
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशामध्ये जगन्नाथपुरीचे, कोणार्कचे सूर्य मंदिर प्रसिद्ध असले तरी, अशी अन्य शेकडो मंदिरे आहेत, जी तितकीच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागतील. यापैकीच एक मंदिर म्हणजे भुवनेश्वरमधील अनंत वासुदेव मंदिर. ‘गंग’ राजघराण्याच्या गौरवशाली परंपरेत चंद्रिका नावाची राणी होती. तिने संपूर्ण भुवनेश्वरमध्ये शेकडोंच्या संख्येने शैव मंदिरे बांधली. तिथेच या राणीने विष्णूला अर्पण केलेल्या ‘अनंत वासुदेव’ मंदिराची निर्मिती केली. इसवी सन 1278 साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. अशा या मंदिराची केलेली ही भ्रमंती...
इंग्रज भारतातून लाखोंच्या संख्येने गोष्टी आपल्या देशात घेऊन गेले. त्यात मूत, नाणी, शिलालेख, पुरातत्वीय अवशेष, सांगाडे, कपडे इत्यादी अनंत गोष्टी होत्या. अशाच घेऊन गेलेल्या गोष्टींमधला एक शिलालेख लंडन शहरातल्या ‘ब्रिटिश म्युझियम’मध्ये आहे. या शिलालेखात भुवनेश्वरमध्ये बांधल्या गेलेल्या एका सुंदर मंदिरासंबंधी माहिती मिळते.
ओडिशामध्ये असलेल्या भुवनेश्वरपासून कटकपर्यंत मोठा साम्राज्य विस्तार ‘गंग’ नावाच्या राजघराण्याने केला. अद्भुत असे, सूर्याला अर्पण केलेले कोणार्कचे मंदिर आणि पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर अनुक्रमे नरसिंहवर्मन आणि अनंतवर्मन या राजांनी बांधले. हे राजेदेखील याच ‘गंग’ घराण्याचे होते. राजघराण्याच्या गौरवशाली परंपरेत चंद्रिका नावाची राणीदेखील होती. संपूर्ण भुवनेश्वरमध्ये जिथे शेकडोंच्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली, तिथे हिने विष्णूला अर्पण केलेल्या ‘अनंत वासुदेव’ या मंदिराची निर्मिती केली. आपल्या पतीच्या स्मरणार्थ इसवी सनाच्या 1278 साली हे मंदिर पूर्ण झाले.
मंदिर बांधण्याअगोदर इथेच विष्णूची मूत पूवपासून पूजली जात असावी, असे पुरातात्विक अभ्यास सांगतात. त्यामुळे या स्थळावर असलेली साधना आणि श्रद्धा मंदिर बांधणीच्या आधीच्या काळातही अविरत चालू होती. मधल्या काळात मुस्लीम आक्रमकांनी पुरीची रथयात्रा बंद केली. त्याचबरोबर अनेक मंदिरांमधले विधी, पूजा, प्रसाद याही गोष्टी बंद झाल्या आणि अनंत वासुदेव मंदिर यातून सुटले नाही. याकाळात मंदिरांमध्ये विध्वंसदेखील मोठ्या प्रमाणात झाला. 17व्या शतकात नागपूरकर भोसल्यांनी या सर्व भागावर आक्रमण करून परकीय आक्रमकांपासून हा भाग सोडवला. जगन्नाथाची रथयात्रा परत सुरू केली आणि या अनंत वासुदेव मंदिराचा जीर्णोद्धारदेखील केला.
भुवनेश्वर परिसराला ‘चक्रक्षेत्र’, तर पुरीला ‘शंखक्षेत्र’ मानले जाते. या चक्रक्षेत्राच्या केंद्रबिंदूवर असलेले मंदिर म्हणजे अनंत वासुदेव मंदिर होय. या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. पुष्परचना, दिव्य प्रकाश, अभिषेक आणि भजन, मंत्रोच्चारामुळे या संपूर्ण परिसरात वेगळी स्पंदने तयार होतात, ज्यामुळे हजारो भक्त हा क्षण साक्षात अनुभवण्यासाठी इथे येतात.
ओडिशातील प्राचीन मंदिर स्थापत्याला ‘कलिंग शैली’ असे संबोधले जाते आणि भारतीय नागर स्थापत्याच्या प्रादेशिक विकासातील ही एक अत्यंत परिपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण शाखा मानली जाते. इ.स. सातव्या ते 13व्या शतकादरम्यान या शैलीने उत्कर्ष गाठला. कलिंग मंदिरांची रचना ही केवळ धार्मिक वास्तुशास्त्र नसून, ती ब्रह्मांडाच्या ऊर्ध्व-विस्ताराचे प्रतीकात्मक रूप आहे. या शैलीतील मुख्य मंदिराला ‘देऊळ’ किंवा ‘रेखा देऊळ’ म्हणतात, ज्याचे शिखर अत्यंत उंच, वक्ररेषीय आणि सतत वर खेचलेले असते. हे शिखर पर्वतासारखे उभारलेले असून, त्यावर लहान उपशिखरांची सममितीय मांडणी दिसते. उभ्या रेषांमधून व्यक्त होणारी ही ऊर्ध्वगती भक्ताच्या अंतर्मनालाही वर नेत राहते - भौतिकतेपासून परमात्म्याकडे.
कलिंग स्थापत्यात मंदिर चार प्रमुख घटकांत विभागलेले असते - विमान (गर्भगृहावरचे शिखर), जगमोहन (सभामंडप), नटमंदिर आणि भोगमंडप. या चारही रचनांची उंची, आकार आणि अलंकरण यांमध्ये क्रमिक वाढ दिसते. बाह्य भिंतींवर देवतांच्या असंख्य प्रतिमा, दिक्पाल, नृत्यांगना, गंधर्व, नाग, यक्ष, मिथुन आणि पुराणकथा यांचे सजीव शिल्पपट दिसतात. मंदिराचा प्रत्येक भाग स्वतंत्र असूनही एकात्मिक आहे, जणू दगडात कोरलेली विश्वरचना. शिखरावरचा ‘आमलक’ आणि ‘कलश’ हे ब्रह्मांडाच्या पूर्णतेचे प्रतीक ठरतात. या शैलीत अलंकरण केवळ सजावटीसाठी नसते, ते एक तात्त्विक भाषा असते; ज्यात धर्म, निसर्ग, ऊर्जा आणि जीवन यांचा अखंड प्रवाह व्यक्त होतो.
भुवनेश्वरमधील अनंत वासुदेव मंदिर हे कलिंग स्थापत्यशैलीचे वैष्णव स्वरूपातील एक दुमळ आणि परिपूर्ण उदाहरण आहे. लिंगराजसारख्या शैव मंदिरांच्या छायेत उभे असलेले हे मंदिर त्याच स्थापत्य परंपरेचे अनुसरण करत असले, तरी त्याच्या बाह्यभागावर वैष्णव प्रतिमांची समृद्ध मांडणी आढळते. उंच वक्ररेषीय रेखा शिखर, त्यास जोडलेले जगमोहन, पुढील नटमंदिर आणि भोगमंडप या सर्व घटकांमध्ये कलिंग स्थापत्याची पूर्ण शिस्त दिसते. बाह्य भिंतींवर कृष्ण, बलराम, विष्णूचे अवतार, गरुड आणि दिक्पाल यांची सजीव शिल्परचना मंदिराला एक विशिष्ट वैष्णव ओळख देते. शिखराची उंची आणि त्यावरील लहरीरचना जणू अनंतत्वाचे दृश्यरूप बनते. जिथे स्थापत्य हे केवळ वास्तू न राहता, विष्णूच्या अनंत तत्त्वाचे दगडी प्रकटन ठरते.
या मंदिराच्या जगमोहनात 250-300 वर्षे जुनी अजून एक सुंदर गोष्ट बघायला मिळते - ‘पट्टचित्र.’ या पट्टचित्राबद्दल थोडीशी माहिती. ओडिशाची पारंपरिक चित्रकला म्हणून ओळखली जाणारी पट्टचित्र ही केवळ एक कलाशैली नसून ती भक्ती, पुराणकथा आणि लोकसंस्कृती यांचे दृश्यरूप आहे. ‘पट्ट’ म्हणजे कापड आणि ‘चित्र’ म्हणजे रेखाटन. कापडावर नैसर्गिक रंगांनी, सूक्ष्म रेषांनी आणि अलंकारिक मांडणीने उभे केलेले हे चित्रविश्व शतकानुशतके जगन्नाथ संस्कृतीशी जोडलेले आहे. भगवान कृष्ण, विष्णूचे अवतार, दशावतार, ‘रामायण’-‘महाभारत’ कथा, मंदिरोत्सव, रथयात्रा आणि दैवी प्रतीक यांचे सजीव व सजावटी चित्रण पट्टचित्रात दिसते. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे, स्पष्ट सीमारेषा, सममितीय रचना, तेजस्वी; पण नैसर्गिक रंगसंगती आणि संपूर्ण पृष्ठभाग व्यापणारी सजावट. कलाकार पिढ्यान्पिढ्या परंपरेने ही कला जपत आले असून, प्रत्येक चित्रात धर्म, कथा आणि सौंदर्य यांचे अनोखे ऐक्य साकार होते. पट्टचित्र म्हणजे दगडातील शिल्पांसारखेच, कागदावर उमटलेले ओडिशाच्या आत्म्याचे रंगीत प्रतिबिंब. या मंदिरात अजूनही पारंपरिक पद्धतीने शिजवलेला प्रसाद देवाला अर्पण केला जातो. साधारण पाच हजारांपेक्षा जास्त लोक रोज या प्रसादाचा आनंद घेतात. मातीच्या मडक्यात चुलीवरती हा प्रसाद शिजवला जातो. अनेक परिवार अनेक शतकांपासून या प्रसादाच्या सेवेत रुजू आहेत.
आज भुवनेश्वरमध्ये हजारो पर्यटक दररोज येतात. लिंगराजाच्या वैभवाने भारावतात, मुक्तेश्वराच्या कमानींमध्ये हरवतात; परंतु त्याच शहराच्या शांत कुशीत उभे असलेले अनंत वासुदेव मंदिर मात्र अनेकांच्या नजरेतून नकळत निसटते. गदच्या नकाशावरून मागे राहिलेले हे देवालय जणू स्वतःच्या शांततेत समाधिस्थ आहे; पण जो कोणी या मंदिरापर्यंत पोहोचतो, त्याला उमगते की, हे केवळ एक मंदिर नाही, तर दगडात कोरलेली एक अखंड कविता आहे. शिखराच्या ऊर्ध्वरेषांतून अनंताचा निनाद घुमतो, भिंतीवरील शिल्पांमधून कथा जिवंत होतात आणि गर्भगृहातील त्रिमूत भक्ताच्या अंतर्मनाला स्पर्श करून जाते. पर्यटनाच्या गदारोळात विस्मृतीत गेलेले हे ‘वैष्णव रत्न’ प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेच पाहिजे. कारण, काही स्थळे पाहण्यासाठी नसतात, तर ती आत्म्याने जाणण्यासाठी असतात. अनंत वासुदेव हे तसेच शांत, दिव्य आणि काळालाही ओलांडणारे!
- इंद्रनील बंकापुरे
7841934774