मकर संक्रमण : ऋतूबदलाकडून वृत्तीबदलाकडे...

15 Jan 2026 13:32:41
Sankranti
 
भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती. यामध्ये बदलत्या ऋतूपासून बदलत्या ग्रहमानानुसारही सण साजरे केले जातात. काल साजरी झालेली मकरसंक्रात हे याचे उत्तम उदाहरण. संक्रांत जशी महत्त्वाची तशी त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे आज असलेल्या किंक्रांतीचा अर्थही मोठा व्यापक! या दोन सणांचा नेमक्या अर्थाचा घेतलेला आढावा...
 
भारतीय संस्कृती ही केवळ उत्सवांची जंत्री नसून, ती निसर्ग, विज्ञान आणि मानवी मानसशास्त्र यांची एक अत्यंत विचारपूर्वक केलेली गुंफण आहे. आपल्या प्रत्येक सणामागे एक निश्चित अर्थ आणि उद्देश दडलेला असतो. जेव्हा आपण मकरसंक्रांतीचा विचार करतो, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण, ज्याला आपण ‘मकरसंक्रांत’ म्हणतो, हा केवळ खगोलीय बदल नाही. अंधाराकडून प्रकाशाकडे आणि थंडीकडून उबेकडे जाणारा हा प्रवास मानवी जीवनाला नवी दिशा देणारा, आशेचा आणि चैतन्याचा किरण आहे. मात्र, या सणाचे औचित्य केवळ ’संक्रांत’ (संक्रमण) आणि ‘तिळगुळ’ (स्नेह) इतकेच मर्यादित नाही, तर त्याच्या दुसर्‍या दिवशी येणारी ‘किंक्रांत’ही तितकीच महत्त्वाची आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. एकीकडे स्नेहसंवर्धन आणि दुसरीकडे दुष्ट प्रवृत्तींचा नाश! या पर्वाचा सर्वांगीण वेध घेताना निसर्ग, इतिहास, समाजकारण आणि अध्यात्म या विविध आयामांचा साकल्याने विचार करणे अगत्याचे ठरते.
 
मकरसंक्रांत हा सण निसर्गाच्या लहरीशी जुळवून घेणारा उत्सव आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, या दिवशी परिधान केले जाणारे काळ्या रंगाचे कपडे. एरव्ही भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्यात काळा रंग निषिद्ध मानला जातो. काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक समजला जातो. मात्र, मकरसंक्रांत हा त्याला एकमेव अपवाद आहे. या दिवशी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण, आवडीने काळी वस्त्रे परिधान करतात. यामागे एक अत्यंत सखोल वैज्ञानिक कारण दडलेले आहे. मकरसंक्रांत येतेच ती कडायाच्या थंडीत. पौष महिन्यातील गारठा शरीराला गोठावणारा असल्याने, अशावेळी शरीराला उष्णतेची गरज असते. रंगांच्या विज्ञानानुसार, काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. काळ्या रंगाची वस्त्रे सूर्याची किरणे आणि उष्णता शोषून घेतात व शरीराला उबदार ठेवतात. आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची सांगड धर्माशी आणि परंपरेशी किती खुबीने घातली होती, याचे हे उत्तम उदाहरण. केवळ वैज्ञानिकच नव्हे, तर यामागे एक सामाजिक संदेशही आहे. भारतीय संस्कृतीत ज्या रंगाला एरव्ही शुभकार्यात वर्ज्य मानले जाते, त्याला मकर संक्रमणाच्या या पवित्र पर्वात सन्मानाने स्वीकारले जाते. शुभ-अशुभतेच्या पारंपरिक चौकटीपेक्षा, निसर्गाची गरज आणि आरोग्याचे हित महत्त्वाचे मानणारी आपल्या पूर्वजांची ही व्यापक आणि विज्ञानवादी दृष्टीच या काळ्या वस्त्रांमधून दिसून येते.
 
संक्रमणाचा हा अर्थ केवळ वस्त्रांपुरता मर्यादित राहात नाही, तर तो मानवी प्रज्ञेच्या स्तरावरही तितकाच महत्त्वाचा ठरतो. संक्रमण म्हणजे केवळ ग्रहांचा एका राशीतून दुसर्‍या राशीत होणारा प्रवेश नाही, तर तो मानवी जीवनासाठी एक स्थितीबदल ( paradigm shift ) आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, जडत्वाकडून ( Inertia ) गतीकडे ( Momentum ) जाण्याचा हा प्रवास आहे. साचलेले पाणी जसे खराब होते, तसेच साचलेले विचारही मनाला दूषित करतात. पाणी वाहते राहिले की निर्मळ राहते, तसेच मानवी प्रज्ञेचेही आहे. विचारांमधले साचलेपण दूर करून प्रवाही होणे, नवनवीन आव्हाने स्वीकारणे आणि काळाशी सुसंगत बदलणे, हेच खरे संक्रमण. सूर्याचे उत्तरायण हेच सांगते की, काळ बदलतोय, त्याप्रमाणे तुम्हीही तुमची जुनी कात टाका आणि नव्या तेजाने सिद्ध व्हा.
 
हे चैतन्याचे पर्व साजरे करताना इतिहासातील त्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण ठेवणेही तितकेच अगत्याचे आहे. मकरसंक्रांतीला एक ऐतिहासिक आणि वीररसपूर्ण किनार लाभलेली आहे, ती म्हणजे पानिपतच्या रणसंग्रामाची. दि. १४ जानेवारी १७६१! मकरसंक्रांतीचाच तो दिवस होता, जेव्हा मराठ्यांनी देशाच्या रक्षणासाठी पानिपतच्या रणांगणावर रक्ताचे अर्घ्य दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मराठ्यांनी, या दिवशी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली. ती संक्रांत महाराष्ट्रासाठी मोठीच वेदनादायी ठरली. या महासंग्रामाची किंमत मोजताना बखरकार म्हणतात, "दोन मोती गळाले (नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव विश्वासराव आणि पेशव्यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भाऊ), २७ मोहरा हरपल्या (अनेक मातब्बर सरदार) आणि गंगाजळी किती वाहिली याला गणतीच नाही.” परंतु, तो दिवस केवळ शोकाचा नव्हता, तर असीम शौर्याचा होता. मृत्यू समोर असतानाही राष्ट्रासाठी सर्वस्व पणाला लावणे हेच खरे संक्रमण, हेच आम्हांला पानिपतने शिकवले. तिळगुळाच्या गोडव्यासोबत या वीरांच्या शौर्याची ऊबही मनात जपणे, हेच प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
 
एकीकडे शौर्याचा आणि विज्ञानाचा हा वारसा, तर दुसरीकडे सामाजिक स्नेहाची शिकवण. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असे सांगतो, तेव्हा आपणही तसेच वागू, अशी ग्वाहीच देत असतो. आजच्या काळात याची नितांत गरज आहे. सामाजिक तेढ, वैयक्तिक हेवेदावे आणि संवादाचा अभाव यामुळे, समाजमनात एक प्रकारचा थंडावा निर्माण झाला आहे. तीळ हे स्निग्धतेचे प्रतीक आहे, तर गूळ गोडीचे. जोवर तीळ आणि गूळ एकजीव होत नाहीत, तोवर लाडू वळता येत नाही. तसेच समाजात जोवर विखुरलेली माणसे स्नेहाच्या धाग्याने बांधली जात नाहीत, तोवर एकसंध आणि समर्थ राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही. भारतासारख्या खंडप्राय देशात हे संक्रमण राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवते. पंजाबमध्ये लोहरी, दक्षिणेत पोंगल, आसाममध्ये बिहू आणि महाराष्ट्रात संक्रांत अशी नावे अनेक असली, तरी त्यामागील कृषी संस्कृतीचा आणि निसर्गपूजेचा धागा एकच आहे. हे संक्रमण आपल्याला आपल्या प्रांतीय अस्मितेच्या कुंपणातून बाहेर पडून ‘भारतीय’ म्हणून व्यापक होण्याचे भान देते.
 
संक्रांतीच्या या उत्सवाला पूर्णत्व येते, ते दुसर्‍या दिवशीच्या ‘किंक्रांती’मुळे. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला ‘किंक्रांत’ किंवा ‘करीदिन’ म्हटले जाते. पंचांगानुसार या दिवशी शुभ कार्य वर्ज्य मानले आहे. यामागील पौराणिक संदर्भ असा आहे की, संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी देवीने ‘किंकरासुर’ नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आजच्या काळात या कथेचा अन्वयार्थ लावणे गरजेचे आहे. हा असुर कशाचे प्रतीक आहे; तर तो प्रतीक आहे, अहंकार, आळस, भ्रष्टाचार, स्त्रियांचा अवमान आणि समाजाला पोखरणार्‍या वाईट प्रवृत्तींचा. त्यामुळे ‘किंक्रांत’ हा दिवस अशुभ मानण्यापेक्षा, तो विजयाचा दिवस म्हणून पाहिला जावा. केवळ वर्षातून एकदा संक्रांतीला गोड बोलून भागत नाही, तर समाजातील आणि स्वतःच्या मनातील किंकरासुराला मारण्याचे धाडसही आपल्यात असावे लागते. आज आपल्याभोवती भ्रष्टाचाराचा, द्वेषाचा आणि असहिष्णुतेचा किंकरासुर थैमान घालत आहे. जोवर या अपप्रवृत्तींचे निर्दालन (किंक्रांत) होत नाही, तोवर समाजात खर्‍या अर्थाने सुखाचे संक्रमण (संक्रांत) होऊ शकत नाही.
 
थोडक्यात सांगायचे तर, ‘संक्रांत’ आणि ‘किंक्रांत’ या दोन्ही दिवसांचा एकत्रित विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की, नवनिर्मितीसाठी जुन्या, सडया विचारांचा नाश होणे अपरिहार्य असते. शेतकरी ज्याप्रमाणे जुनी पिके कापून नव्या हंगामाची तयारी करतो, तसेच मानवाने आपल्या मनाची मशागत करणे अपेक्षित आहे. काळ्या वस्त्रातून उष्णता शोषून घेत, पानिपतच्या वीरांकडून शौर्याची प्रेरणा घेत, गुळाची गोडी जिभेवर ठेवत आणि कृतीत किंकरासुराचा वध करण्याची धमक ठेवत, जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने ‘उत्तरायणा’त प्रवेश करतो. हे पर्व केवळ ऋतूबदलाचे नाही, तर वृत्तीबदलाचे ठरावे, हीच या सणांची खरी फलश्रुती असेल!
 
- आसावरी पाटणकर 
(लेखिका संगीताचार्य असून, कला, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘उद्गार’ संस्थेच्या संस्थापकही आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0