Padmadurg Fort : पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन

17 Jan 2026 12:49:50

padmadurga fort

मुंबई : (Padmadurg Fort) जंजिऱ्याच्या सिद्दीवर वचक बसविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६७५ च्या सुमारास पद्मदुर्गाची उभारणी केली. श्री शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या छाताडावर उभारलेल्या या पद्मदुर्गाला हिंदू कालगणनेनुसार यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गडावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मदुर्गात दुर्गदर्शनासाठी मार्गदर्शकाची अभाव पाहता, पद्मदुर्ग जाणून घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष " पद्मदुर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यशाळा" आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून स्थानिकांना रोजगार उपलब्धी होण्यास मदत होईल. या संमेलनाला लाय पाटलांचे वंशज निलेश सरपाटील, हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दि. १७ जानेवारी रोजी पद्मदुर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४.३० वाजता ही कार्यशाळा सुरु होईल. रविवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी कोटेश्वरी देवीचे पूजन पार पडणार असून, त्यानंतर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर गडदर्शन: गाईडसाठी गडाची, आतील वास्तूंची विस्तृत माहिती याविषयी अनिकेत पाटील श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर, गाईडसाठी पर्यटकांची सुरक्षा, आणि समाज माध्यमांमध्ये व्यावसायिक रित्या जास्त लोकांपर्यंत पोचण्याविषयी अतुल मोरे श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. यानंतर दुर्गसंवर्धक आणि इतिहास विषयात मौल्यवान कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. पंकज विद्याधर भोसले यावेळी शिवभूषण काव्यकथन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

Powered By Sangraha 9.0