कष्टाविना फळ न मिळते...

17 Jan 2026 12:11:17

कधी दुसर्‍यांची गायी-गुरे सांभाळत, तर कधी इतरांच्या शेतात मजुरी करून उपासमार सोसत शिक्षणाच्या जोरावर पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार्‍या शिवाजी धनाजी चव्हाण यांच्याविषयी...

अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन, आज स्टेट बँकेतून व्यवस्थापक म्हणून सन्मानाने शिवाजी धनाजी चव्हाण हे सेवानिवृत्त झालेले आहेत. पण, या एका पदामागे दडलेली कहाणी म्हणजेच गरिबीतून उभारी घेतलेल्या एका कुटुंबाच्या घामाच्या थेंबांची, अश्रूंची आणि स्वप्नांची गाथा आहे.बागलाण तालुक्यातील सोमपूर या शेती आणि पाण्याने समृद्ध असलेल्या पण, अगदीच कमी लोकवस्ती असलेल्या लहानशा गावात आणि परिस्थितीने गरीब घरात शिवाजी यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव पिंपळकोठे पण, पोटाची खळगी भरण्यासाठी, आई-वडिलांनी शिवाजी यांच्या मामांच्या आधाराने आपल्या चार मुलांचे पुढील आयुष्य घडविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यायाने त्यांना आपले मूळ गाव सोडावे लागले आणि सोमापूर येथे कायमचे स्थायिक व्हावे लागले.

शिवाजी यांच्या घरात तर दारिद्य्र पाचवीलाच पुजलेले. पण, स्वाभिमान आणि कष्टाची साथ मात्र शिवाजी यांच्या कुटुंबाने कधीच सोडली नाही. रोजगार सुरू राहून आपले आणि मुलांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून, शिवाजी यांच्या वडिलांनी आपल्या पत्नीच्या आत्या आणि मामा यांच्याकडे गायी-गुरे सांभाळण्याचेही काम सुरू केले. आई स्वाभिमानी, स्पष्ट बोलणारी; आपल्या आत्याच्या घरी, गावातील सधन शेतकर्‍यांच्या शेतात दिवस-रात्र राबत असे. सोमपूर गावात असे एकही शेत नव्हते, जिथे त्या आपल्या चारही मुलांना घेऊन त्या कामाला गेल्या नाहीत. चार मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी स्वतःचे आयुष्य अक्षरशः झिजवले.

शिवाजी घरातला सर्वात धाकटा असल्याने, तिघे मोठे भाऊ एकमेकांचे कपडे वापरत असत. तसेच, मिळेल ते अन्न खाऊन त्यांची गुजराणही सुरू होती. सर्व भावंडांच्या पायाला लहानपणी कधी चप्पल माहीत नव्हती पण, बुद्धी मात्र सर्वांचीच खूप तल्लख. परिणामी, आयुष्यात मोठी भरारी घेण्याचे स्वप्न कायम त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. घरच्या गरिबीचे चटके न कळत्या वयापासून सोसल्याने, कधीच श्रीमंतांच्या मुलांशी त्यांनी स्पर्धा केली नाही. तसेच, कधीही त्यांचा हेवा करावा असेही त्यांना वाटले. पण, परिस्थितीशी झुंज देण्याचे काम मात्र अविरतपणे सुरू होते. ‘गरिबी’ नावाच्या या अंधारात एकमेव कवडसा होता, तो म्हणजे शिवाजी यांचे मामा. ते स्वतः गरिबीतूनच वर येऊन शिक्षक झाले होते. त्यांनी शिवाजी यांना केवळ आधारच दिला नाही, तर भरपूर शिक्षण घ्या आणि पाचवीला पुजलेल्या या गरिबीतून बाहेर पडा, हे स्वप्न या चारही भावंडांच्या मनात त्यांनी रुजवले.

शनिवार-रविवार आणि दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस शिवाजी आणि त्यांच्या भावांचे, आई-वडिलांसोबत शेतात राबण्यातच गेले. तळहातावर आलेले फोड, अंगावरचा घाम आणि मनात शिक्षणाची उमेद याच जोरावर ते पुढे जात राहिले. त्यातूनच शिवाजी यांच्या मोठा भाऊ मामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, मामांसारखाच शिक्षक झाला. दुसर्‍याने ‘आयटीआय’चे शिक्षण घेऊन ‘मायको’ कंपनीत नोकरी मिळवली. तिसराही शिक्षक झाला आणि शिवाजी यांनी गणिताशी मैत्री केली. वाणिज्य शाखा निवडून पुढे त्यांनी ‘बीकॉम’ केले. मनाशी एकच स्वप्न होते, ते म्हणजे बँकेत नोकरी करायची.

त्यासाठी त्यांनी नाशिक गाठत कधी मित्रांच्या खोलीत, तर कधी मोठ्या भावाच्या घरी राहून, पडेल ते काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नाशिकमधील गंगेच्या जवळील अनेक दुकानांत त्यांनी वेळप्रसंगी नोकरीही केली. पुढे त्यांच्या कष्टाला यश आले. त्यांना स्टेट बँक ऑफ़ इंडियामध्ये नोकरी मिळाली. त्यांना पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्ह्यात रुजु व्हावे लागले. तेव्हा त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर स्मित ठेवूनच, त्यांना सलाम केला. लग्नाची वेळ आली, तेव्हा शिवाजी यांनी पुन्हा कृतज्ञतेचा मार्ग निवडला. ज्या मामांनी कुटुंबाला आधार दिला, त्याच मामांची मुलगी सुशीला यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

मामांच्या ऋणातून उतराई होण्याचा तो एक छोटासा; पण मनापासून केलेला प्रयत्न होता. सुशीला त्यांच्या आयुष्याच्या खंबीर साथीदार ठरल्या. दोघांनी मिळून आयुष्याची घोडदौड सुरू केली. आज त्यांना अश्विनी आणि चेतन ही दोन अपत्ये आहेत. अश्विनीने आजोबा आणि मामांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत, शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात देखील उतरवले. चेतन इंजिनिअर झाला. दुसर्‍यांचे कपडे घालणे, लोकांच्या शेतात राबणे, शिळे अन्न खाणे, गरिबीची लाज न बाळगता शिकण्याची जिद्द ठेवणे या सगळ्यांतून जात, शिवाजी चव्हाण आणि त्यांच्या भावांनी आयुष्यात प्रगतीची कास धरली. ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, ही त्यांच्या आई-वडिलांच्या त्यागाची, मामांच्या मार्गदर्शनाची आणि कष्टालाच देव मानणार्‍या वृत्तीची जिवंत साक्ष आहे. गरिबीवर मात करून सन्मानाने उभे राहता येते हे शिवाजी चव्हाण यांच्याकडून नक्कीच शिकता येण्यासारखे आहे. शिवाजी यांच्या याच उमेदीला आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.

- विराम गांगुर्डे


Powered By Sangraha 9.0