मुंबई भाजपचीच!

17 Jan 2026 11:07:43

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तितक्याच अवघड असतात. अनेक गुंतागुंतीच्या युत्या-आघाड्यांमधून आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्यात मुरब्बी नेत्यांच्या नेतृत्वाचा इथे सर्वस्वी कस लागतो. मुंबईमध्ये प्रथमच आपला महापौर निवडून आणण्याइतके बहुमत मिळविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची घराणेशाहीच्या विळख्यातून मुक्तताही केली आहे. फडणवीस यांनी विधानसभेनंतर राज्यभरातील बहुसंख्य महापालिकांमध्येही भाजपला विजयी केल्याने ते निर्विवादपणे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ठरले आहेत.

भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय प्राप्त करून इतिहास घडविला. या निर्णायक विजयामुळे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला आपल्या वैयक्तिक बँक खात्याप्रमाणे वापरून भकास करणार्‍या नेत्यांच्या मगरमिठीतून तिला मुक्तता मिळाली. मुंबईच्या विकासाचा वारू आता वेगाने दौडेल, यात तीळमात्रही शंका नाही. जवळपास नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी विकासाच्या पारड्यात भरभरून मतदान केले. मुंबईप्रमाणेच राज्यातील अन्य २८ महापालिकांच्याही निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून, त्यापैकी निदान २५ महापालिकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे. भाजपचा हा राज्यातील सर्वात व्यापक आणि भव्य विजय असून, त्याचे शिल्पकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले आहेत.

महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य निवडणुका या सर्वात अवघड निवडणुका असतात. याचे कारण म्हणजे, त्यात गुंतलेले स्थानिक हितसंबंध. राज्य स्तरावरही कार्यरत नसलेल्या पक्ष व संघटनांचाही मोठा प्रभाव या निवडणुकांवर पडलेला असतो आणि प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आकांक्षांचेही आव्हान असते. अशा निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणाशी युती करील, त्याचा काही भरवसा नसतो. या आघाड्या-युत्यांच्या गुंतागुंतीतून आपल्या पक्षाला निर्णायक विजय मिळवून देण्यात नेतृत्त्वाचे सारे कौशल्य पणाला लागते. मुंबईसारख्या महानगरीची आव्हानेही अशीच बुलंद होती. पण, ती लीलया पेलताना फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळवून आपल्या मुरब्बी नेतृत्त्वाला प्रस्थापित केले आहे, हे निश्चित!

मुंबई महापालिकेच्या शेवटच्या निवडणुकीत अखंड शिवसेनेने ८४, तर भाजपने ८२ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरच्या काळात शिवसेना फुटली आणि युती तुटली. कालच्या निवडणुकीत भाजपने आपले संख्याबळ जवळपास १०० जागांपर्यंत वाढविले असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाला जवळपास ७० जागांपर्यंत रोखले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अपेक्षेइतकी कामगिरी करता आलेली नाही. शिंदे यांची शिवसेना ही अधिकृत धरली जात असली, तरी अजूनही शिवसेना म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाचेच नाव किमान मुंबईत मराठी माणसाच्या नजरेसमोर येते, हे कालच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या जागा पाहिल्यास सिद्ध होते. त्यामुळे मुंबईत शिंदे यांच्या सेनेला मर्यादित यश मिळाले. तरीही काल झालेल्या निवडणुकीत भाजपने मराठी माणसांच्या मनाची पकड घेतल्याचे स्पष्ट दिसून येते.

कालच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सर्वात भाग्यशाली ठरला. गेल्या महापालिकेत उबाठाने नगरसेवक चोरल्यामुळे या पक्षाचा एकच नगरसेवक उरला होता. मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांनी अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या. लोकांसाठी कसलेही काम केले नाही. तरीही न केलेल्या कामाबद्दल जनतेने त्यांचे एकअंकी का होईना नगरसेवक निवडून दिले. ज्याच्या नावाने गेली २० वर्षे शिमगा केला, त्या चुलत भावाच्या नावावरच राज ठाकरेंना हा विजय मिळाला. एकेकाचे नशीब, दुसरे काय! अर्थात, येत्या काळात राज ठाकरे उबाठा सेनेशी निष्ठावान राहतीलच, याची खात्री कोणी देऊ शकत नाही.

या निवडणुकीने ठाकरे घराण्याची मुंबईवरील पकड सैल केली असली, तरी उबाठा सेनेत अजून थोडी धुगधुगी शिल्लक राहिली आहे. अर्थात, तीन दशके मुंबईत आपली पाळेमुळे रोवलेला पक्ष एका निवडणुकीत नेस्तनाबूत होत नसतो. पण, आजघडीला उद्धव ठाकरे हे राज्याच्या सत्तेच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत, हे निश्चित. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या कोणत्याही स्तरावर ते सत्तेत नाहीत. राज्यात यापुढील निवडणूक थेट २०२९ मध्ये असल्याने या काळात पक्ष जिवंत ठेवण्याचेच काम त्यांनी केले, तरी खूप झाले. ते करण्यासाठी लागणारे अर्थबळ ते कसे उभे करणार, हा प्रश्नच आहे. आपल्या मूळ पिंडाशी विपर्यस्त विचारधारेशी जवळीक साधल्यावर त्यांची अवस्था ‘ना घरका ना घाट का’ अशीच झाली. त्यांनी लोकांच्या विश्वास गमावला. नव्या मतदारांनीही त्यांना पूर्णपणे आपलेसे केलेले नाही. यापुढील काळात राजकारणातील आपले नेमके स्थान काय, हे जर त्यांना शोधता आले नाही, तर ते राजकारणातून नामशेष होतील, यात शंका नाही.

मुंबईतील मुस्लीम मतांचीही विभागणी झाल्यामुळे काँग्रेसलाही फारशा जागांवर यश आलेले नाही. मुस्लीम मतांसाठी काँग्रेसला असदुद्दिन ओवेसी यांचा एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांच्याशी स्पर्धा करावी लागली आणि मुस्लिमांनीही एमआयएमला पहिल्या पसंतीची मते देऊन काँग्रेसला धक्का दिला. जेथे हे तीन पक्ष होते, तेथे अशी स्पर्धा झाली, तरी अनेक ठिकाणी मुस्लिमांची मते उबाठा सेनेला मिळाल्यानेच त्यांचा पक्ष अगदीच भुईसपाट झाला नाही. राज ठाकरे यांच्याशी युती केल्याचा काहीही फायदा उबाठा सेनेला झालेला नाही.
मुंबईसह राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्याचे सर्व श्रेय हे नि:संशयपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच! पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या महापालिकांमधील शरद पवारांचे वर्चस्व संपुष्टात आणून तेथे भाजपला विजय मिळवून देण्याचे श्रेयदेखील त्यांचेच!

उत्तर, पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा-विदर्भ असो, सर्वत्र भाजपचा झेंडा फडकत राहील, याची निश्चिती फडणवीस यांनी केली. विधानसभेनंतर राज्याच्या सर्व भागांतील महापालिकांमध्ये भाजपला निर्णायक विजय मिळवून दिल्यामुळे फडणवीस हे आज महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते बनले आहेत. मुंबईत भाजपकडे नाव घेण्यासारखा नेता नव्हता. मात्र, फडणवीस यांच्या विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्त्वावर मुंबईकरांनी विश्वास टाकला आहे. हा नेता दिलेली आश्वासने पाळतो, हे मुंबईकरांनी अनुभवले. मुंबईतील जनजीवन सुसह्य करण्यासाठी फडणवीस यांच्या काळात उभे राहिलेल्या कोस्टल रोड, भुयारी मेट्रो, अटलसेतू आणि नवी मुंबई येथील नवा विमानतळ यांसारख्या प्रकल्पांनी फडणवीस यांची विकासपुरुष आणि ‘मुंबईचे प्रश्न सोडविणारा नेता’ अशी प्रतिमा उभी राहिली. मुंबईत मेट्रो रेल्वेच्या अन्य मार्गांचे, तसेच बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणार्‍या अनेक नव्या मार्गांचे काम सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवासाचा वेळ वाचविणारा मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई-नवी मुंबई-ठाणे वगैरे स्थळांना जोडणारा सागरी प्रवासी वाहतूक प्रकल्पही आकारास येत आहे. तसेच ठाण्याला घाटकोपरशी जोडणार्‍या मुक्त मार्गाच्या उभारणीचेही काम वेगात सुरू आहे. यांसारख्या विविध वाहतूक प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतुककोंडी तर कमी होईलच, पण प्रवाशांना झटपट दूरच्या स्थळी जाण्याचे विविध पर्यायही उपलब्ध होतील.

भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या १०० हून अधिक जागांमध्ये भाजपचा वाटा सिंहाचा आहे, यावरून फडणवीस यांच्या एकमुखी नेतृत्त्वाचे महत्त्व स्पष्ट होईल. फडणवीस हे मूळ मुंबईचे नसूनही त्यांनी या शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. मुंबईला गेली २५ वर्षे वेटोळे घालून बसलेल्या ठाकरे घराण्याला सत्तेतून उखडून काढणे ही सोपी गोष्ट नव्हती, हे उबाठा सेनेला मिळालेल्या जागांवरून दिसून येईल. शिवाय राज्याच्या ग्रामीण भागांतील महापालिकांमध्येही भाजपचा भगवा फडकविला. यावरून त्यांच्यावर केवळ शहरी नेता असा ठसा उमटविता येणार नाही. मुंबई आणि राज्यातील भाजपच्या विजयी घोडदौडीचे ‘धुरंधर’ हे देवेंद्र फडणवीसच आहेत, हे मात्र खरे. या विजयाचे परिणाम राष्ट्रीय स्तरावरही उमटतील, यात शंका नाही!



Powered By Sangraha 9.0