मुंबई : "जगालाही प्रभावित करेल असा बलशाली आणि चारित्र्यवान समाज आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण बदलावे लागेल. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यामुळे चांगला बदल हवा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांच्या रक्षणासाठी हिंदू सम्मेलन समिती, गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) यांच्या वतीने भव्य “हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले. यावेळी सरसंघचालकांनी उपस्थितांसमोर पंच परिवर्तनातील बिंदूंची मांडणी केली.
गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित हे हिंदू संमेलन संतांच्या उपस्थितीत संपन्न झाले. संमेलनास ह. भ. प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), ह. भ. प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज (मठाधीश, गोवर्धन धाम, श्री क्षेत्र सरलाबेट) तसेच जगद्गुरु श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज (जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी आश्रम, श्री क्षेत्र वेरूळ) उपस्थित होते.
सरसंघचालक यावेळी म्हणाले, समाज बदलायचा असेल तर सर्वांनी मिळून काम करावे लागेल. केवळ बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जाती-वर्गांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण करायला हवेत आणि सर्वांशी सद्भावना ठेवली पाहिजे. कुटुंबात आपल्या संस्कृती व परंपरेवर चर्चा झाली पाहिजे. आपले जीवन जगताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. परदेशी वस्तूंच्या वापराऐवजी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपण आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीचे महत्त्व वाढेल. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणल्या तर आपला समाज सुरक्षित आणि समृद्ध बनेल.
कार्यक्रमात उपस्थित संतांनी आशीर्वचन केले. त्यांनी समाजात सद्भावना आणि कुटुंब प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. संघाने शंभर वर्षे अनेक अपमान सहन करत प्रवास केला आहे. जातिभेदाने विभागलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य संघाने केले. सामाजिक एकता जपत पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी हिंदू समाजाला केले असल्याचे भास्करगिरीजी महाराज म्हणाले. महंत रामगिरीजी महाराज यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, आपल्याला संघटित राहावे लागेल आणि समाजातील जातिवाद पूर्णपणे संपवावा लागेल. महंत शांतिगिरीजी महाराज म्हणाले की, समाजाने आपल्या संस्कृतीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. आपल्या कुटुंबाला संस्कारक्षम बनवा, त्यामुळेच समाज सुदृढ राहील.