आवाजाची भाषा आणि बालरंगभूमीचा नवा आत्मविश्वास

18 Jan 2026 13:53:20

बालनाट्यामध्ये अभिनयाइतकेच महत्त्व आवाजालाही. कारण, या आवाजातील चढ-उतार, संवादफेक यातूनही त्या नाटकाला एक जिवंतपणा प्राप्त होतो. ‌‘राजे शिवबा‌’ या अशाच एका बालमहानाट्याचा प्रयोग पुढील महिन्यात पार पडणार असून, त्याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. हे नाटक पूर्णतः ‌‘डबिंग‌’वर आधारित आहे. म्हणजे रंगमंचावर दिसणारा अभिनय आणि पार्श्वभूमीतील आवाज या दोघांचा सुरेख समन्वय या संपूर्ण नाट्यप्रयोगात अनुभवता येणार आहे. त्याविषयी...

'राजे शिवबा‌' बालमहानाट्य संवाद म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे. शब्दांपलीकडे जाऊन जेव्हा आवाजातून भावना, विचार, मनःस्थिती आणि अंतर्मन व्यक्त होते, तेव्हा त्या संवादाला खरी उंची मिळते. यालाच आपण ‌‘आवाजाची भाषा‌’ म्हणतो. आवाजातील चढ-उतार, लय, गती, थांबे, तीव्रता, कोमलता किंवा कडकपणा या सगळ्या घटकांतून माणूस स्वतःला व्यक्त करत असतो. अनेकदा शब्द अपुरे पडतात; पण आवाज मात्र सगळं सांगून जातो. रंगमंचावर, नाट्यकलेत, कथाकथनात आणि विशेषतः ऐतिहासिक नाट्यप्रयोगांमध्ये आवाजाची ही भाषा अत्यंत निर्णायक ठरते.

याच आवाजाच्या भाषेवर आधारलेले एक महत्त्वाकांक्षी आणि धाडसी बालमहानाट्य म्हणजे ‌‘राजे शिवबा.‌’ सध्या या नाटकाची जोरदार तयारी सुरू असून, हे नाटक पूर्णतः ‌‘डबिंग‌’वर आधारित आहे. म्हणजे रंगमंचावर दिसणारा अभिनय आणि पार्श्वभूमीतील आवाज या दोघांचा सुरेख समन्वय साधत संपूर्ण नाट्यप्रयोग उभा केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक संवाद, प्रत्येक शब्द, प्रत्येक भाव आवाजातून अचूक पोहोचावा, यासाठी अतिशय बारकाईने आणि जबाबदारीने काम केले जात आहे.

नाटकातील संवादांचे ‌‘डबिंग‌’ करणे म्हणजे केवळ संवाद पुन्हा बोलणे नव्हे; ती एक कलात्मक, तांत्रिक आणि भावनिक समतोल साधणारी प्रक्रिया आहे. ‌‘डबिंग‌’ करणाऱ्या कलाकाराला त्या पात्राचे वय, स्वभाव, सामाजिक स्थान, भावनिक अवस्था आणि प्रसंगातील मनःस्थिती यांची सखोल समज असावी लागते. कारण, आवाज हा त्या पात्राचा आत्मा असतो. चुकीचा आवाज निवडला, तर कितीही उत्तम अभिनय असला, तरी पात्र अविश्वसनीय वाटू शकते.

विशेषतः जेव्हा भूमिका महाराजांची असते, तेव्हा आवाजाची निवड ही अत्यंत संवेदनशील बाब ठरते. महाराजांचा आवाज म्हणजे केवळ मोठा किंवा घनगंभीर आवाज नव्हे; त्यात दरारा, ठामपणा, नेतृत्व, करुणा, दूरदृष्टी आणि माणुसकी हे सगळे गुण सामावलेले असायला हवेत. प्रेक्षकांनी तो आवाज ऐकताच, हा महाराजांचा आवाज आहे अशी सहज स्वीकृती द्यावी, इतका तो आवाज त्या भूमिकेत समरस झाला पाहिजे. ‌‘राजे शिवबा‌’च्या डबिंग प्रक्रियेत ही दक्षता प्रत्येक टप्प्यावर घेतली जात आहे.

या नाटकाचा सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक भाग म्हणजे हे सगळे कलाकार बालवयातील आहेत. महाराजांची कथा, त्यांचा इतिहास आणि जीवनप्रवास हे नवरसांनी ओतप्रोत भरलेले आहेत. वीररस, करुणरस, रौद्ररस, शृंगार, अद्भुत हे रस अनुभवी कलाकारांसाठीही अवघड ठरतात. अनेक मुलांसाठी तर या रसांची ही पहिलीच ओळख आहे.

अशा मुलांना हे अवघड रस समजावून सांगणे, त्यांच्या भावनांच्या कक्षा विस्तारण्यास मदत करणे आणि त्या भावनांनुसार आवाजाला योग्य वळण देणे, यासाठी खास कार्यशाळा घेतल्या जात आहेत. केवळ संवाद पाठ करायला लावणे हा उद्देश नसून, हा संवाद का बोलला जातो आहे, त्या क्षणी पात्राच्या मनात काय चालले आहे, हे मुलांना समजावले जात आहे. आवाजातून भावना कशा व्यक्त करायच्या, कुठे थांबायचे, कुठे आवाजात जोर द्यायचा, कुठे शांतता ठेवायची या सगळ्या सूक्ष्म गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे.

या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात आशादायी बाब म्हणजे, मुले प्रचंड उत्साही आहेत. त्यांना या रसांमध्ये चिंब भिजायचे आहे. त्यांची तत्परता, शिकण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. कधी-कधी ही जबाबदारी मोठी आहे, याची जाणीव असूनही ती भीती न बाळगता मुले मनापासून या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. हे काम निश्चित जोखमीचे आहे. कारण, महाराजांच्या कथेभोवती प्रेक्षकांच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. उत्तम, दर्जेदार आणि परिणामकारक कलाकृती सादर करण्याची जिद्द आहेच; पण त्याचबरोबर एक ठाम भूमिका घेण्यात आली आहे - ‌‘बालनाट्याकडे फक्त मुलांचं नाटक म्हणून पाहिलं जाऊ नये.‌’

प्रेक्षकांनी या नाटकातून एका व्यावसायिक, परिपक्व आणि दर्जेदार नाट्यप्रयोगाचा अनुभव घ्यावा, अशी संकल्पना या नाटकामागे आहे. कुठल्याही क्षणी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीपेक्षा खालच्या पायरीवर आहे असे वाटू नये, यासाठी सर्वच पातळ्यांवर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मुलांमध्ये सातत्य, योग्य दृष्टिकोन आणि ठाम फोकस विकसित करावा लागत आहे. मात्र, हे सगळं करताना त्यांच्यावर दडपण न आणता, कळत-नकळत त्यांच्या आवाजाचा उत्तम वापर व्हावा, याची विशेष काळजी घेतली जात आहे. कलेच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून हे नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, हाच या प्रयत्नांचा गाभा आहे.

‌‘राजे शिवबा‌’ हे नाटक केवळ लेखक, दिग्दर्शक किंवा कलाकारांचेच नाही; तर ते एक सामूहिक सर्जन आहे. नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा आणि केशभूषा या सगळ्या घटकांचा तितकाच मोलाचा सहभाग या नाटकात आहे. हे सगळे घटक एकत्र येऊनच हा नाट्यप्रयोग एक समग्र रंगानुभव बनवत आहेत.

या बालमहानाट्याचा प्रयोग रविवार, 8 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता नटसम्राट निळू फुले नाट्यमंदिर, सांगवी येथे सादर होणार आहे. या प्रयोगात 75 बालकलाकार महाराजांची कथा ‌‘रंगभूमी‌’ या सशक्त माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्याचबरोबर बालरंगभूमी ही किती समृद्ध, सक्षम आणि ताकदीची असू शकते, याचे जिवंत उदाहरणही ते प्रेक्षकांसमोर ठेवणार आहेत.

म्हणूनच, हे केवळ एका नाटकाचे निमंत्रण नाही; तर बालरंगभूमीच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासाची साक्ष आहे. सर्व बालकलाकारांच्या वतीनेही आवर्जून उपस्थित राहण्याची मनापासून विनंती. या नाटकाला नक्की या, अनुभव घ्या आणि बालरंगभूमीच्या या सशक्त प्रवासाचे साक्षीदार व्हा!

- रानीराधिका देशपांडे
raneeonstage@gmail.com

Powered By Sangraha 9.0