मुंबई : 'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन ६ सुरू होताच घरामध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. घरात रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे भांडणं आणि दुसरीकडे घरात आता चोरीसुद्धा झालेली आहे. नॉमिनेशन टास्क दरम्यान तन्वी आणि सागर कारंडे यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आणि त्यामुळे तन्वी ढसाढसा रडली असावी अशी शंका नाकारता येत नाही. याच वादाच्या वातावरणात घरात एक अतिशय भावनिक क्षण पाहायला मिळाला. मागील काही भागांपासून तन्वी आणि सागर यांच्यात काही कारणावरून खटके उडताना दिसत होते. मात्र, प्रोमोमध्ये असे दिसते की, तन्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तन्वी इतकी भावूक झाली होती की तिला रडू आवरणे कठीण झाले होते. सदस्यांनी तन्वीला सावरले.
तन्वीला अशा प्रकारे रडताना पाहून घरातील इतर सदस्यांनी त्यांचे मतभेद विसरून तिच्याकडे धाव घेतली. घरातील सदस्य तिला शांत करताना आणि तिचे सांत्वन करताना दिसत आहेत. सागर कारंडे म्हणाला, “बिचारी... मला वाईट वाटतं आहे तिचं... खरंच ती हे सगळं इतरांना सांगते ना, एकदा मला येऊन बोली असती ना पूर्ण हलकं केलं असतं मी तिला... "
तर दुसरीकडे 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या कमालीची खळबळ माजली आहे. घरामध्ये एक मोठी 'चोरी' झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे घरातील सर्व स्पर्धक अवाक झाले आहेत. या चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे, यावरून आता घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, घरातील सदस्य या चोरीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक याला 'वृत्ती' म्हणत आहेत, तर काही जण त्या व्यक्तीला उघड पाडण्याची मागणी करत आहेत. "घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे," अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या चोरीच्या प्रकरणामुळे घरातील समीकरणे बदलणार का? आणि बिग बॉस यावर काय शिक्षा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या 'चोरीचा मामला' नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.