सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील ‘श्रीराम मंदिर सीतामाई देवस्थान’ हे अद्वितीय श्रद्धास्थान मानले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे दरवर्षी लाखो महिला एकत्र येऊन ‘सीतामाईकडून वसा’ घेण्याची परंपरा आहे. आज मकरसंक्रांतीनिमित्ताने या परंपरेची माहिती देणारा हा लेख...
ऐतिहासिक पार्श्वभूमी
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील ‘श्रीराम मंदिर सीतामाई देवस्थान’ हे अद्वितीय श्रद्धास्थान मानले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे दरवर्षी लाखो महिला एकत्र येऊन सीतामाईकडून वसा घेतात. याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहताना, सर्वप्रथम चाफळ इथल्या समर्थ रामदासस्वामी स्थापित राममंदिराची माहिती घेऊ. हे मंदिर प्रसिद्ध आहेच, मात्र त्याच भागात वसलेले सीतामाईचे मंदिर त्याच्या साधेपणातही विलक्षण आहे. लोकपरंपरेनुसार, श्रीरामाने गर्भवती सीतेला याच भागात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडलं. लक्ष्मणाने बाणाने पाणी निर्माण केलं, ज्यामुळे बाणगंगा आणि माणगंगा नद्यांचा उगम झाला. चाफळला स्त्रिया सीतामाईकडून वसा घेतात. हाच या ठिकाणाचा अद्वितीय आणि भावनात्मक पैलू आहे. इथे देवी केवळ पूजनीय नसून, ती सजीव, प्रेमळ माय आहे.
मकरसंक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. जो वैदिक दृष्टिकोनातून तमसातून तेजाकडे जाण्याचा दिवस आहे. याच दिवशी सीतामाईकडून वसा घेतल्याने संकल्पपूर्ती, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक शुद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे. ही परंपरा देव-भक्त नात्याच्या पलीकडे जाते. इथे देवी ही आई आहे आणि स्त्री हे तिचं अपत्य. ‘वसा घेणं’ म्हणजे देवीच्या सान्निध्यातून आश्वासन, कृपा आणि मायेचा लाभ मिळवणं. सीता म्हणजे संयम, सहनशीलता, शुद्धी आणि आत्मबल. स्त्रिया तिच्या चरणी नतमस्तक होत हे गुण स्वीकारण्याचा जणू संकल्प करतात. येथे येऊन वसा घेतल्यावर त्यांना आत्मिक बळ आणि मानसिक उभारी मिळते.
संक्रांत म्हणजे तिळगूळ, बंध जुळवण्याचा सण. वसा घेणं ही क्रिया स्त्रियांमध्ये समूहभावना, एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमान निर्माण करते. हे धार्मिक आयोजन स्थानिक पातळीवर अनेकांना अर्थिक संधीही उपलब्ध करून देते. पूजेच्या साहित्याची विक्री, वाहतूक, भोजन, निवास अशा गोष्टींमुळे स्थानिक रोजगार वाढत आहे. लाखो महिला मकरसंक्रांतीला सीतामाईकडून वसा घेण्यासाठी येतात. त्याग, शौर्य, चिकाटी, विश्वास, धैर्य असे अनेक गुण सीतामाईकडून घेऊन, आपल्या जीवनात तसे आचरण करण्याचा प्रयत्न अनेक महिला करत आहेत. त्यामुळेच एकजण गेली की पुढील वर्षी तिची सखी, शेजारी, मैत्रीण, नणंद, भावजय, जाऊ, मावशी, काकू असे करत दरवर्षी मकरसंक्रांतीला सीतामाईकडून वसा घेणार्या महिलांची संख्या वाढतच आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक अशा अनेक ठिकाणांहून महिला मकरसंक्रांतीला चाफळ येथे येतात.
ही परंपरा स्त्रियांना मूक भावनेतून आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. सीतामाई ही त्यांच्या सुख-दुःखांची साक्षीदार आणि समाधानाची स्रोत ठरते. यामागील संकल्पना ही स्त्रियांना मानसिक आश्रय, आत्मविश्वास आणि संयमाची आठवण करून देते. ‘सीतामाईकडून वसा’ घेण्याची ही परंपरा म्हणजे श्रद्धा, अध्यात्म, स्त्रीशक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचा एक त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी महिलांना केवळ देवदर्शनच नव्हे, तर एक सजीव अनुभव मिळतो. आईकडून वसा घेणं, म्हणजे वेदना विसरणं, नव्या उमेदीनं जीवनाला सामोरं जाणं आणि एका दिव्य स्नेहबंधनाचं जतन करणं. या परंपरेचा अभ्यास म्हणजे आपल्या संस्कृतीतील नारीशक्तीचा गूढ आणि गौरवशाली अध्याय उलगडण्यासारखा आहे. तो आजच्या समाजालाही अत्यंत प्रेरणादायी ठरतो. महाराष्ट्रामध्ये अनेक आध्यात्मिक परंपरा आजही उत्साहात जपल्या जातात. यांपैकीच ही महत्त्वाची आणि अनोखी परंपरा आहे. यामागे केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर एक समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूदेखील आहे.
वसा म्हणजे काय?
‘वसा’ म्हणजे एखाद्या देवतेची उपासना करून विशिष्ट संकल्प पूर्ण करणे किंवा एखादे व्रत आचरणे. ‘सीतामाईचा वसा’ हा प्रामुख्याने कुटुंबाचे कल्याण, आरोग्य आणि समृद्धी यांसाठी घेतला जातो. महिला मनोकामना पूर्तीसाठी आणि कुटुंबाला सुख-शांती लाभण्यासाठी सीतामाईकडून वसा घेतात. ही परंपरा म्हणजे आत्मिक संवाद, संस्कार आणि स्त्रीशक्तीचा गौरव आहे.
स्त्री-शक्तीचा संगम ः या यात्रेत मोठ्या संख्येने महिला एकत्र येतात. ही स्त्रीशक्तीची एक मोठी अभिव्यक्ती आहे. स्त्रिया एकमेकींना भेटतात, सुख-दुःख वाटून घेतात आणि परंपरेचा भाग बनतात.
सामाजिक सलोखा : वेगवेगळ्या भागांतून, वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील महिला येथे एकत्र येतात. यातून सामाजिक सलोखा वाढीस लागतो.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना : या यात्रेमुळे परिसरातील स्थानिक विक्रेते, व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. पूजासाहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ यांच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल होते.
परंपरांचे जतन : आधुनिक काळातही अशा परंपरा जपल्याने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे महत्त्व जपले जाते.
सामूहिक प्रार्थना आणि ऊर्जा : एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करतात, तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चाफळ येथील ‘सीतामाईचा वसा केवळ एक धार्मिक प्रथा नसून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. ती स्त्रीशक्तीचा आदर करणारी, कौटुंबिक मूल्यांना महत्त्व देणारी आणि सामाजिक सलोखा वाढवणारी परंपरा आहे, जी आजही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने जपली जात आहे.
- अंजली तागडे
(लेखिका विश्व संवाद केंद्र, पुणेच्या संपादक आहेत.)