मुंबई : (Uddhav Thackeray) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत, “मुंबईत आमचा महापौर व्हावा, अशी आमची इच्छा होती. महापौर होण्याइतपत आकडा आम्ही गाठू शकलो नाही, हे वास्तव आहे, पण मुंबईकरांनी दिलेला पाठिंबा आमच्यासाठी मोठा आधार आहे,” असे सांगत त्यांनी भाजप–शिंदे गटावर साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूक लढवल्याचा आरोप केला. (Uddhav Thackeray)
“सर्वच मतदारांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या युतीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचे आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. प्रचाराला सर्वत्र जाता आलं नाही, जिथे जाऊ शकलो नाही त्या शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
ते पुढे म्हणाले, “या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने लढवल्या. साम-दाम-दंड-भेदाचा अवलंब केला गेला. शिवसैनिकांना तडीपार करण्यात आलं, तरी गुंडागर्दीविरोधात ज्यांनी मतदान केलं, ते खरे लोकशाहीचे रक्षक आहेत. आम्ही आणि राज ठाकरे एकत्र आलो, शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा झाली. शिवसेनाप्रमुखांच्या काळात जसं एकत्र होतो, तसंच आजही एकत्र आलो. शिवाजी पार्क कसं फुललं होतं, याचे सगळे साक्षीदार आहात. आमच्याकडे गर्दी जमते, पण मतदान होत नाही; त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करतात, हे न सुटलेलं कोड आहे.” पैशाच्या जोरावर निवडणूक लढवली गेल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, “गेल्या चार वर्षांपासून पैसे पेरले गेले. नगरसेवक गळाला लावले गेले. निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कुकर, वस्तू वाटण्यात आल्या. हा पैसा कुठून येतो? ईडी–इन्कम टॅक्स त्यांच्यामागे का लागत नाही?” असे आरोपही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केले. (Uddhav Thackeray)