डोंबिवली : ( Dr Ramchandra Godbole ) "आदिवासी क्षेत्रात काम करत असताना कधीतरी मनामध्ये निराशा निर्माण होते. अज्ञात भागात काम करतोय असे वाटायला लागते, अशा वेळी आपल्याकडून दिला जाणारा हा पुरस्कार प्रेरणादायी ठरतो व यातूनच प्रोत्साहन मिळते. मनातील निराशेचे मळभ यामुळे निघून जाते. शहरापर्यंत कार्य पोहोचवता येते,” असे मत आयुर्वेदाचार्य रामचंद्र त्रिंबक गोडबोले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दिला जाणारा ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कार प्रदान समारंभ नुकताच पार पडला, यावेळी ते बोलत होते. छत्तीसगढ राज्यामधील बस्तर भागात वंचित, उपेक्षित समाजामधील आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा करणारे आयुर्वेदाचार्य रामचंद्र त्रिंबक गोडबोले यांना यंदाचा २७वा ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कार डोंबिवली पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी डॉ. गोडबोले यांना शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके, सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष संजय दीक्षित उपस्थित होते.
डॉ. गोडबोले म्हणाले की, "आदिवासी भागांमध्ये कुपोषण, मलेरिया आणि सिकलसेल अॅनिमिया अशाप्रकारच्या समस्या असून, अंधश्रद्धा व अज्ञानामुळे यामध्ये वाढ होत आहे. शासनाचे सर्वप्रकारचे प्रयत्न व वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य यामुळे यामध्ये खूप फरक पडतोय. परंतु, अजूनही खूप काम बाकी आहे. याठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत, याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.” लग्नानंतर दहा दिवसांतच बस्तर या आदिवासी भागात काम करायला गेलो. यामागे डॉ. गोडबोले यांच्या पत्नी सुनीता गोडबोले यांचा दृढनिश्चय असल्याचेदेखील ते म्हणाले.
हेही वाचा : Pune Municipal Corporation: नागरिकांनी स्वीकारले विकासाचे व्हिजन
कामाची गरज लक्षात आल्याने आम्हाला स्वीकारले
आरोग्य क्षेत्रातील कामाच्या माध्यमातून आदिवासींशी संवाद साधता येतो व कुपोषणावर काम करीत असल्याने आदिवासींना या कामाची गरज लक्षात येते, त्यामुळे त्यांनी आम्हाला स्वीकारले. वनवासी कल्याण आश्रमातील दहा मुलींमुळे ‘माडिया’ व ‘गोंडी’ भाषा शिकता आल्या व हिंदी भाषा येत असल्याने अडचण आली नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा ठाणे जिल्ह्यातील पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम असलेला ‘रामानुजन गणित उद्यान’ या गणित प्रदर्शनाला डॉ. गोडबोले यांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये संस्थेच्या सर्व स्वामी विवेकानंद शाळांमधील माध्यमिक व प्राथमिक विभागातील प्रत्येकी दहा प्रकल्प सादर करण्यात आले.
संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मेघा कांबळी यांनी व संस्थेचे कार्यवाह शिरीष फडके यांनी आभार मानले. व्याख्यानमालेला माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसह संस्थेचे सर्व आजी व माजी पदाधिकारी, पालक, रात्र महाविद्यालय व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.