मुंबई : (Raj Thackeray) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक संदेश दिला आहे. मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या लढ्याचा पुनरुच्चार करत त्यांनी ट्विटद्वारे कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
“सस्नेह जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली,” असे राज ठाकरे यांनी लिहिले.
मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचे दुःख व्यक्त करत ते म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आपण खचून जाणार नाही. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही झालं तर त्यांना जेरीस आणतील.”
पुढे त्यांनी स्पष्ट केले की, “आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. ही लढाईच आपलं अस्तित्व आहे. निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया.” या ट्विटमुळे पराभवानंतरही मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मराठी अस्मितेच्या राजकारणात नव्या उर्जेसह पुढील लढाईची तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे.