'भगवा है अपनी पहचान', ‘शतक’ चित्रपटातील दमदार गीताचे मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

14 Jan 2026 19:17:26

मुंबई : ‘शतक : आरएसएस के १०० वर्ष ’ या चित्रपटातील पहिले प्रभावी गीत ‘भगवा है अपनी पहचान' नुकतेच नवी दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित विशेष सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या गीताचे अधिकृत अनावरण करण्यात आले. हा सोहळा ‘शतक’ चित्रपटाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. हा चित्रपट आरएसएसची न उलगडलेली कहाणी, त्याचे प्रमुख नेते आणि भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीतले योगदान उलगडण्याचा प्रयत्न करतो.

हे गीत भगव्याचे सामर्थ्यपूर्ण आवाहन आहे. बलिदान, शिस्त आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेला भगवा रंग केवळ एक चिन्ह न राहाता, मूल्ये, सेवा आणि सामूहिक जाणीव यांवर आधारित ओळख म्हणून या गीतात साकारला आहे. भगव्या ध्वजाखाली एकतेचे आवाहन करत, समान ध्येय आणि सांस्कृतिक अभिमानाने एकत्र उभे राहाण्याचा संदेश हे गीत देते.

उत्साह, जोश आणि राष्ट्रीय भावनेशी दीर्घकाळ नाते असलेल्या सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात साकारलेले हे गीत आरएसएसच्या शिस्तीचे, सामूहिक भावनेचे, देशभक्तीचे आणि मातृभूमीप्रेमाचे संगीतमय अभिवादन आहे. संगीतकार सनी इंदर यांचे संगीत आणि गीतकार राकेश कुमार पाल यांचे प्रभावी शब्द यामुळे गीताला जोशपूर्ण ताल आणि ठाम आशय मिळतो, जो एकता आणि दृढ निश्चय अधोरेखित करतो.

या प्रसंगी श्री मोहन भागवत म्हणाले, ''डॉ. हेडगेवार यांचे जीवन आरएसएसच्या आत्म्याचे प्रतीक होते. भारत सदैव प्रथम. ‘शतक’ चित्रपट आणि 'भगवा है अपनी पहचान' हे गीत त्यांची अखंड देशभक्ती आणि सामर्थ्य दाखवते. आरएसएस बदलत नाही, तो विकसित होत आहे. आपल्या मुळाशी प्रामाणिक राहून. हा चित्रपट न उलगडलेली कथा उलगडतो आणि लोकांना एकत्र आणण्याची व जीवनातील आव्हाने समतोलाने हाताळण्याची डॉ. हेडगेवार यांची क्षमता अधोरेखित करतो. या प्रभावी उपक्रमासाठी संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.”



यावेळी सुखविंदर सिंग म्हणाले, '' ‘भगवा है अपनी पहचान' या माझ्या गीताचे मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण झाले, याचा मला अत्यंत आनंद आहे. त्यांची उपस्थिती आशीर्वादासारखी आहे आणि त्यांची दृष्टी आम्हाला प्रेरणा देते. दिग्दर्शकांची साधेपणात प्रभाव निर्माण करण्याची दृष्टी मला खूप आवडली. इतिहास जपला पाहिजे. हे गीत केवळ व्यावसायिक संधी नाही, तर राष्ट्रीय सेवा आहे. सर्वांच्या मनाला ते भिडावे, यासाठी मी मनापासून गायले आहे. हे गीत हिंदुस्थानाच्या खऱ्या आत्म्याचे दर्शन घडवते.”

‘शतक’ हा चित्रपट राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या १९२५ मध्ये नागपूर येथे झालेल्या स्थापनेपासून ते आजच्या देशव्यापी स्वयंसेवी चळवळीपर्यंतच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेतो. अनिल डी. अग्रवाल यांची संकल्पना, आशिष मल्ल दिग्दर्शित आणि विर कपूर निर्मित, तर आशिष तिवारी सह-निर्माते असलेला हा चित्रपट एडीए ३६० डिग्री एलएलपी प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Powered By Sangraha 9.0