ग्रामविकासी तुकाराम...

15 Jan 2026 12:36:22
Tukaram More
 
वेल्ह्याच्या तुकाराम मोरे यांना ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यासा’चा सहवास लाभला आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्यांच्या या जीवनप्रवासाविषयी...
 
तुकाराम मोरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातले गुहिणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सेवा प्रकल्पा’तून चालणार्‍या वेल्हे येथील ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यास’ या संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर तुकाराम यांचे पूर्ण आयुष्यच बदलले. संस्थेबरोबर तालुक्यातल्या अनेक गावांत पुढाकार घेत त्यांनी परिवर्तनाची नवी पहाट निर्माण केली.
 
‘लहानपण देगा देवा’ असे संत तुकाराम सांगून झाले. पण, वेल्ह्याच्या या तुकारामाच्या आयुष्यात सुखाचे लहानपण आलेच नाही. घरची स्थिती अत्यंत हलाखीची. शेतात एकतर पिकत नसे किंवा पिकले तर विकत नसे. त्यांचे वडील कुटुंबाचा गाडा हाकत असतानाच, मोरे कुटुंबावर एक मोठा आघात झाला आणि तुकाराम तिसरीला असतानाच त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या निधनाने त्यांचे शिक्षण थांबले, ते कायमचेच. पण, पोटापाण्यासाठी तुकाराम यांना गावात पडेल ती कामे करावी लागली. शेतकर्‍याच्या शेळ्या चारण्यासाठी ते रानावनात भटकू लागले. त्यातून मिळणार्‍या चार आण्यातून ते त्यांचा काय तो उदरनिर्वाह होईल. वडील गेले त्यावेळी त्यांची मोठी बहीण सहावीत, तर छोटा भाऊ सहा महिन्यांचा होता. गावात राहून आपले पोट भरणार नाही, हे ओळखून त्यांनी एका मित्राबरोबर वयाच्या बाराव्या वर्षीच मुंबई गाठली.
 
मुंबईला येऊन काय करायचे? हा मोठा प्रश्न त्या बाल तुकारामासमोर आ वासून उभा होता. त्यावेळी गावातीलच एका व्यक्तीच्या मदतीने त्यांनी लालबाग येथील एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करण्यास सुरुवात केली. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी ऋतुमानानुसार येणारे व्यवसाय केले. उन्हाळ्यात जांभळे विकली. कुल्फी बनवून विकण्याचा व्यवसाय केला. मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरून भाजीविक्रीही केली. मुंबईत सुमारे १५ वर्षे विविध व्यवसाय केल्यानंतर त्यांना समाजाची एक ओळख गवसली होती. या १५ वर्षांत त्यांचे तीन-चार महिन्यांतून गावी जाणे व्हायचे. त्यानंतर गावातीलच एका व्यक्तीने तुकाराम यांची घर उभे करण्याची धडपड पाहून स्वत:च्या मुलीचा त्यांच्यासोबत विवाह लावून दिला. एवढी वर्षे अस्थिर असलेले कुटुंब आता कोठे थोडेसे स्थिर व्हायला सुरुवात झाली. लग्नानंतरही काही काळ त्यांनी मुंबईत भाजीविक्रीचा व्यवसाय केला. परंतु, वारंवार गावी जाऊन मुंबईत राहणे शक्य होत नसल्याने त्यांनी गावचा रस्ता धरला. गावाला गेल्यानंतर त्यांनी पडीक पडलेल्या जमिनीला कसण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान, त्यांनी त्यांची मुले ‘तोरणा-राजगड न्यासा’च्या वसतिगृहात शिकण्यासाठी ठेवली. यावेळी मुलांच्या निमित्ताने त्यांचे वसतिगृहात येणे-जाणे वाढल्यानंतर तेथील व्यवस्थापक रमेश आंबेकर यांच्यासोबत त्यांचा परिचय झाला. त्यानंतर त्यांनी न्यासाच्या माध्यमातून रमेश आंबेकर यांच्यासोबत वेल्हे तालुक्यात विविध कामांमध्ये सक्रिय पुढाकार घेतला.
 
आंबेकरांचा तुकाराम यांच्या गुहिनी गावात ग्रामविकासाच्या निमित्ताने वारंवार प्रवास व्हायचा. अनेक ग्रामस्थ मुख्य समस्या यावेळी त्यांना सांगत. असेच एकदा तुकाराम यांनी गावात पाण्याची खूप मोठी समस्या असल्याचे बोलून दाखवले. त्यावर आंबेकरांनी याकामी गावातील ग्रामस्थांनी न्यासाच्या मदतीने कार्य केले, तरच गावातील पाण्याची समस्या सोडवली जाऊ शकते, असे सूचविले. मग तुकाराम यांनीही या सर्व कामांत शेवटपर्यंत राहण्याचे बोलून दाखवले. त्यानंतर गुहिनी, खुलशी अशा विविध गावांत न्यासाच्या माध्यमातून विहिरी बांधण्यात आल्या. यासाठी गावातील सर्वांना एकत्र करणे ही खूप मोठी जिकिरीची गोष्ट तुकाराम यांनी लीलया पार पाडली. संपूर्ण गुहिनी गाव एकत्र करून त्यांनी यासाठी छोटा निधीदेखील उभारला. त्यानंतर वेल्हे परिसरातल्या सुमारे १४ गावांत विहिरी उभारण्यात न्यासाबरोबर तुकाराम यांचादेखील मोलाचा वाटा आहे. हे सर्व ग्रामविकासाचे काम करत असतानाच, त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला. यानंतर मात्र त्यांना कार्याची वेगळीच दिशा मिळाली. त्यांनी संघाचे प्राथमिक वर्षाचे शिक्षण पुण्यामध्ये पूर्ण केले. त्यानंतर गावी आल्यानंतर ते आधीपेक्षा अधिक वेळ ग्रामविकासाच्या कार्याला देऊ लागले.
 
गावागावांत आरोग्यरक्षकांची नेमणूक, पशुवैद्यकीय शिबिरे, महिला बचत गट, व्यवसाय प्रशिक्षण यासाठी ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची गावकर्‍यांनी दखल घेत त्यांना गावाचे उपसरपंच म्हणून निवडून दिले. उपसरपंच झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक ‘रोजगार हमी योजना’ राबवून गावातील सर्व रस्ते गावकर्‍यांच्या मदतीने बांधून घेतले. गावात रोजगार हमी योजना राबवून गावातील गल्लीबोळांत रस्ते पोहोचवणारे तुकाराम हे गुहिनी गावातील पहिले उपसरपंच. आजही ते ‘शिव तोरण’ या कंपनीमार्फत बांबू उत्पादक शेतकर्‍यांसाठी कार्यरत आहेत. त्यांचे कार्य अशाच पद्धतीने वाढत राहो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0