म्हणूनदेखील गौरविण्यात आले आहे. अशाप्रकारे अनेक संस्थांनी प्रभाकर यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कलागुणांना कसलीच कमतरता नाही. परंतु, येथील नागरिकांना कलेचे शिक्षण घेण्यासाठी सोयी- सुविधा उपलब्ध नाहीत. यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’चे अंशकालीन अभ्यासक्रम शहरात आणले आहेत. शहरातील वाचनसंस्कृती वाढण्यासाठी ‘वाचन श्रावण’ हा उपक्रमदेखील त्यांनी सुरू केला. तसेच बालनाट्य शिबीर, करंडक स्पर्धा आणि ‘पुस्तकघर’ या त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सोबत घेऊन ‘रंगयात्री महोत्सव’, ‘व्यक्ती-अभिव्यक्ती’, ‘अनुभूती’ या कार्यक्रमांना देश पातळीवर गौरविण्यात आले आहे.
“आतापर्यंत केलेले काम खूप थोडे आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मराठी नाट्यक्षेत्राचे काम जगभरात पोहोचवायचे आहे. लोकांमध्ये खूप कलागुण आहेत. त्यांना बाहेर येण्यासाठी संधी हवी असते. अशा संधी मिळाल्या की, लोकांना हुरूप येतो. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे प्रभाकर सांगतात.
2015 पासून शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाट्य चळवळ रुजावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या माध्यमातून शहरात नाटक चळवळ रुजण्यासाठी हातभार लागतो. प्रभाकर यांची टीम दिवसागणिक मोठी होत आहे. येत्या काही वर्षांत खेडेगावात जाऊन नाट्यक्षेत्राला मोठे करण्याचे त्यांचे प्रयोजन आहे. त्यादृष्टीने स्पर्धा, करंडक यांचे आयोजन करण्याचे त्यांचे नियोजन सुरू आहे. नाट्य-संस्कारांचे धडे देणाऱ्या प्रभाकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- शशांक तांबे