‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ REVIEW : कॉमेडीची हसवा-फसवी

17 Jan 2026 13:06:13

बॉलीवुड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हटके सिनेमा घेऊन आला आहे. ‘आमिर खान प्रोडशन्स’ निर्मित ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ हा कॉमेडी चित्रपट दि. १६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, तर ‘एमी’ पुरस्कार विजेता स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास याने दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ या चित्रपटातून केली आहे. स्पाय-कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यात वीर दास, मिथिला पालकर आणि मोना सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय, आमिर खानसुद्धा लहानशा पाहुण्या भूमिकेत चित्रपटात दिसणार आहे. तसेच, या चित्रपटातून अभिनेता इम्रान खान बर्‍याच काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

चित्रपटाची कथा ब्रिटिशांच्या काळापासून सुरू होते आणि हा चित्रपट नेमका हिंदीच चित्रपट आहे ना? असा प्रश्न पडतो. पण, जसजशी कथा पुढे सरकते, तशी त्यातील भारतीय कॉमेडी पाहायला मिळते. वीर दास म्हणजेच ‘हॅपी’ हा एक ब्रिटिश गुप्तहेर. तो ब्रिटिश असला तरी त्याचे मूळ भारतात आहे, तर त्याचे दोन्ही बाबा (जे समलिंगी आईबाबा असतात) ब्रिटिश गुप्तहेर असतात. पण, पुढे त्याला स्वतःच्या भारतीय मुळांचा उलगडा झाल्यानंतर हॅपीचं आयुष्य गोंधळात सापडतं. पुढे तो भारतात येऊन गोव्यात पोहोचतो. तिथे आल्यानंतर मात्र त्याच्यासोबत अशा काही घटना घडतात, एका धोकादायक कटात तो सापडतो आणि कथा पुढे सरकते. मात्र, यामध्ये गंभीर गुप्तहेर कथानकाऐवजी चित्रपट प्रेक्षकांना सतत विनोद, उपरोध आणि चित्र-विचित्र प्रसंगांत गुंतवून ठेवतो. हॅपीचा ब्रिटिश-हिंदी उच्चार हा संपूर्ण चित्रपटात हसवणारा ठरतो. तेव्हा हॅपीसोबत नेमकं काय घडतं आणि काय-काय विनोदी घटना घडतात, हे सगळं तुम्हाला सिनेमातच पाहावं लागेल.

वीर दास याने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून, दिग्दर्शनही त्यानेच केले आहे, तर अमोघ रणदिवे यांनी कथा लिहिली आहे. ब्रिटिश भारतीय स्पाय आणि त्यातून भाषेची होणारी गफलत आणि बरेच प्रसंग ही अतिशय सुंदर संकल्पना या दोघांनीही प्रेक्षकांसमोर आणली आहे. वीर दासने त्याचे ब्रिटिश-हिंदी हे पात्र साकारताना अतिशय सुंदर भाषा साकारली आहे. मात्र, दोघांनी सादर केलेल्या या चित्रपटात कल्पनांची इतकी गर्दी आहे की, त्यातील एकही कल्पना नीट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. एखादा प्रसंग किंवा विनोद स्थिरावतोय, असं वाटत असतानाच, चित्रपट लगेचच दुसर्‍याच दिशेने धाव घेतो. परिणामी, सिनेमा स्वतःचाच शोध घेत सतत भोवतीभोवती फिरत असल्यासारखा भासतो.

आमिर खान आणि इम्रान खान यांच्या अगदीच अतिरंजित, कॅमिओ भूमिका दिसतात, तेव्हा क्षणभर ‘अरे, आता धमाल होणार!’ अशी भावना निर्माण होते. कुणाल रॉय कपूरही काही क्षणांसाठी झळकतो आणि हे सगळं पाहताना ‘दिल्ली बेली’मधील त्या धमाल खोडकर टोळीची आठवण होते. मात्र, फरक इतकाच की, ‘दिल्ली बेली’ने आपल्या विनोदी केंद्रबिंदूपासून कधीच लक्ष हटू दिलं नव्हतं. त्यातील विनोदी प्रसंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ मात्र अनेक दिशांनी एकाच वेळी धावण्याच्या नादात स्वतःचा तोल सावरू शकत नाही. त्यामुळे काही प्रसंग मजेदार वाटतात, काही विनोद खरंच मनोरंजन करतात; पण एकसंध आणि प्रभावी अनुभव देण्यात हा चित्रपट कमी पडतो.

मोना सिंगने साकारलेली ‘डॉन’ची भूमिका मात्र खर्‍या अर्थाने मजा आणते. टापटीप हेअरस्टाईल, गोव्यातील ते खास ड्रेस आणि संवाद यामुळे संपूर्ण व्यक्तिरेखा ऊर्जा घेऊन येते आणि प्रेक्षकांना खळखळून हसवते. याशिवाय, अभिनेत्री मिथिला पालकर, शारीब हाश्मी अशा कलाकारांनीही सुंदर काम केले आहे. विनोदी टायमिंग आणि भूमिका सुंदर असूनही अधिक प्रभावी संवाद आणि उत्तम सादरीकरण चित्रपटाला सुपरहीट करू शकले असते. याशिवाय, चित्रपटातील पार्श्वसंगीत आणि गाणीसुद्धा सर्वसाधारणच ठेवण्यात आली आहेत.

त्यामुळे पूर्णपणे विनोदी चित्रपट असतानाही खळखळून हसावे, अशी कॉमेडी चित्रपटात नाही. तसेच चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे लहान मुलांसह अजिबात हा चित्रपट पाहता येणार नाही, याची विशेष नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ हा चित्रपट नेहमीच्या ‘स्पाय-थ्रिलर’ची अपेक्षा ठेवणार्‍यांसाठी नाही. मात्र, वीर दासच्या विनोदशैलीचे चाहते आणि वेगळ्या, प्रयोगशील सिनेमांचा आस्वाद घेणारे प्रेक्षक यांना हा चित्रपट नक्कीच भावू शकतो. हा सिनेमा म्हणजे धाडसी प्रयोग आहे.काहींना आवडेल, तर काहींना अजिबातच आवडणार नाही.

दिग्दर्शक : वीर दास, कवी शास्त्री

निर्मिती : आमिर खान प्रोडशन्स

कलाकार : वीर दास, शारीब हाश्मी, मिथिला पालकर, मोना सिंग, सृष्टी तावडे, सुमुखी सुरेश, इम्रान खान,
आमिर खान

रेटिंग : 3 स्टार

- अपर्णा कड


Powered By Sangraha 9.0