Raj Thackeray : गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंचे मिलन. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत दोघांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र आणि मुंबईच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे दोघांकडूनही वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत बदलत्या भूमिकांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. मनसे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या धोरणांमध्ये बदल होत गेल्याचा आरोप अनेकदा केला जातो. या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून त्यांनी आजपर्यंत नेमक्या कोणत्या भूमिका घेतल्या? याबाबत जाणून घेऊयात....
२७ नोव्हेंबर २००५. हा दिवस केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरील आठ कॉलमी बातमीचा मथळा होता – ‘राज ठाकरेंचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र’. या बातमीवर काही वेळातच स्वत: राज ठाकरेंनी शिक्कामोर्तब केला. बातमीनंतर ‘कृष्णकुंज’बाहेर राज यांच्या समर्थकांची गर्दी जमा झाली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चार कारकुनांची टोळी शिवसेना संपवत आहे, असा आरोप राज यांनी पक्ष सोडताना केला. यावेळी गर्दीसमोर येत राज ठाकरे म्हणाले होते की, “माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे...”राज ठाकरेंचं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवले गेले. त्यांच्या या एका वाक्यावरून त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील काही नेत्यांकडे होता? हे स्पष्ट झाले होते.
राज ठाकरे शिवसेनेत असताना प्रमुख नेते होते. त्या वेळच्या शिवसेनेचा झंझावत अशी राज ठाकरेंची प्रतिमा होती.यामुळे त्यांच्याकडे भविष्यात सेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे असेल असं अनेकांना वाटायचं. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत राजकारण वाढलं आणि राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट वाढत गेली. यातून या बंडाची सुरुवात झाली. या सर्व घडामोडीनंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं आणि पुढे ९ मार्च २००६ रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली आणि पक्षध्वज जारी केला. या घटनेला आता २० वर्षे पूर्ण होतील. ‘जगाला हेवा वाटेल’ असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना २० वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीये? असा प्रश्न अनेकांना पडतो.
मनसेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा, असा मनसेच्या तत्त्वांचा मूळ गाभा होता. पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत त्यांनी तो जिवंत केला. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी पक्षाच्या वैचारिक भूमिकांमध्येही अनेकदा बदल केले. निवडणुकानिहाय भूमिका बदलत गेल्याचे दिसून आले. कधी शिवसेनेविरोधात मात्र भाजपच्या बाजूनं, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात, तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं, कधी ठाकरे गटाच्या विरोधात नि भाजप-शिवसेनेच्या बाजूनं, नि आता ठाकरे गटाच्या बाजूनं नि भाजप-शिवसेनेविरोधात. एकूणच असा भूमिकांची सातत्य गमावणारा प्रवास राज ठाकरेंनी गेल्या २० वर्षांमध्ये केल्याचं ठळकपणे दिसून येते.
राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणले. त्यानंतर मुंबई महापालिका, पुणे महापालिका व नाशिक पालिकेत मोठ्या प्रमाणात मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. यानंतर मनसेने लढवलेल्या पालिकेसह इतर निवडणुकांमध्ये राज यांनी मला पूर्ण सत्ता द्या, बघा मी महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतो अशी भूमिका अनेकदा घेतली.
यानंतर ४ ऑगस्ट २०११ मध्ये नरेंद्र मोदींच्या आमंत्रणांनंतर राज यांनी गुजरात दौरा केला. त्या दौऱ्यानंतर त्यांनी अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत, अशी भूमिका घेतली होती.त्याशिवाय लोकसभेवेळी अनेक प्रचार सभांमध्ये त्यांनी नरेंद्र मोंदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला होता. त्याचवर्षी २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज यांनी मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली होती. मात्र, या निवडणुकीत मनसेला फक्त एकच जागा जिंकता आली होती.
यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये राज ठाकरे यांनी एका सभेतील भाषणादरम्यान मोदींची स्तुती केली होती. पंतप्रधान मोदी हे देशाची शेवटची आशा आहेत असेही राज ठाकरे म्हणाले होते. फेब्रुवारी २०१७ मधील महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने याला दाद दिली नाही, असे म्हटले जाते. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीतील पराभवानंतर हा आपला शेवटचा पराभव अशी भूमिका घेतली होती.
२०१९ मध्ये राज ठाकरेंची भूमिका ३६० अंशात बदलली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत, 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या. लोकसभा न लढता त्यांनी मोदी आणि अमित शाहांविरोधात प्रचार केला. या निवडणुकांमध्ये त्यांनी अप्रत्यक्ष रित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्याशिवाय २०१९ एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून संधी द्या असेही सांगितले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली. ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेची फक्त एकच जागा निवडून आली.
मनसेने २०२० मध्ये पक्षाचा झेंडा बदलत एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्यानंतर मनसे मराठी आस्मितेच्या मूळ मुद्द्यांपासून हळूहळू दूर गेल्याचं बोललं गेलं.
साल २०२४ :
२०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्याबाबत राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको; फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं, यासाठी मी पाठिंबा जाहीर करत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र, या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला साध खातंही खोलता आलं नाही. या निवडणुकीत तब्बल १२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता.
साल २०२५ :
आता २०२५ मध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली.एकमेकांवर सडकून टीका करणारे दोन्ही ठाकरे मुंबई महापालिकेसाठी २० वर्षांनी पुन्हा एकत्र आलेत.“महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” अशी स्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली.
अनेक राजकीय विश्लेषक सांगतात की, राज-उद्धव यांनी एकत्र येण्यासाठी बराच काळ घेतला, त्यातही जागा वाटपात राज ठाकरेंना काही मानाचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे अनेक शिलेदार नाराज आहेत. राज ठाकरेंनी शीवतीर्थावरील सभेतल्या भाषणातून आपल्या भविष्यातील राजकारणाची चुणूक दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे आणि किचन कॅबिनेटमुळे त्यांना सोडून जे जूने जाणते गेलेत, त्यांच्याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच टीका केलेली नाही. त्यांना परत घेण्याविषयीचा जाहीर उल्लेखही त्यांनी केला आहे. राज ठाकरेंचा पक्ष हा स्वतंत्र आहे, त्यामुळे या निवडणूकीत त्यांची जादू चालली तर आणि चालली नाही तरीही मनसेचे अस्तित्व राज ठाकरे संपू देणार नाहीत. आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न पुन्हा राज करतील यात शंका नाही. त्यासाठी उद्धव ठाकरेंशी पुन्हा वैर घ्यावं लागलं तरीही. कारण राज ठाकरेंच्या पक्षाचा आजवरचा इतिहास पाहता, मराठी, हिंदूत्व अशा भूमिका त्यांच्या राहिल्या आहेत. सत्तेत असलेल्या पक्षांशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न कायम करतात. उद्धव ठाकरेंचं मराठी आणि अदानीचं नाणं यावेळी चाललं नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राला नवं समीकरण पहायला लागू शकतं, अशी शक्यता नाकारता येत नाही!