अटल सेतू वरून प्रवासासाठी पथकरात सूट वर्षभर कायम, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; प्रवाशांना मोठा दिलासा

18 Jan 2026 13:36:26
 
‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू‌’वरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे. अटल सेतूच्या ‌‘टोल टॅक्स‌’मध्ये पुढील एक वर्ष कोणतीही वाढ होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार, दि. 17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अटल सेतूवर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.

‌‘शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू‌’ जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आला होता. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल पुलाचा टोल 250 रुपये आहे. मुंबईकरांना पुढील 12 महिने, वर्षभर अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही. अटल सेतूवरून रोज प्रवास करणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.‌‘अटल सेतू‌’मुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी झाले आहे. अटल सेतू बनण्याआधी मुंबई-नवी मुंबई असा प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या ट्राफिक समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र, अटल सेतूमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. हा सहा लेन असलेला अटल सेतू सुरुवातीला ‌‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक‌’ या नावाने उभारण्यात आला होता. पुढे या पुलाचे नामांतर ‌‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू‌’ करण्यात आले.

असा आहे टोल?

एका चारचाकी वाहनासाठी एकेरी वाहतुकीसाठी 250 रुपये, तर परतीचा प्रवास असल्यास 375 रुपये टोल आकारण्यात येतो.

18 हजार कोटींचा पूल

पुलाच्या बांधकामासाठी 17 हजार, 840 कोटी खर्च आला. त्यासाठी एक लाख, 77 हजार, 903 मेट्रिक टन स्टील आणि पाच लाख, चार हजार, 253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0