शिल्पसाधकाची रंगयात्रा

14 Jan 2026 10:48:27
Shivaji Nagulkar
 
तीन दशकांहून अधिक काळ आपल्या हातांनी शिल्प घडवणार्‍या शिवाजी नागुलकर यांचा जीवनप्रवास...
 
‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे’ 
कविवर्य बोरकरांनी जेव्हा आपल्या लेखणीतून ही काव्यसंपदा निर्माण केली, त्याक्षणाला जगभरात जन्मलेल्या प्रत्येक शिल्पकाराला, चित्रकाराला त्यांनी एका अर्थाने मानवंदनाच अर्पण केली. जगभरामध्ये प्रवास करताना आपल्या नजरेस असंख्य शिल्पे येतात. एखादा जगज्जेता योद्धा असो किंवा एखादी प्राचीन काळातील देवता. प्रत्येक राष्ट्राच्या संस्कृती-जीवनामध्ये आपल्याला शिल्पवैभव दिसून येते. मात्र, बर्‍याचदा हे शिल्प साकारणारे हात मात्र इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त होतात. मातीच्या गोळ्यातून भगवंताची मूर्ती बनवण्यापासून ते राष्ट्रपुरुषाचे भव्य शिल्प साकारण्यापर्यंत शिल्पकार असंख्य गोष्टींना आकार देत असतात. शिल्पकारांच्या मांदियाळीतील असेच एक महत्त्वाचे नाव म्हणजे शिवाजी नागुलकर.
 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या एका छोट्याशा खेड्यात शिवाजी नागुलकर यांचा जन्म झाला. आई-वडील दोघेही शेतकरी, त्यामुळे मातीशी त्यांची नाळ लहानपणीच जोडली गेली होती. घराच्या व्हरांड्यात माती आणून ते लहान-लहान शंकराच्या पिंडी तयार करत असत. त्यामुळे एकाप्रकारे लहानपणापासूनच मातीशी एकजीव होऊन, तिला आकार देऊन काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये होती. पुढे आपल्या आई-वडिलांसोबत ते मुंबईला राहायला आले. भांडुपच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये त्यांची शिक्षणयात्रा सुरू झाली. त्यांच्यातील कलासक्त माणूस याच शाळेमध्ये बहरला. एका छोट्याशा खडूलासुद्धा ते आकार द्यायचे व त्यातून नवीन कलाकृती साकारायचे. त्यांच्या या कलागुणांची ख्याती शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली व त्यांनी पाठीवर कौतुकाची थापसुद्धा दिली.
 
पुढे के.जे. सोमय्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. मात्र, कलेच्या प्रांतात मुक्तपणे वावरणार्‍या या कलाकाराला बंदिस्त खोलीची चौकट मानवली नाही. याबद्दलची प्रामाणिक कबुली त्यांनी त्यांच्या वडिलांना दिली. त्यानंतर मुंबईच्या ‘आयटीआय’मध्ये चित्रकला विभागात शिक्षणासाठी ते रुजू झाले. या वेळेला सकपाळ सर, आचरेकर सर अशा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात त्यांना व त्यांच्या कलेला सूर सापडत गेला. यानंतर काहीकाळ ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ मध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले. यानंतर ते नोकरीसाठी ‘बेस्ट’मध्ये पेंटर म्हणून रुजू झाले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतानाच, त्यांच्यातील कलाकार त्यांना खुणावत होता. मात्र, त्यांना त्यांची कला केवळ व्यवसायासाठी वापरायची नव्हती. त्यांना काहीतरी आव्हानात्मक करून दाखवायचे होते. हे आव्हान त्यांना दिसले ते शिल्पकलेमध्ये. एक शिल्पकार म्हणून घडताना आणि मूर्त्या घडवताना त्यांनी धोपट मार्ग न निवडता, वेगवेगळ्या गोष्टींसोबत प्रयोग केले.
 
घाटकोपरमधले प्रख्यात शिल्पकार मसुरकर यांच्याकडे त्यांनी शिल्पकलेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे ‘शिरगावकर स्टुडिओ’च्या माध्यमातून त्यांना आणखी काही काम करायची संधी मिळाली. यादरम्यान, शिल्पकार मसुरकर यांचे निधन झाले. मात्र, जाता-जाता त्यांनी आपल्या तालमीत एक शिल्पसाधक तयार केला. बघता-बघता तीन दशकांहून अधिक काळामध्ये त्यांनी दीडशेहून अधिक पुतळे तयार केले. पुतळे तयार करत असताना प्रकाश आणि सावलीचे मोजमाप, त्यातून उठावदार दिसणारे शिल्प यावर अत्यंत बारकाईने त्यांनी मेहनत घेतली. याच कारणामुळे त्यांच्या शिल्पांवर फारसे ‘करेशन’ करण्याची वेळ आली नाही.
 
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून ते अण्णाभाऊ साठे, अण्णासाहेब पाटील अशा दिग्गजांचे शिल्प साकारण्याचा मान त्यांना मिळाला. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये त्यांची शिल्पे तर पोहोचलीच मात्र, त्याचबरोबर भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेमध्येसुद्धा त्यांनी तयार केलेली शिल्पे पोहोचली. २०२३ सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांनी अखेरचे शिल्प साकारले. मुळातूनच कलासक्त असलेले शिवाजी नागुलकर यानंतर स्वस्त बसले नाही. मातीतून शिल्प तयार करणार्‍या नागुलकरांनी आता कोर्‍या ‘कॅनव्हास’वर चित्र साकारण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, त्यांना चित्रकलेची असलेली आवड जुनीच होती. मात्र, कामाच्या ओघात त्यांनी कित्येक वर्षे हातात ब्रश धरला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सरावाला जास्त महत्त्व दिले.
 
चित्रकलेचे शिक्षणातील वेगवेगळे घटक त्यांनी आत्मसात केले. आपल्या हातून रोज एक चित्र साकारले गेले पाहिजे, हा विचार त्यांनी ठेवला. ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ सोबत ते जोडले गेले. मागच्या वर्षी सोसायटीतील काही चित्रकारांनी वाराणसीचा अभ्यास दौरा केला. या दौर्‍यात शिवाजी नागुलकरसुद्धा सहभागी झाले. त्यांनी आपल्या नजरेतून जी वाराणसी पाहिली, अनुभवली, ती त्यांनी ‘कॅनव्हास’वर साकार केली. त्यांच्या याच चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या कलादालनामध्ये भरवले गेले होते. शिल्पकलेमध्ये जीवनाचा प्रवास करणार्‍या या कलाकाराने तितक्याच प्रभावीपणे कॅनव्हासवर चित्र रेखाटले, जे लोकांच्या पसंतीस उतरले. आपल्या कामातील यशाचे गमक सांगताना ते म्हणतात की, "कुठलेही काम वाया जात नाही. आपण पूर्णपणे जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. काम करत राहणे हेच आपल्या हातात असते.” आतासुद्धा वयाच्या या टप्प्यावर त्यांनी कामाला व स्वतःला विश्रांती दिलेली नाही. आपल्या कुंचल्यातून नवीन विश्व साकारण्यासाठी ते पुन्हा एकदा प्रवास करणार आहेत. त्यांच्या या प्रवासासाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0