‘दामिनी’ या पहिल्यावहिल्या मराठी ‘डेली सोप’ मालिकेच्या निर्मात्या, तसेच अन्य काही मालिका आणि चित्रपटांच्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री कांचन अधिकारी यांनी नुकतीच दै. ‘मुंबई तरुण भारत’ला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से आणि आठवणीही सांगितल्या. दरम्यान, कांचन अधिकारी यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘दूरदर्शन’च्या निवेदनापासून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम आणि चित्रपट प्रेक्षकांना दिले. तर आता पुन्हा एकदा ३० वर्षांनंतर ‘दामिनी’ सुरू झाली आहे.
त्या काळात एक महिलाकेंद्रित ‘दामिनी’सारखी मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्याची नेमकी संकल्पना कशी सुचली?
‘दामिनी’ ही मालिका मुळात फक्त १३ भागांची होणार होती. महिलाकेंद्रित मालिका म्हणून नव्हे, तर रोहिणी निनावेने मांडलेली ही संकल्पना गौतम अधिकारी यांना दाखवली गेली होती आणि मार्कंड यांनी ती दूरदर्शनकडे ‘पिच’ केली होती. त्या टप्प्यावर आम्ही तिला मर्यादित मालिका म्हणून करणार होतो आणि तिचं दिग्दर्शन मी करणार होते. त्यावेळी रोहिणी सचिवालयात काम करत असल्यामुळे पत्रकारिता आणि प्रशासनाची पार्श्वभूमी कथेला मिळाली. अशा पद्धतीने सुरुवात झाली. पण, अचानक आम्हाला सांगण्यात आलं की, ही मालिका ‘डेली’ करायची आहे. ‘डेली’ हा शब्द ऐकूनच आम्ही गोंधळलो. आजही आठवतं; मी मार्कंडला विचारलं, "डेली म्हणजे काय?” तो म्हणाला, "दररोज एक भाग.” मी लगेच विचारलं, "मग किती भाग? उत्तर आलं, २२. ते ऐकूनच प्रश्न पडला, इतके भाग द्यायचे, तर चित्रीकरण नेमकं कधी करायचं? कारण, तेव्हा एका भागासाठी चार-पाच दिवस लागत असत.
त्यावेळी कलाकारांची निवड कशी झाली होती? कारण, आताचे सगळेच मोठे चेहरे त्या मालिकेत झळकले होते.
हो, हो! नक्कीच. प्रतीक्षा लोणकरचं कास्टिंग प्रत्यक्षात गौतम अधिकारी यांनीच केलं होतं. त्यावेळी निशिगंधा वाड पण आलेली होती. गौतमजींचे शब्द आजही लक्षात आहेत. ते म्हणाले होते, "दामिनीच्या डोळ्यांत आग असली पाहिजे.” ही गोष्ट मी आजही लक्षात ठेवली आहे. आताच्या ‘दामिनी’ची भूमिका करणारी किरण पावसे अतिशय अप्रतिम काम करतेय. कारण, दामिनी अशी भूमिका आहे की, ती केवळ संवाद नव्हे, तर डोळ्यांतून भावना व्यक्त करू शकली पाहिजे. कारण, हा ‘सासू-सून सागा’ नाही, तर मुद्देसूद, ठाम मांडणी असलेली कथा आहे.
कास्टिंग करताना मी हेच निकष ठेवले होते.
प्रिया तेंडुलकर माझी खूप जवळची मैत्रीण होती, अगदी जिवलग. मी तिला स्वतः फोन करून सांगितलं, तुला हे काम करायलाच हवं. तेव्हा ती हसत म्हणाली, "जर तू स्वतः उभं राहून शूटिंग आणि दिग्दर्शन करणार असशील, तरच मी येईन.” तो अनुभव खरंच खास आणि सुंदर होता. ‘दामिनी’मध्ये महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, अंकुश चौधरी, कुलदीप पवार असे अनेक दिग्गज कलाकार होते. रवींद्र बेर्डे, अविनाश खर्शीकर, आनंद अभ्यंकर, लालणताई सारंग यांच्यासह आज आपल्यात नसलेले अनेक चेहरे त्या मालिकेचा भाग होते. पुढे लक्ष्मीकांत बेर्डे आणि रमेश भाटकर यांनीही यात काम केलं. आज त्यांची आठवण आली की, मन भरून येतं.
पहिल्या भागात दामिनी ‘ज्वालामुखी’ या वृत्तपत्रातून ‘प्रिंट जर्नालिझम’मध्ये होती. पुढे तिची मुलगी क्षितिजा पोलीस इन्स्पेटर म्हणून दाखवली आणि आता तिसर्या पिढीत किरण पावसे साकारत असलेली ‘दामिनी’ न्यूज चॅनेलमध्ये काम करतेय. हातात माईक घेऊन आजच्या समाजातील वास्तव मांडतेय, ’मी टू’, हुंडाबळी, हगवणे प्रकरणासारख्या समकालीन, जळजळीत केसेसवर थेट भाष्य करते.
पण, तेव्हाची मालिका आणि आताचं हे मालिका क्षेत्र याकडे तुम्ही कसं पाहता? आता खूप जास्त बदल झाले आहेत. वेब सीरिजकडे प्रेक्षकांचा कल वळलेला दिसतो.काय सांगाल?
तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर आज सगळंच बदललं आहे. तेव्हा आम्ही एका कॅमेर्यावर शूट करायचो, आता दोन कॅमेरे असतात. लेपल माईक, साऊंड, सगळ्या सोयी बदलल्या आहेत. तेव्हा हाय-बॅण्डवर शूट होत होतं, आता चिप्स आणि डिजिटल टेक्नोलॉजी आली आहे. म्हणजेच, तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यानंतर सासू-सून मालिकांचा जोर वाढला. आजच्या मालिका मला खूप भडक वाटतात, त्यांच्याशी ‘कनेक्ट’ होता येत नाही. मध्यमवर्गीय घर दाखवायचं आणि ते घर अगदी भलंमोठं असतं. पात्रं झोपतानाही दागिने घालून असलेली दाखवायची, हे विसंगत वाटतं. सतत मोठं पार्श्वसंगीत अतिशय लोज शॉट्स, उगाचचा गोंगाट हे सगळं तांत्रिकदृष्ट्या जरी भव्य असलं, तरी सौंदर्यदृष्ट्या मला फारसं भावत नाही.
आता कामाचे तासही प्रचंड वाढले आहेत. त्यात चॅनेल्सचा हस्तक्षेप खूपच जास्त असतो. ‘हे बदल, असं नको, हिलाच कास्ट करा, तो सीन असा का?’ अशा सूचना सतत येतात. मी हे सगळं ऐकलंय; पण तो मार्ग मी कधीच स्वीकारला नाही. म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजते की, मी ‘दूरदर्शन’च्या काळात काम केलं. अशाप्रकारच्या हस्तक्षेपात अडकून सर्जनशीलता गमावण्यापेक्षा, ‘हे मला नको’ असं ठामपणे म्हणणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
एकूणच तुमच्या दिग्दर्शनाच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरलेली स्त्री म्हणजे थेट पुरुषप्रधान विश्वातली वाटचाल. तो काळ तर अजूनच कठीण होता. तेव्हा मी अक्षरशः ‘मेन्स वर्ल्ड’मध्ये काम करत होते. खरं सांगायचं तर त्या काळात महिला दिग्दर्शक जवळजवळ नव्हत्याच. त्यामुळे प्रत्येक पाऊल संघर्षाचं, प्रत्येक यश लढून मिळवलेलं होतं.
- अपर्णा कड