‘छावा फूट पाडणारा चित्रपट...’ ए. आर. रहमानच्या वक्तव्यामुळे नवा वाद, कंगनाने घेतला सडेतोड समाचार

17 Jan 2026 19:30:06

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी चित्रपट आणि संगीतसृष्टीत हळूहळू सांप्रदायिक विचारसरणीचा प्रभाव वाढताना जाणवत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आलं असून विविध सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. याचबरोबर त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या बहूचर्चित छावा या चित्रपटाविषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रहमान यांनी केवळ सांप्रदायिकतेवरच नाही, तर गेल्या आठ वर्षांत आपल्याला अपेक्षेइतकं काम का मिळालं नाही, यावरही भाष्य केलं. 

रहमान यांनी नेमकं काय म्हटलं?

बीबीसी एशियनला दिलेल्या मुलाखतीत रहमान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत केवळ गुणवत्तेच्या आधारे काम मिळत नाही, असं त्यांना वारंवार जाणवलं आहे. सध्या संगीत उद्योगाची सूत्रं अशा लोकांकडे आहे, जे ना सर्जनशीलतेला महत्त्व देतात, ना तिची समज ठेवतात. धर्म हाही कामाच्या संधी कमी मिळण्यामागचा एक घटक ठरत असल्याचं त्यांनी सूचित केलं. समोरून कुणी काही न बोलता मागे मात्र कुजबुज सुरू असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

रहमान यांनी पुढे सांगितलं की, चित्रपट आणि संगीत क्षेत्रात सांप्रदायिक भावना हळूहळू प्रभावी होत असल्याचं त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे. या वातावरणाचा थेट परिणाम त्यांच्या कामावरही होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘छावा’बाबत वादग्रस्त मत

चित्रपट ‘छावा’ विषयी बोलताना रहमान म्हणाले की, हा चित्रपट लोकांमध्ये फूट पाडणारा वाटतो. त्यांच्या मते, समाजातील विभाजनाचा या चित्रपटाने काही अंशी फायदा घेतला आहे. मात्र, त्याच वेळी या चित्रपटामागचा हेतू शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचाच असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

या सर्व विधानांमुळे ए. आर. रहमान पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडले असून, चित्रपटसृष्टीतील अंतर्गत वास्तवावर नव्याने वाद सुरू झाला आहे. रहमान यांच्या या वक्तव्यामुळे सिनेविश्वातूनही त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे. रहमान यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने म्हटलं की,

‘प्रिय रहमान जी, मला चित्रपटसृष्टीत एका भगव्या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि पक्षपाताला सामोरं जावं लागतं. तरीही मला हे म्हणावं लागेल की, तुमच्यासारखा पूर्वग्रहदूषित आणि द्वेष पसरवणारा माणूस मी आजवर पाहिलेला नाही. मी तुम्हाला माझ्या दिग्दर्शकीय चित्रपट ‘इमरजन्सी’ची कथा सांगू इच्छित होते. कथा ऐकणं तर दूरच, तुम्ही मला भेटायलाही नकार दिला होता. तुम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कोणत्याही प्रचारकी चित्रपटाचा भाग व्हायचं नाही. खरंतर ‘इमरजन्सी’ला सर्व समीक्षकांनी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून गौरवलं, इतकंच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही माझ्या चित्रपटाचं कौतुक करत चाहत्यांची पत्रं पाठवली. मात्र तुम्ही तुमच्या द्वेषामुळे आंधळे झाला आहात. मला तुमची कीव वाटते.’


दरम्यान, लेखक जावेद अख्तर यांनी रहमान यांच्या दाव्यांशी असहमती दर्शवली. मुंबईत राहून काम करताना त्यांनी कधीही अशा प्रकारची सांप्रदायिकता अनुभवली नसल्याचं ते म्हणाले. इंडस्ट्रीत रहमान यांना प्रचंड आदर आहे आणि छोट्या निर्मात्यांनाही त्यांच्याशी संपर्क साधताना संकोच वाटतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. गायक शान यांनीही रहमान यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. संगीत क्षेत्रात धर्माच्या आधारावर काम दिलं जात नाही, तर केवळ संगीताची गरज आणि गुणवत्ता पाहिली जाते, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. चांगलं काम आणि दर्जेदार संगीत तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

गायक हरिहरन यांनी हा विषय अधिक गुंतागुंतीचा असल्याचं सांगत, आज इंडस्ट्रीत कलेपेक्षा पैशांना प्राधान्य दिलं जात असल्याची चिंता व्यक्त केली. जर संगीताकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं, तर त्याचे परिणाम काय असतील, हे सर्वांनाच माहीत असल्याचं त्यांनी सूचित केलं. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, गेल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत असा भेदभाव कधीही अनुभवलेला नाही. इथे फक्त प्रतिभेला महत्त्व दिलं जातं, धर्माला नाही, असं त्या म्हणाल्या. रहमान यांच्यासारख्या यशस्वी कलाकाराने असं वक्तव्य का केलं, याचं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं. एकूणच, ए. आर. रहमान यांच्या विधानामुळे चित्रपट आणि संगीतसृष्टीतील अंतर्गत वास्तवावर पुन्हा एकदा उघडपणे चर्चा सुरू झाली आहे.


Powered By Sangraha 9.0