नात्यांच्या सर्वव्यापी रंगखुणा

17 Jan 2026 12:48:44

प्रत्येक माणसाचं त्याच्या भोवतालासोबत एक नातं तयार झालेलं असतं. त्याच्या सभोवतालाशी तो कायम संवाद साधत असतो. निसर्ग, पशू-पक्षी, इथपासून ते अगदी स्वतःच्या अंतरंगात डोकावूनसुद्धा स्वतःसोबत तो एक नवीन नातं तयार करत असतो. संवादाचं हेच सूक्ष्म रूप ज्यावेळी रंगांमधून व्यक्त होतं, त्यावेळेला एक वेगळाच अवकाश आपल्यासमोर उलगडत जातो. या रंगखुणा टिपण्याचं आणि लोकांसमोर उलगडण्याचं काम केले आहे, प्रख्यात चित्रकार सजल कांती मित्रा यांनी. दि. १३ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये मुंबईच्या जहांगीर कला दालन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये ‘रिलेशन्स’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचा आढावा घेणारा हा लेख...

आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा’ - बा. सी. मर्ढेकर

आयुष्याच्या एका टप्प्यावर पुढे जाण्याच्या आधी माणसाला स्वतःकडे बघण्याची गरज निर्माण होते. आपण आता जिथपर्यंत येऊन पोहोचलो, जो प्रवास केला, त्या सगळ्याचे आकलन करून पुढची वाटचाल करावी हा विचार त्यामागे असतो. अर्थात, हे करत असताना स्वतःच्या कृतीचा त्याला विचार करावा लागतोच. मात्र, त्याचबरोबर समाजाबरोबर असलेलं त्याचं नातं, त्याचे सहप्रवासी या सगळ्याबद्दल विचारविनिमय करणे क्रमप्राप्त होऊन बसतं. हीच गुंतागुंतीची प्रक्रिया ज्या वेळेला कागदावर उमटते, त्यावेळेला चित्रांचा एक अनोखा संगम तयार होतो. या चित्रांमधून केवळ नातीच उलगडतात असे नाही, तर कधी-कधी आपल्याला यातून जगाकडे आणि क्रमाने स्वतःकडे बघण्याची नवीन दृष्टी प्राप्त होते.

प्रख्यात चित्रकार सजल कांती मित्रा आपल्या चित्रांच्या माध्यमातून नात्यांचे एक वेगळे विश्व लोकांसमोर मांडतात आणि त्याचबरोबर नात्यांचा सर्वव्यापी अवकाशसुद्धा सादर करतात. उदाहरणार्थ, एका चित्रामध्ये आई आणि तिची दोन मुलं आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये नकळत जो त्रिकोण तयार झालेला आहे, ते त्या मुलांच्या आणि आईच्या नात्यावर भाष्य करणारे आहे. या चित्रांना स्वतःची अशी एक लय आणि बांधणी आहे. परंतु, ही लयसुद्धा चौकटीमध्ये बंदिस्त नसून, कॅनव्हासवर मुक्तपणे वावरणारी आहे. या चित्रांचे वैशिष्ट्य असे की, इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रवाहांचे दर्शन घडते. मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील जाणिवांच्या खोल डोहामधून ही चित्रं आपल्यासमोर येतात. या चित्रप्रदर्शनाचं नाव ‘रिलेशन्स’ असं आहे.

वेगवेगळ्या प्रकारची नाती हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि नातं म्हटल्यावर ते समाजातील वेगवेगळ्या घटकांना जोडणारा धागा आहे. तिथे माणसांची दाटी आपल्याला बघायला मिळते. हाच विचार अत्यंत खुबीने चित्रकार आपल्या चित्रातून मांडतो. माणसं दाटीवाटीने एकमेकांच्या अंतरंगाला स्पर्श करतायेत. माणसं एकमेकांना जोडली गेली आहेत, हा विचार यातून आपल्यासमोर मांडला गेला आहे.
या चित्रांमधल्या प्रत्येक माणसाचा आपण जर चेहरा बघितला, तर असं लक्षात येईल की, चित्रकाराने जाणीवपूर्वक तो अपूर्ण ठेवला आहे. कधी गालावरचे काही भाग निखळले आहेत, तर कधी चेहर्‍याचा आकारच असंबंध वाटतो. या सार्‍यातून माणसाच्या एकूण जीवनातला जो अपूर्णपणा आहे, तो अधोरेखित होतो. त्याला पूर्ण करण्याचा अट्टाहास चित्रकार करत नाही. कारण, माणसाचे वास्तवच अपूर्ण आहे, त्याला त्या परिपूर्णतेचा शोध सातत्याने घ्यायचा आहे. या पूर्णांकाच्या शोधामध्ये एक माणूस ज्यावेळेला दुसरा माणसाला भेटतो, त्यावेळेला जीवनातील वैफल्य कमी होतं; हेच या चित्रांमधून आपल्याला बघायला मिळतं.

‘मोनालिसा’च्या स्मितहास्याचे रहस्य काय, हे जगाला पडलेले कोडे आहे. त्याच धर्तीवर सजल कांती मित्रा यांच्या चित्रामध्ये माणसाच्या चेहर्‍यावर जी स्तब्धता आहे, तिचं नेमकं रहस्य काय, याचासुद्धा प्रेक्षकांना अंदाज लावावा लागतो. दर्शकाला एका क्षणाला हा चेहरा उत्कट भासतो, तर कधी अचानक त्या चेहर्‍यावरची स्तब्धता लक्ष वेधून घेते. त्या चेहर्‍यातील डोळ्यांमध्ये असलेला संथपणा हा एकप्रकारे आपल्या भोवतालाकडे आपण कसे पाहावे, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा आहे.

यातील आणखी एक लक्षवेधी चित्र म्हणजे, दोरीच्या साहाय्याने वर खेचल्या जाणार्‍या काही भातुकल्या. याबद्दलचे मर्म सांगताना चित्रकार सांगतात की, काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या कामगारांच्या जाणिवा त्यांनी या चित्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. संघर्षाचे जीवन जगणार्‍या माणसाच्या जीवनाचा खेळ कधी-कधी घातक होऊन बसतो, हेच आपल्याला या चित्रातून बघायला मिळते. चित्रकाराची संवेदनशीलता कशाप्रकारे व्यक्त होऊ शकते, याचा एक उत्कृष्ट नमुना यातून आपल्याला बघायला मिळतो.

या चित्रांमध्ये स्त्री आणि भोवताल असा विचार मांडणारी अनेक चित्रं आहेत. स्त्री आणि स्त्रीत्व या नात्याचा विचार चित्रकाराने अत्यंत संवेदनशीलपणे आणि तितक्या जबाबदारीने साकार केला आहे. अनेक वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये भूमीला ‘माता’ म्हटले आहे. हा स्त्रीत्वाचा विचार अत्यंत ममत्वाने मांडला आहे. अशातच, दालनातून पुढे जाताना दुर्गा मातेचे चित्र लक्ष वेधून घेते. सजल कांती मित्रा ज्या परिसरामध्ये आणि संस्कारांमध्ये वाढले, त्याचा त्यांच्यावर किती खोल परिणाम आहे हे आपल्याला या चित्रामधून बघायला मिळते. दुर्गा देवीचे हे चित्र म्हणजे रुद्र रस आणि करुणा यांचा अनोखा संगम साकारणारे चित्र आहे. देवीच्या डोळ्यांमध्ये करुणा असली, तरी हातामध्ये मात्र त्रिशूल आहे. या चित्रातली रंगसंगती अत्यंत जाणीवपूर्वक साकारण्यात आली आहे. देवीच्या याच चित्रासोबत मग, माता सरस्वती उमादेवी (दुर्गा), लक्ष्मी या देवींच्या चित्राचे आपल्याला दर्शन घडते. स्त्रीची ही वेगवेगळी रूपं छोट्या-छोट्या चौकटीतून अत्यंत खुबीने उलगडली आहेत.

सजल कांती मित्रा यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची नाहीये. चित्र बघणार्‍याला त्याच्या आकलनातून काय बोध होतो, हा विचार त्यांना मांडायचा आहे. भारतीय संस्कृती ज्या पद्धतीने व्यक्तीचा विकास आत्मज्ञानातून घडवते, त्याच पद्धतीने चित्रांचे विश्वसुद्धा आपल्या आकलनातून उलगडते आणि म्हणूनच हे चित्रप्रदर्शन वेगळं ठरतं.

Powered By Sangraha 9.0