स्वच्छतेचा ‌‘अजय‌’ वारसा

19 Jan 2026 12:14:25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचा वसा जपत अहिल्यानगरमध्ये स्वच्छतेची ज्योत प्रज्वलित करणारे ‌‘धर्मवीर युवा प्रतिष्ठान‌’चे अजय भीमराज चितळे यांच्याविषयी...

रक्तातच देशसेवेचा वारसा असताना आपणही देशासाठी काहीतरी करावे, समाजासाठी योगदान द्यावे अशी भावना उराशी बाळगून हजारो हात आज निस्वार्थपणे कार्यरत आहेत. ही देशसेवा केवळ सीमेवर बंदूक हातात घेऊन लढणाऱ्यांकडून घडते, तशीच समाजात बदलाचा, परिवर्तनाचा झेंडा उभारणारे हातही तितकेच देशभक्त असतात. हातात झाडू, मनात राष्ट्रप्रेम आणि डोळ्यांत स्वच्छ भारताचे स्वप्न घेऊन जेव्हा एखादा सामान्य नागरिक असामान्य कार्य करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकचळवळीचा जन्म होतो. अहिल्यानगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दर रविवारी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ म्हणजे, अशाच एका निस्वार्थ देशसेवकाच्या विचारांची आणि कृतीची जिवंत साक्ष आहे. ‌‘धर्मवीर युवा प्रतिष्ठान‌’चे अजय चितळे हे नाव आज स्वच्छतेच्या बाबतीत केवळ व्यक्तीपुरते न राहता, एक प्रेरणादायी विचार बनले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‌‘स्वच्छ भारत मिशन‌’च्या हाकेला केवळ प्रतिसाद न देता, त्या हाकेला प्रत्यक्ष कृतीचे रूप देण्याचे कार्य अजय यांनी केले. गेली पाच ते सहा वर्षे अहिल्यानगर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे, यासाठी ते दर रविवारी न थकता स्वच्छता मोहीम राबवत आहेत. रविवारी विश्रांती घेण्याऐवजी समाजासाठी झटणे, हेच त्यांचे जीवनध्येय झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी भाजपच्या माजी नगरसेविका असल्या, तरी या संपूर्ण कार्यामागे सामाजिक बांधिलकीची उदात्त भावनाच दिसून येते.

दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी भाजप मध्य मंडल, अहिल्यानगर आणि धर्मवीर युवा, कला, क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता मोहिमेची औपचारिक सुरुवात, अहिल्यानगर शहरात झाली. त्यानंतर आलेल्या ‌‘कोरोना‌’ महामारीच्या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असतानाही, हे कार्य थांबले नाही. उलट, त्याच काळात स्वच्छतेचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवल्याने, अजय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने हे समाजहिताचे कार्य सुरूच ठेवले.

ऊन, पाऊस, थंडी किंवा वादळी वारे अशा कशाचीही तमा न बाळगता, ही स्वच्छतेची चळवळ अखंडपणे आजही सुरू आहे. शहरातील सर्व समाजांच्या स्मशानभूमी, सार्वजनिक बगीचे, महापुरुषांचे पुतळे, पुरातन मंदिरे, आरोग्य केंद्रे, मैदाने, रस्ते आणि सार्वजनिक जागा स्वच्छ करण्याचे काम, या मोहिमेअंतर्गत करण्यात येते. काल, दि. 18 जानेवारी रोजी या मोहिमेचे तब्बल 276 रविवार पूर्ण झाले आहेत, ही बाबच या कार्यातील सातत्य आणि समर्पण अधोरेखित करते. ही संपूर्ण मोहीम सुमारे 35 ते 40 स्वयंसेवकांच्या माध्यमातून राबवली जाते. कोणतीही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता, स्वतःचा वेळ, श्रम आणि ऊर्जा समाजासाठी देणारा हा चमु खऱ्या अर्थाने ‌‘स्वच्छतेचे सैनिक‌’ ठरतात. अजय यांच्या कामातील सातत्य, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची भावना पाहून, अहिल्यानगर महानगरपालिकेनेही या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला. मात्र, ही दखल केवळ सत्कारापुरती मर्यादित राहिली नाही. महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेत प्रत्येक महिन्याच्या शेवटी, म्हणजे 30 तारखेला सर्व पालिका कर्मचाऱ्यांना एकत्र करून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासही सुरुवात केली. हेच या मोहिमेचे सर्वांत मोठे यश मानावे लागेल.

“महानगरपालिकेच्या सहभागानंतर शहरातील, तसेच जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्था, नागरिक आणि संघटनांनीही प्रेरणा घेत आपआपल्या भागात स्वच्छता मोहिमा सुरू केल्या. संपूर्ण जिल्ह्यातून आणि शहरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून आपण योग्य दिशेने कार्य करत आहोत,” असे समाधान अजय व्यक्त करतात. “शहर, जिल्हा आणि राज्यभरातील सामाजिक संस्था, गणेश मंडळे, महिला बचतगट यांनीही स्वच्छतेचे कार्य आपल्या परिसरात सुरू करावे,” असे आवाहन अजय सातत्याने करत असतात. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे आणि सुंदर शहरांसाठी स्वच्छता ही काळाची गरज आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

अहिल्यानगरमधून सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार व्हावे, हीच अजय यांची इच्छा आहे. अशा निस्वार्थ सेवाभावी कार्यकर्त्यांमुळेच समाज अधिक जागरूक, सशक्त आणि स्वच्छ होत आहे. स्वच्छतेच्या या व्रताने अजय यांनी केवळ रस्ते, मैदाने किंवा सार्वजनिक जागाच स्वच्छ केल्या नाहीत, तर समाजमनात स्वच्छतेबाबत जागृतीही केली. अहिल्यानगरमधून सुरू झालेली ही चळवळ आज अनेकांच्या मनात रुजत आहे, हीच अजय यांच्या कार्याची खरी पावती ठरते. एक माणूस बदलला की विचार बदलतो; आणि विचार बदलले की समाज बदलतो, हेच त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी भारत घडवण्याच्या या पवित्र कार्यासाठी अजय चितळे आणि त्यांच्या संपूर्ण चमुला मनःपूर्वक शुभेच्छा. अहिल्यानगरमध्ये प्रज्वलित झालेली ही स्वच्छतेची ज्योत महाराष्ट्रभरच नव्हे, तर संपूर्ण देशभर प्रकाशमान होवो. त्यांची ही समाजसेवेची वाटचाल अधिकाधिक बळकट होवो, नवनव्या उपक्रमांनी फुलत राहो आणि स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरो हीच
दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून सदिच्छा!

Powered By Sangraha 9.0