ठाणे : ( bjp ) ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका निवडणुकीच्या शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी लागलेल्या निकालांमध्ये कुठे आघाडी, तर कुठे बिघाडी झाल्याचे दिसले. तर, पहिल्यांदाच काही पक्षांनी खाते उघडले. पण, महानगरपालिकांच्या निकालामध्ये भाजप आणि शिवसेना पक्षाने कायम आघाडी ठेवली होती. यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला मोठी आघाडी मिळाली.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात जागांवर निवडून आले. निकालाच्या सुरुवातीलाच महायुतीच्या उमेदवारांनी खाते खोलले. यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपने निकालाची आघाडी ठेवली होती. पहिल्यांदाच ‘एमआयएम’ पक्षाने महानगरपालिकेत खाते उघडले आहे. याठिकाणी ठाकरे बंधूंची सभा होऊनही त्याचा फारसा प्रभाव मतदारांवर पडला नाही. या अटीतटीच्या लढतीमध्ये ‘प्रभाग क्र. ९’मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेश पाटील कित्येक वर्षांपासून नगरसेवक होते. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी पराभूत केले. तर ‘प्रभाग क्र. २३’मधून शिवसेनेच्या मनाली पाटील यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार प्रमिला केणी विजयी झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील प्रभागात ठाकरे सेनेचा नगरसेवक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातील प्रभागात ठाकरे सेनेच्या उमेदवाराने बाजी मारत आश्चर्यकारक निकालाची नोंद केली आहे. इथे माजी महापौर अशोक वैती यांचा ६६७ मतांनी पराभव करत शिवसेना ‘उबाठा’चे शहाजी खुस्पे विजयी झाले. त्यामुळे शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागाचा नगरसेवक ठाकरे सेनेचा असणार आहे. ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव, तर शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या विजयी झाल्या आहेत. तर काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार वैभव कदम यांनी पराभव केला.
‘केडीएमसी’त ‘मनसे’ने पहिल्यांदाच उघडले खाते
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निकालाला सुरुवात होताच भाजपने आघाडी घेतली, तर शिवसेना शिंदे गट दुसर्या स्थानी होता. कल्याण-डोंबिवली येथे ‘ईव्हीएम’ मशीन बदलली असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला होता. याठिकाणी ‘मनसे’ने पहिल्यांदाच खाते उघडले. भाजपच्या सर्वाधिक जागा याठिकाणी निवडून आल्या, तर शिवसेना शिंदे गट दुसर्या स्थानी होता.
हेही वाचा : Sanjay Raut: राऊतांचं अजब विश्लेषण, काँग्रेसमुळे ठाकरेंना फायदाच झाला!
नवी मुंबईतही भाजपचा नंबर पहिला
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट पक्षामध्ये ‘काटे की टक्कर’ होती. परंतु, याठिकाणी निवडणुकीच्या निकालात भाजपने आघाडी घेतली होती, तर शिवसेना (शिंदे गट) दुसर्या स्थानी होती. याठिकाणी निकालात भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांना एकहाती सत्ता राखण्यात यश आले, त्यांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक हेदेखील विजयी झाले.
भिवंडीत युती-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निकालात भाजप पक्ष आघाडीवर होता, तर शिवसेना शिंदे गट दुसर्या स्थानी होता. याठिकाणी महायुतीची आघाडी ठळकपणे दिसून येत होती. यामुळे भाजपच्या २२ जागा निवडून आल्या, तर शिवसेना शिंदे गटाच्या १२ जागा निवडून आल्या; तर काँग्रेस ३० जागा, समाजवादी पार्टी ६ जागांवर निवडून आले. याठिकाणी भाजप-शिवसेना महायुती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अटीतटीची निवडणूक झाली.
उल्हासनगरात शिंदे गट-भाजपत चढाओढ
उल्हासनगर महानगरपालिकेत निकालाच्या सुरुवातीपासून भाजप आघाडीवर होता, तर शिवसेना शिंदे गट दुसर्या स्थानी होता. याठिकाणी भाजप - शिवसेना शिंदे गट महायुती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. याठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागा निवडून येण्यामध्ये मोठी चढाओढ लागली होती.
मीरा-भाईंदरमध्ये भाजपच सर्वोच्च
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत निकालाच्या सुरुवातीलाच भाजप आघाडीवर होता. भाजपने आघाडी राखत याठिकाणी एकहाती सत्ता मिळवली. याठिकाणी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विशेष मेहनत घेऊन मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपचे उमेदवार निवडून आणले. विशेष म्हणजे याठिकाणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचादेखील याठिकाणी प्रभाव होता. त्यांना काही जागांवर समाधान मानावे लागले. परंतु, या मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपच सर्वोच्च पक्ष ठरला. यामुळे या महानगरपालिकेत एकहाती सत्ता भाजपची आली आहे.