राज्यात कासव संवर्धनाच्या कामाची सुरुवात आणि त्या कामाचे झालेले सिंहावलोकन अतिशय रंजक आणि प्रेरणादायक आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, कासव संवर्धनाची चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशी सुरू झाली, त्याबद्दल...
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले (olive ridleys) जातीच्या सागरी कासवांचे घरटे अधूनमधून आढळून येत असले, तरी या जीवांना मानवी आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागत होता. अंड्यांची आणि प्रौढ कासवांची चोरी (poaching), मासेमारीच्या जाळ्यांमध्ये (fishing nets) अडकून होणारा मृत्यू (incidental catch) आणि किनारपट्टीवर होणारी विकासकामे हे महाराष्ट्रातील सागरी कासवांसाठी प्रमुख धोके ठरले होते. विशेषतः, मानवाद्वारे होणारी चोरी आणि कोल्ह्यांकडून (Canis aureus) अंड्यांचे भक्षण केल्यामुळे (predation) कासवांच्या घरट्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.
महाराष्ट्राच्या 720 किमीच्या किनारपट्टीवर सागरी कासवांच्या संरक्षणाचे काम केवळ रत्नागिरीपुरते मर्यादित राहिले नाही, तर ते दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत विस्तारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमीचा समुद्रकिनारा लाभला असून तो देवगड, मालवण आणि वेंगुर्ला अशा तीन विभागांत विभागलेला आहे. या भागात कासवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांशी जोडलेला आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर लेदरबॅक कासवाला (Leatherback turtle) स्थानिक भाषेत ‘कुर्मा’ म्हटले जाते आणि लोक त्याला भगवान विष्णूचा अवतार मानतात, त्यामुळे या कासवांना सहसा इजा पोहोचवली जात नाही. ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला येथे तुपालो (Tupalo) या नावाने ओळखले जाते, तर इतर प्रजातींना सामान्यतः कासाई (Kasai) म्हटले जाते. या भागात ग्रीन टर्टल (Green turtles)देखील समुद्रात दिसून येतात; विशेषतः मालवण आणि वेंगुर्ला भागात त्यांचे दर्शन अधिक घडते.
इतर भागांप्रमाणेच सिंधुदुर्गमध्येही कासवांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक स्तरावर कासवांच्या अंड्यांची विक्री दोन ते पाच रुपयांना केली जात होती; तर मालवणसारख्या ठिकाणी पूर्ण कासवाची विक्री ही 250 ते 500 रुपयांना मांसासाठी केली जात असल्याचे आढळले होते. हाडांच्या आजारांवर कासवाचे मांस औषधी आहे, अशा अंधश्रद्धाही येथे अस्तित्वात होत्या. मात्र, कासवांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण म्हणजे, बेकायदेशीर मासेमारी (Illegal gill net and trawl fishing) हे होते आणि काही प्रमाणात आजदेखील आहे.
समुद्रकिनाऱ्यापासून जवळ (दहा फॅदमच्या आत) यांत्रिक मासेमारीवर बंदी असतानाही, ट्रॉलरच्या जाळ्यांमध्ये अडकून अनेक कासवांचा जीव जातो. तसेच, खडकाळ भागात टाकलेली जुनी जाळी (घोस्ट फिशिंग - Ghost fishing)देखील कासवांसाठी जीवघेण्या ठरत होत्या आणि आजदेखील आहेत. पर्यटन विकासामुळे कुणकेश्वर आणि तारकल यांसारख्या महत्त्वाच्या किनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले होते.
सिंधुदुर्गमध्ये कासव संवर्धनाची सुरुवात देवगडमधील स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दफ्तरदार यांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (BNHS)च्या मदतीने केली. पुढे महाराष्ट्र वनविभाग आणि स्थानिक निसर्गप्रेमींनी यात सहभाग घेतला. 2002-03 मध्ये तांबळडेग गावात प्रत्यक्ष संरक्षण कार्य सुरू झाले.
संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने कासवाचे घरटे शोधून देणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये बक्षीस देण्याची योजना सुरू केली होती. 2005-06 पासून चिपळूणच्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र (SNM) संस्थे’ने या जिल्ह्यात जनजागृती मोहिमा राबवल्या आणि स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांना संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. 2008च्या आकडेवारीनुसार, सिंधुदुर्गच्या विविध किनाऱ्यांवर एकूण दहा घरट्यांचे यशस्वीरित्या संरक्षण करण्यात आले. यामध्ये वायंगणी (तीन घरटी), तांबळडेग (दोन), आणि काटवण, भोगवे, तारकल, शिरोडा व मोचेमाड (प्रत्येकी एक) या गावांचा समावेश आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ (SNM) संस्थेच्या संवर्धन कार्याआधी आणि त्यांतरदेखील समुद्री कासवांबद्दल प्राथमिक संशोधनकार्य कोणी केलं, ते आता समजून घेऊया. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कासवांच्या स्थितीचा अधिक शास्त्रीय अभ्यास ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (BNHS)चे संशोधक वरद गिरी यांनी 2000 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील 34 ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आणि त्यातून या सागरी जीवांच्या अस्तित्वाचे एक व्यापक चित्र उभे राहिले.
महाराष्ट्रातील कासवांच्या प्रजाती आणि त्यांचे अधिवास यांबद्दल त्यामुळे अधिक माहिती समोर आली. भारतात आढळणाऱ्या कासवांच्या पाच प्रजातींपैकी सगळ्या प्रजाती महाराष्ट्राच्या समुद्रात आढळतात किंवा त्यांची नोंद झाली आहे.
ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) ही या किनारपट्टीवर आढळणारी सर्वांत सामान्य प्रजाती आहे. ग्रीन टर्टल (Green Turtle) या कासवांची संख्या मालवण परिसरात अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती आणि खावणे या गावांमध्ये या कासवांची अधिक नोंद झाली होती. स्थानिक लोकांच्या मते, ही कासवे खडकाळ भागात राहणे आणि शेवाळं खाणे पसंत करतात. हॉक्सबिल (Hawksbill) ही प्रजाती दुमळ असून, जयगडजवळील नंदीवडे येथे एका मासेमारीच्या जाळ्यात ही प्रजाती आढळल्याची नोंद होती. लेदरबॅक (Leatherback) याला स्थानिक भाषेत ‘कुर्मा’ किंवा ‘सतपोट्या’ असेही म्हणतात. ही कासवे अतिशय दुमळ असून प्रामुख्याने खोल समुद्रात दिसतात. मालवणमधील आचरा येथे सुमारे 25 वर्षांपूव (1996च्या सुमारास) हे कासव दिसल्याची आठवण स्थानिक मच्छीमारांनी सांगितली आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कासवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये बहुतांश लोक कासवांना ‘देवाचा अवतार’ मानतात. जर मासेमारीच्या जाळ्यात कासव अडकले, तर स्थानिक मच्छीमार प्रार्थना करून त्यांना सन्मानाने समुद्रात सोडून देतात. याउलट, त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मांसासाठी कासवांची शिकार होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले होते. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या नोंदीनुसार, गेल्या दहा वर्षांत कासवांच्या घरटी घालण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. पूव एका रात्रीत सात ते आठ कासवे घरटी घालताना दिसायची; पण ही संख्या नंतर खूपच कमी झाली. सिंधुदुर्गमध्ये शिरोडा ते मोतेमाल आणि सर्जेकोट ते आचरा हे ‘ऑलिव्ह रिडले’ आणि ‘ग्रीन टर्टल’साठी महत्त्वाचे किनारे आहेत. रायगडमध्ये काशीद येथे स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी कासवांच्या पिल्लांचे रक्षण करून त्यांना समुद्रात सोडल्याच्या नोंदी आहेत.
रत्नागिरीमध्ये आंबोलगड आणि वेत्ये येथील किनारे मानवी हस्तक्षेप कमी असल्याने कासवांसाठी पोषक मानले जातात.
सर्वेक्षणातून दोन मुख्य धोके अधोरेखित झाले होते.
1)अंड्यांची चोरी (Egg Poaching): संपूर्ण किनारपट्टीवर मानवाद्वारे अंड्यांची चोरी हा मोठा धोका होता. जर अंडी माणसांनी काढली नाहीत, तर ती कुत्रे किंवा कोल्हे फस्त करतात.
2)अपघाती मासेमारी (Incidental Catch): ट्रॉलरच्या जाळ्यांमध्ये अडकून कासवांचा गुदमरून मृत्यू होतो. सरासरी एका ट्रॉलरच्या जाळ्यात वर्षाला चार ते पाच कासवे अडकतात, अशी माहिती समोर आली होती. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि किनाऱ्यांवरील गोंधळामुळे कासवे घरटी घालण्यासाठी किनाऱ्यावर येण्यास कचरत होत्या. त्यामुळेच, वनविभाग आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने जनजागृती मोहिमा राबवणे, ही काळाची गरज बनली होती. या लेखाच्या पुढील भागात समुजून घेऊया वर्तमान स्थितीत गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कासव संवर्धन चळवळ आणि संशोधन क्षेत्रात झालेले सकारात्मक बदल.
- प्रदीप चोगले
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’मध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
9029145177
pradipnc93@gmail.com-
(क्रमश:)