झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा, सिंगापूर कोर्टात तपास अधिकाऱ्यांची साक्ष

15 Jan 2026 17:00:18

मुंबई : बॉलिवूड आणि आसामी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमधील मृत्यूप्रकरणाने अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. १९ सप्टेंबर २०२५ रोजी स्कूबा डाइव्हिंगदरम्यान पाण्यात बुडून झुबीनचा मृत्यू झाला होता. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरला गेलेल्या झुबीनच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर सध्या सिंगापूर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 14 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत तपास यंत्रणांनी कोर्टासमोर महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती उघड केली.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समुद्रात उतरण्याआधी झुबीनने सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट परिधान केलं होतं. मात्र काही वेळातच त्याने ते काढून टाकलं. त्यानंतर त्याला दुसरं लाइफ जॅकेट देण्यात आलं, परंतु ते घालण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला. त्या वेळी झुबीन पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, झुबीन जहाजाकडे परत पोहण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बेशुद्ध पडला आणि काही वेळातच त्याचं शरीर पाण्यावर तरंगताना दिसून आलं.

बचाव प्रयत्न अपयशी

झुबीनला तातडीने जहाजावर आणून त्याच्यावर सीपीआर देण्यात आला. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तपासात असं समोर आलं की झुबीनला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तसेच त्याला फिट येण्याचा वैद्यकीय इतिहासही होता. २०२४ मध्ये त्याला फिट आली होती. मात्र घटनेच्या दिवशी त्याने नियमित औषध घेतलं होतं की नाही, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

घटनेच्या दिवशी काय घडलं?

सिंगापूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारच्या कटाचा संशय नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात एकूण ३५ जणांची साक्ष नोंदवली जाणार असून, त्यात जहाजावरील प्रवासी, कॅप्टन, पोलिस आणि वैद्यकीय पथकातील सदस्यांचा समावेश आहे. तपासात समोर आलं की घटनेच्या दिवशी झुबीनसह जवळपास २० जण जहाजावर होते. सर्वांनी एकत्र नाश्ता केला होता आणि त्यानंतर मद्यपानही केलं गेलं होतं. अनेक साक्षीदारांनी झुबीनने मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याचं नमूद केलं आहे.

पहिल्या पोहण्यादरम्यान झुबीन थकला असल्याचं सांगत बोटीवर परतला होता. मात्र काही वेळाने त्याने पुन्हा समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याला छोट्या आकाराचं लाइफ जॅकेट देण्यात आलं, पण ते घालण्यास त्याने नकार दिला. सुरक्षाविना तो एकटाच लाझारस बेटाच्या दिशेने पोहू लागला होता. झुबीनच्या शरीरावर आढळलेल्या जखमा या बचावकार्य आणि सीपीआरदरम्यान झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. रक्ततपासणीत त्याच्या शरीरात उच्च रक्तदाब आणि फिटसाठीची औषधं आढळली असून, इतर कोणत्याही औषधांचे अंश सापडले नाहीत.

अल्कोहोलचे प्रमाण चिंताजनक

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, झुबीनच्या रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण प्रति १०० मिलीलीटरमध्ये ३३३ मिलीग्राम इतकं होतं, जे अतिशय धोकादायक पातळीवर असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. याशिवाय पोलिसांनी त्याच्या हॉटेलच्या खोलीतून ७५० मिली स्कॉच व्हिस्कीची बाटली जप्त केली होती. तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं की झुबीन स्वतःच्या इच्छेने पाण्यात उतरला होता. त्याला कोणीही जबरदस्तीने ढकलल्याचे पुरावे सापडले नाहीत.

भारतातील तपास

दरम्यान, भारतात या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणाऱ्या एसआयटीने नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचा सचिव सिद्धार्थ शर्मा, तसेच त्याच्या बँडमधील शेखरज्योती गोस्वामी आणि अमृतप्रव महंत यांच्यावर हत्येचा आरोप दाखल केला आहे. झुबीनच्या जाण्याने संगीतविश्वाला मोठा धक्का बसला होता. त्याच्या चाहत्यांनी मोठा शोकही व्यक्त केला होता.


Powered By Sangraha 9.0