छत्तीसगडमध्ये एकाच दिवशी शेकडो जणांची घरवापसी! ५० कुटुंबांतील एकूण १०५ व्यक्तींचा सहभाग

17 Jan 2026 12:40:22

मुंबई : छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील कातंगपाली येथे शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी आयोजित घरवापसी कार्यक्रमात इतर धर्म स्वीकारलेल्या १०० हून जणांनी सनातन धर्मात पुनःप्रवेश केला. वैदिक श्रीराम कथा व विश्व कल्याण महायज्ञाच्या पाचव्या दिवशी हा घरवापसी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे ५० कुटुंबांतील एकूण १०५ व्यक्तींनी वैदिक मंत्रोच्चारांच्या सान्निध्यात सनातन धर्मात घरवापसी केल्याचे निदर्शनास आले.

या समारंभाचे नेतृत्व ज्येष्ठ भाजप नेते व ‘अखिल भारतीय घरवापसी’ अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप जूदेव यांनी केले. त्यांनी घरवापसी करणाऱ्यांचे पाय धुवून स्वागत केले. यावेळी पारंपरिक विधीही पार पडले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला. या कार्यक्रमास अनेक पूज्य संत तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना प्रबल जूदेव म्हणाले की, धर्मांतरामुळे भारताची लोकसंख्या रचना (डेमोग्राफी) बदलत आहे. देशातील अनेक जिल्ह्यांत हिंदू समाज अल्पसंख्याक होत चालला असून ही बदलती लोकसंख्या रचना राष्ट्रासाठी गंभीर संकट आहे, असे त्यांनी नमूद केले. देशाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असून धर्मांतर हे भारतासाठी खरे संकट असल्याचेही त्यांनी सांगितले. नैतिक मूल्ये, परंपरा आणि सनातन संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

घरवापसी हे राष्ट्रनिर्माणाचे कार्य असल्याचे सांगत, वडील दिलीपसिंग जूदेव यांनी सुरू केलेल्या या अभियानाला आपण पुढेही चालना देत राहू, असे प्रबल जूदेव यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त केला.


Powered By Sangraha 9.0