सातारा : (Sahitya Sammelan) " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अभिजात असलेल्या मराठी भाषेला राज्य मान्यता मिळाली. आता मराठी भाषेला संपूर्ण देशामध्ये लोक मान्यता मिळवून देण्याचे काम आपल्या सगळ्यांना करायचे आहे. महाराष्ट्र मध्ये फक्त आणि फक्त मराठीची सक्ती असेल हे आपण लक्षात घ्या. " असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सातारा येथे सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. (Sahitya Sammelan)
दि. ०२ जानेवारी रोजी, साताऱ्याच्या शाहू स्टेडियम येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रख्यात लेखिका डॉ. मृदुला गर्ग, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोक कुपर, साहित्य महामंडळाचे प्रमुख विश्वस्त प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच महामंडळाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. (Sahitya Sammelan)
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की " महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहिल. मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती होणार नाही. त्रिभाषा सूत्राच्या पार्श्वभूमीवर तिसरी भाषा कुठल्या इयत्तेपासून सुरुवात करायची, यावर विचार सुरू होता. त्या अनुषंगाने थोड्याच दिवसात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल लोकांसमोर येईल. मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केले ते वारकऱ्यांनी आणि संतसाहित्याने. मराठी ही मनामनांना जोडणारी भाषा आहे. ही केवळ भक्तीची नाही तर मूल्यांची भाषा आहे. साहित्यिकांचे कार्य समाजाला दिशा देण्याचे आहे. त्यामुळे लोकशाही विचारांची ही अभिव्यक्ती साहित्यविश्वात अबाधित राहणे महत्त्वाचे आहे. साहित्यातील संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको हे बरोबरच मात्र, साहित्यकांनी सुद्धा साहित्यात राजकारण आणू नये." (Sahitya Sammelan)
" हा" दुटप्पीपणा चुकीचा
भाषेसंदर्भात आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की " एकीकडे आपण इंग्रजी, फ्रेंच जर्मन अशा परदेशी भाषांना पायघड्या घालतो परंतु भारतीय भाषांना मात्र विरोध करतो ही भूमिका योग्य नाही. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याचवेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली."
(Sahitya Sammelan)