मुंबई : ( Aaditya Thackeray’s Emotional Post Goes Viral ) निकालाच्या आदल्या दिवशी युवासेना प्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “हा फोटो फक्त उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र उभे आहेत एवढाच नाही, तर तो त्यापेक्षा खूप अधिक खास आहे.”
आदित्य ठाकरे पुढे लिहितात की, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या प्रचारसभेत ते भाषण करणार की नाही, याबाबत त्यांनाही खात्री नव्हती. कारण सभेला दोन दिग्गज नेते संबोधित करणार असल्याने वेळ मिळेल की नाही, याबाबत शंका होती.
हेही वाचा : Municipal Corporations Elections : जिल्ह्यातील महापालिका मतदान पन्नास टक्के पार
मात्र त्यांचे नाव जाहीर झाले आणि ते भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही आदित्य ठाकरे भाषण करणार असल्याची कल्पना नव्हती. आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीर होताच, काकांच्या घरी असलेले हे दोघेही घाईघाईने गच्चीवर आले आणि तिथून त्यांनी आदित्य ठाकरेंचे भाषण ऐकले.
या क्षणाची आपल्याला तेव्हा कल्पना नव्हती, असे सांगताना आदित्य ठाकरे म्हणतात की, “त्या दोघांसारख्या उत्तम वक्त्यांसमोर भाषण करायचं म्हटलं तर कसं जमलं असतं, याचाच विचार आला असता.”
मात्र हा क्षण छायाचित्रात टिपला गेला, तो आपल्या आयुष्यातील एक खास क्षण असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं आहे.