बड्या बड्या बाता...

16 Jan 2026 10:35:55
Pakistan
 
पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांत त्यांच्या नेत्यांच्या तोंडात वाक्य असते ‘इन्शाअल्ला इंडिया से हम आगे हैं...’ पण, सत्य काय आहे? पाकिस्तान भारतापेक्षा कोणत्या बाबतीत पुढे आहे, तर पाकिस्तानच्या सरकारने त्यांच्या देशात कौटुंबिक आर्थिक सर्वेक्षण केले आणि त्यात जाहीर झाले की, पाकिस्तानमधील चार कुटुंबांपैकी एक कुटुंब सकस आहारापासून वंचित आहे. कुपोषण, अस्थिरता, हलाखी आणि तणावग्रस्त जीवन, युद्धाचे सावट या सगळ्याबाबतीत पाकिस्तान नक्कीच भारताच्या पुढे आहे. पण, ‘घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी पाकिस्तानची मानसिकता!
 
तर पाकिस्तानच्या सर्वेक्षणानुसार, त्या देशामध्ये २०१८-१९ साली खाद्य असुरक्षितता १५.९ टक्के होती, ती वाढून २०२४-२५ साली २४.४ टक्के झाली. शहरी भागात २०.६ टक्के, तर ग्रामीण भागात २६.७ टक्के कुटुंबे अन्नटंचाईने ग्रस्त आहेत. पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने उद्योगधंदे जरी वसलेत, तरीसुद्धा पाकिस्तानच्या स्थानिकांना त्यात नोकरी मिळण्याची मारामार. कारण, पाकिस्तानमध्ये सरकारी सार्वजनिक शिक्षणव्यवस्था कुचकामी. त्यामुळे खासगी शिक्षणव्यवस्थेवर सगळा भर. पण, महागाई वाढल्याने लोकांची शिक्षण न घेण्याची मानसिकता वाढली.
 
मदरशातले शिक्षण आणि ‘कुराण आयात’ जे सांगेल तेच आणि तेवढेच खरे, यावर इथली बहुसंख्य जनता भर देते. त्यामुळे विज्ञानवादी आणि तर्कनिष्ठ, नैतिक आणि व्यावहारिक खर्‍या शिक्षणापासून इथली जनता दुरावली. मग, स्थानिक पाकिस्तान्यांना नोकरी मिळत नाही. यामुळेच पाकिस्तानमध्ये ७१ टक्के बेरोजगारी. ५.९ दशलक्ष लोक बेकार आणि त्यापैकी ४.६ दशलक्ष अशिक्षित. याच अनुषंगाने ‘जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५’नुसार स्पष्ट झाले की, महिला अत्याचार आणि भेदभाव यामध्ये २०२४ साली पाकिस्तान १४८ देशांपैकी तिसर्‍या स्थानावर होता. पण, २०२५ साली महिला भेदभावामध्ये पाकिस्तानने पहिला क्रमांक पटकावला आहे. महिलांवर अत्याचार, बेकारी, गरिबी, कुपोषण याच क्षेत्रात पाकिस्तान भारताच्या पुढे आहे.
 
जगात आपण भारतापेक्षा भारी असावे, या दिवास्वप्नात पाकिस्तान भरकटला आहे. हे भरकटणे किती तर? ‘ऑपरेशन सिंदूर’ करून भारताने पाकिस्तानला नामोहरम केले, हे सगळ्या जगाने पाहिले. पण, पाकिस्तान आता म्हणतो की, "भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ केले; पण त्यात आम्ही भारताला हरवले. त्यामुळे जगभरात आमच्या सैनिकी शस्त्रे, विमानांची मागणी वाढली आहे.” काय म्हणावे? पाकिस्तानच्या शस्त्रांकडे आशाळभूतपणे कोण बघते, तर केवळ पाकिस्तानचा जुळा भाऊ बांगलादेश. ‘उघड्याकडे ना*ड गेलं आणि रात्रभर थंडीने कुडकुडलं’ अशी या दोन देशांची गत. मात्र, पाकिस्तानच्या फुशारक्या काय, तर सगळे जग पाकिस्तानच्या सैनिकी विमाने आणि शस्त्रास्त्रांची मागणी करते.
 
असो. आपण भारतापेक्षा वरचढ आहोत, अशी पाकिस्तान स्वतःचीच कितीही वरवर भलामण करत असला, तरीसुद्धा आतले खरे सत्य त्याला माहिती आहे. २०१४ पूर्वी पाकिस्तान सातत्याने भारताशी आगळीक करायचा; पण काँग्रेस सरकारने कधीही जोरदार प्रत्युत्तर केले नाही. (अपवाद भाजप सरकार असतानाचे ‘ऑपरेशन कारगिल’). यावेळीही २०२५ साली ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला धडा शिकवला. भारताविरोधात काहीही केले, तर भारत आपल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे नुकतेच पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि तुर्कीये यांच्यासोबत मिळून ‘नाटो’सारखी संघटना निर्माण करण्याची सुरुवात केली. तुर्कीयेसारखेच पाकिस्तानही धर्मांध आहे.
 
मात्र, कट्टर मुस्लीम आहोत, ‘सेव्ह गाझा’ म्हणत टाहो फोडणार्‍या पाकिस्तानने त्यांच्या सैन्याला पॅलेस्टाईनविरोधात उतरवले. तेव्हाच पाकिस्तान पैशासाठी काहीही करू शकतो, हे सिद्ध झाले. त्याआधीही भुक्कड पाकिस्तानची अशी अनेक कटकारस्थाने बाहेर आलेलीच आहेत. हे सत्य जगभरातल्या इस्लामिक देशांना माहिती आहे. त्यामुळे करार करण्याचे पाकिस्तानचे नाटक कितीकाळ चालेल, हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये सर्वच क्षेत्रांत अराजकता माजली आहे. कारण, नुसत्या मोठ्या बाता करून देश जगवता किंवा चालवता येत नाही. याबाबत ग्रामीण म्हण आहे, ‘बड्या बड्या बाता आणि ढुं*ण खाई लाथा...’ बस, पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत आणखीन काय बोलावे?
 
 
Powered By Sangraha 9.0